रायगड
खरोशी | वार्ताहर
पेण एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून रविवार, 21 फेब्रुवारी रोजी प्रायव्हेट हायस्कूल पेण येथे आयोजित केली होती. यावेळी सभासदांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवल्याबद्दल सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप पडळकर, उपाध्यक्ष देवीदास बामणे, सचिव प्रवीण काळे, संचालक सदस्य बाळासाहेब ढाकणे, संचालिका सविता म्हात्रे, कविता झेमसे, तज्ज्ञ संचालक श्रीराम दातार यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामध्ये पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी, पदवी आणि इतर विभागांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी, त्याचबरोबर राज्यस्तरीय ज्ञानश्री पुरस्कार प्राप्त देवीदास बामणे तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉ. अरुण मुरलीधर पाटील या प्राध्यापकांचा सहकार शिक्षणाधिकारी दिलीप सोनाळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व सभासद व संचालक यांच्यासाठी सहकार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सुरुवातीला सभासदांच्या मृत नातेवाईकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकातून देविदास बामणे यांनी पतसंस्थेच्या वाढत्या आलेखा विषयी माहिती सांगून पतसंस्था करत असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच मागील सभेचे इतिवृत्त सचिव प्रवीण काळे यांनी वाचून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. फुंडे यांनी केले.