भाकरवड 

अलिबाग तालुक्यातील धामणपाडा येथील उत्कृष्ट बासरी वादक सचिन धुमाळ यांनी कोरोनामुळे सुरू झालेेल्या लॉकडाऊन मध्ये  मोफत बासरीवादनाचे प्रशिक्षण देवून एक चांगला सामाजिक उपक्रम राबविला आहे. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभारत 25 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले या कालावधीत अलिबाग तालुक्यातील शहाबाज धामणपाडा गावचे उत्कृष्ट बासरी वादक श्री. सचिन लहू धुमाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक तरुणांना बासरी बादनाचे धडे दिले.

सचिन धुमाळ यांनी अलिबाग,रेवदंडा, पेण, मुरुड,पनवेल..मुंबई.. नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील 92 जणांचा ज्यांना बासरी शिकण्याची आवड आहे अशांचा व्हॉटस ऍप ग्रुप तयार करून त्याच्या मार्फत ऑनलाईन पध्दतीने 25 मार्च ते 2 जुलै अशा शंभर दिवसांच्या कालावधीत बासरी वाजवण्याचे प्रशिक्षण दिले. संगीतातील अनेक अलंकार शास्त्रीय संगीतातील राग, मराठी चित्रपटातील काही निवडक गीते तर हिंदी सिनेमातील गीते तसेच बासरी वादनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सचिन धुमाळ यांनी यामध्ये सहभागी झालेल्या सर्वाना सढळहस्ते शिकवील्या.सचिन धुमाळ हे गेेली 14 वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिकेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असून पखवाज विशारद, संगीत विशारद ही आहेत. पंडीत हृदयनाथ  मंगेशकर, उस्ताद झाकिर हुसेन यांचेें भाऊ पंडित तौफिक कुरेशी..पंंडित उल्हास बापट..साधना सरगम स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत पद्मजा फेणाणि जोगळेकर अशा दिग्गजांचे आशीर्वाद व शुभेच्छा त्यांना लाभल्या आहेत. सचिन धुमाळ यांना साम वाहिनीवरील साम गुरुकुल या रियालिटी शो मधील उत्कृष्ट तालवाद्य वादकहा पुरस्कार ही प्राप्त झाला आहे.