श्रीवर्धन 

निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.या पडलेल्या झाडांची तातडीने विल्हेवाट न लागल्याने आता शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून,तापसरीची साथ फैलावली आहे.

  चक्रीवादळ होऊन गेल्यानंतर एक महिना होत आला तरी श्रीवर्धन शहरातील अनेक भागातील कचरा किंवा झाडांचा पालापाचोळा अद्याप उचलण्यात आलेला नाही. सदरचा कचरा हा गटारांमध्ये देखील असल्याने पाऊस पडल्या नंतर गटारांमध्ये पाणी तुंबून राहते. त्यामुळे सध्या विचित्र प्रकारच्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळत आहे. या डासांवरती पांढर्‍या रंगाचे ठिपके असून चावल्यानंतर त्या ठिकाणी गांध उठते. अशा प्रकारचे डास वारंवार चावल्यामुळे श्रीवर्धन शहरामध्ये ताप सरीची साथ पसरलेली आहे.

 श्रीवर्धन शहरातील डॉक्टरांना देखील कोरोना लागण झाल्याची घटना समोर आल्यानंतर तापाच्या साथीमुळे अनेक नागरिक भयभीत झाल्याचे पहायला मिळत आहेत. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून कचरा उचलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. डास निर्माण होऊ नये म्हणून जुने झालेले टायर, रिकामे पत्र्याचे डबे, करवंट्या, इत्यादी नष्ट करणे आवश्यक आहे.

  याबाबत श्रीवर्धन नगरपरिषदेच्या घंटा गाडी वरून कोणत्याही प्रकारची उद्घोषणा करताना दिसत नाही. दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्यासाठी येणार्‍या घंटा गाड्यांवरती फक्त कोरोना आणि चक्रीवादळा नंतर निर्माण झालेला कचरा टाकु नये तेवढ्याच उद्घोषणा होताना दिसतात. ज्या नागरिकांच्या आवारामध्ये झाडाझुडपांचा कचरा प्रचंड प्रमाणात आहेत त्यांनी तो टाकायचा कुठे हा प्रश्‍न देखील महत्त्वाचा आहे. कारण पावसाळा असल्यामुळे जमिनीमध्ये खड्डा खोदून तो गाडुन टाकणे शक्य नाही. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने संपूर्ण शहरांमध्ये धुराची फवारणी त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डास निर्माण होतील अशा ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याची आवश्यकता आहे.