अलिबाग  

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अधिक जलद गतीने व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महामार्गाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, असे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती   पालकमंत्री  आदिती तटकरे यांनी सोमवारी  येथे दिली.

 रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची सध्या वाईट अवस्था आहे. महामार्गाची दुरुस्ती केली तरी ती टिकत नाही. त्यामुळे महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोल्ड डांबरचा वापर करता येईल का हे पाहिले जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी अशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची भेट घेणार असल्याचे ना. तटकरे यांनी सांगितले. मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाला अधिक गती येण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे आपला पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

 आगामी गणेशोत्सवात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. 12 ऑगस्टनंतर येणार्‍या गणेशभक्तांना स्वॉब टेस्ट करावी लागणार आहे. तर क्वारंटाईन कालावधी चौदा वरून दहा दिवस करण्यात आला आहे.

आदिती तटकरे,पालकमंत्री

 गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

 कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी बससह रेल्वे प्रवासाची सुविधा शासनाने करून दिली आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मात्र नागरिकांनी यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. सांस्कृतीक कार्यक्रम पेक्षा आरोग्य शिबिरे आयोजित केल्यास नागरिकांचे आरोग्य राखण्यास मदत होईल, असे पालकमंत्री ना. तटकरे म्हणाल्या.

 शांतता कमिटीच्या नियुक्तीवरून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी नाराज आहेत का? या प्रश्‍नावर पालकमंत्री ना. तटकरे यांनी सांगितले की, जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य हे स्थानिक पातळीवरून येत असतात. याबाबत कोणाचीही नाराजी असल्याचे आपल्याला वाटत नाही. तालुका पातळीवरील शांतता कमिटीच्या सभेस जिल्हा कमिटीच्या सदस्यांना निमंत्रित करण्याच्या सूचना आपण प्रांताना दिल्या आहेत, असेही तटकरे यांनी सांगितले. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड तपासणी लॅब येत्या 20 ऑगस्टपर्यंत सुरू होईल. त्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग देण्यात येईल, असे आश्‍वासनही  पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन