वाकण

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या यशवंतखार गावात गेल्या काही दिवसांत आलेल्या मुंबईकरांकडून होम क्वारंटाईनचे पालन होत नसल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे यशवंतखार गावात होम क्वारंटाईनचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे गावात आलेल्या मुंबईकरांमध्ये एक जरी कोरोना संशयित रुग्ण आढळला तर सर्वांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतांनाच संबधित शासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार रोहा तालुक्यातील यशवंतखार हे गाव नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सरकारकडून नव्याने काढण्यात आलेल्या आदेशानुसार व इतरत्र असलेल्या नागरिकांना आपल्या गावी परत येण्याच्या दिलेल्या सवलतीनुसार याच गावात गेल्या काही दिवसांत सुमारे दीडशेहून अधिक मुंबईकर नागरिक परत आले आहेत.

गावात आलेले नागरिक राजिप शाळेत अथवा स्वताच्या घरात होम क्वारंटाईन राहण्याची गरज असतांना हे नागरिक मोठ्या संख्येने शेतावर जात आहेत. त्याचप्रमाणे गावात व इतरत्र फिरत असून तोंडावर मास्क न लावता फिरत असल्याच्या निदर्शनास आले आहे. त्याशिवाय या गावात काही दिवसांपूर्वी या नागरिकांच्या तपासणीसाठी गेलेल्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना या मुंबईकर नागरिकांकडून कोणतेही सहकार्य न मिळता उलट दमदाटी करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच अनेक मुंबईकर नागरिक तर त्यांना ज्या घरात होम क्वारंटाईन म्हणून राहण्यास सांगण्यात आले आहे अशा ठिकाणी ते नसल्याचे व तपासणीच्या वेळी ते तेथून गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मुंबईकर नागरिकांमुळे गावातील इतर नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असल्याने शासकीय यंत्रणेने या प्रकारची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!