अलिबाग :
रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने गेल्या 12 तासात रायगडला चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्याच्या अनेक भागात अधून मधून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, 8 जुलै तसे 9 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून देण्यात आला आहे. वादळी वार्‍यामुळे अनेक भागात भीतीचे वातावरण पसरले होते.
अलिबागसह, म्हसळा, श्रीवर्धन,  पेण, रोहा, खालापूर, म्हसळा, कर्जत भागात पावसाचा जोर अधिक आहे. अन्य भागातही अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि पादचारी याना कसरत करावी लागते आहे. पावसामुळे कुंडलिका, काळ, सावित्री, अंबा, भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीची पाणी पातळी  इशारा पातळीच्या वर गेली आहे. छोटया नद्या तसेच गावाजवळचे ओहोळ भरभरून वाहत आहेत.  त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे . दरम्यान पावसाबरोबर जोरदार वारेदेखील वहात आहेत त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 50 मिलिमिटरच्या सरासरीने 893 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
रायगडात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. सलग पडणार्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसाबरोबर जोरदार वारे वाहत असल्याने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. 3 जूनला झालेल्या चक्रीवादळाच्या आठवणी अजून ताज्या असल्याने, नागरिक वादळी वारे वहायला लागल्यावर घबराट पसरत आहे. दरम्यान काही भागात नुकतेच बसवलेले पत्र पुन्हा उडून गेल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत होता. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने आज (7 जुलै) दुपारी साडेबारा वाजता दिलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारसह, बुधवार व गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

 
 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....