रसायनी 

चांभार्लींतील घोटी परिसरातील  पाताळगंगा नदिपात्रात पोहायला गेलेल्या पाच जणांवर  जलचर प्राण्याने हल्ला करून त्यातील तिघांना जखमी केले आहे.चांभार्ली घोटी परिसरातील तलावांजवल रजत मुंढे,जय म्हात्रे,सौरभ जांभुलकर व आणखी दोघे असे पाच तरुण दुपारच्या सुमारास बिर्यांणी खाण्यासाठी गेले होते.खाल्यानंतर तलावानजीकच्या पाताळगंगा नदिपात्रात पोहण्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही.यावेली पाताळगंगा नदिपात्रात पोहत असताना या तरुणांची नजर पाण्यात बुडणार्‍या प्राण्यावर पडली.पाण्यात बुडणारे कुत्र्याचे पिल्लू असावे असा त्यांनी अंदाज बांधला व त्याला वाचविण्याकरिता तिघे पोहत पोहत त्याच्याजवल पोहोचले.यावेली रजत मुंढे,जय म्हात्रे आणि सौरभ जांभुलकर या तिघांनी लहान पिल्लु समजून वाचवायला जात असताना त्या जलचर प्राण्याने तिघांवर हल्ला केला.पाण्यात असतानाच या तरुणांच्या पायाला ठिकठिकाणी चावा घेवून त्यांना जखमी केले.

दरम्यान पाताळगंगा नदिच्या पाण्यातील हा मुंगूसासारखा दिसणारा ,हल्ला करणारा प्राणी कोणता असावा? याबाबत तरुणांनी नदिकाठच्या शेतकर्‍यांना व जाणकारांना विचारले असता त्यांनी उदीरप्राणी असल्याचे सांगितले.हा मुंगुसासारखा दिसणारा प्राणी अचानक हल्ला करतो.हा प्राणी पाताळगंगा नदित कुठून व कधी आला याचा कोणालाच अंदाज नाही.तरी पाताळगंगा नदित पोहायला जावू नये, सावधानता बाळगावी असा इशारा चांभार्लीं ग्रामपंचायत उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांनी परिसरातील नागरिकांना केला आहे.