रायगड
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील खाडी विभागात असलेल्या गोमेडी ताडवाडी येथील रहिवासी महादेव पातेरे (75) यांच्यावर सावित्री नदीतील एका मगरीने हल्ला चढवून गंभीर जखमी केले असल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमाराला घडली. सुदैवाने मगरीच्या हल्ल्यामध्ये मोठी जखम झाली नाही. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.
तालुक्यातील गोमेडी ताडवाडी येथील महादेव पातेरे रविवारी नेहमीप्रमाणे सावित्री नदीलगत असलेल्या परिसरात गुरे चारण्यासाठी रविवारी पहाटेच्या सुमाराला गेले होते.गुरे चरत असताना नदीच्या पलीकडे जाऊ नयेत यासाठी पातेरे नदीच्या पात्रामध्ये उतरुन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. नदीतील पाण्याला ओहोटी असल्याने पाणी गढूळ झाले होते. नदीतून जात असताना अचानक त्यांचा पाय पाण्यात असलेल्या मगरीवर पडला आणि मगरीने त्यांच्या डाव्या पायावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पातेरे त्वरित नदीच्या बाहेर आले आणि त्यामुळे थोडक्यात जीव वाचला. त्यांना त्वरित चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता नेण्यात आले. त्यानंतर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचाराकरिता नेण्यात आले.