अलिबाग 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी घरी बसून असलेल्या रायगडकरांना जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात उध्वस्त झालेले ग्रामस्थ सावरतात न सावरतात तोच 20-25 दिवस विजेविना काढत असतानाही आलेल्या भरमसाठ विजेच्या बिलामुळे पाठोपाठ तिसरा धक्का बसला आहे. हातात जे काही चार पैसे वाचवून ठेवले होेते ते चक्रीवादळातून सावरण्यासाठी खर्च करत असतानाच आता ही वाढीव विज बिले कशी भरावी या दुहेरी विवंचनेत रायगडचा भुमीपूत्र अडकला आहे. हे देयक आकारताना मार्चपासून जूनपर्यंतचे थकबाकी सरासरी बिल आकारले आहेच त्यातच या महिन्याचे बिल घेताना पुन्हा मार्चपासून ते जूनपर्यंतची मीटर रिडींग गृहीत धरुन तेवढया युनीटचे बिल आकारुन एक प्रकारे ग्राहकांची फसवूणकच केली जात आहे. त्यात सतत खंडीत होणार्‍या विजपुरवठयाने ग्राहक त्रस्त असताना अशा पद्धतीने बिल आकारुन मोठा धक्का दिला आहे.

कोरोना विषाणूने जगभरात एक मोठे संकट उभे केले. त्याला रोखण्यासाठी देशभरात 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू त्यानंतर लगेचच लॉकडाऊन घोषित करण्यात आले. याच प्रचंड परिणाम अर्थचक्रावर झाला. लॉकडाऊनमुळे महावितरणकडून महिन्याला घेतले जाणारे ग्राहकांचे रिडींग देखील घेणे बंद झाले. त्यामुळे सरासरी बिल ऑनलाईनद्वारे महिन्याला यायला लागले. मात्र अनेकांकडे अशी सुविधा नसल्याने बरेच ग्राहक हे बिल भरण्यास असमर्थ होेते. त्यातच अनेक ग्राहकांनी याकाळात हाताला काम नाही व घरात पैसे नाही यामुळेही बिल भरता आले नाही. त्यातून सावरतात न सावरतात तो 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा देत नेस्तनाबूतच करुन टाकले. या चक्रीवादळाने जिल्ह्यातील अनेकांचे संसार उघडे पडले. महावितरणचे देखील यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात आजही चक्रीवादळाच्या नुकसानीमुळे विज पूर्ववत झालेली नाही. 25 दिवस होत आले तरी अजूनही शेकडो गावे अंधारातच आहेत. त्याचवेळी महावितरणकडून विजेचे रिडींगघ्यायला सुरवात करण्यात आली.

महावितरणकडून सांगण्यात आले आहे की ज्यांना एकत्रीत बिल अदा करणे शक्य होणार नाही त्यांनी हप्त्यानुसार भरणा करावा. म्हणजे या महिन्यात देयक भरले की पुन्हा या आणि पुढील महिन्याचे बिल भरायचे म्हणजे पुन्हा मोठीच रक्कम जमा करावी लागेल. त्यातच सातत्याने होणार्‍या खंडीत विजपुरवठयामुळेही रायगडकर संतप्त आहेत. यासंदर्भात महावितरणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

महावितरणकडून फसवणूक?

विजेचे बिल आकारताना मोठा गोंधळ महावितरणकडून करण्यात आला आहे. तीन महिन्यांचे थकबाकी देयकाची रक्कम आकारण्यात आली आहेच. त्यात पुन्हा मार्चपासूनचे मिटर रिडींग पकडून चालू रिडींग याची एकत्र बेरीज करुन त्यानुसार बिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे आलेले बिल हे 100 युनीटच्या पुढेच आलेले आहे. त्यानुसार 100 युनीट पर्यंत प्रति युनीट 3.66 रुपये आकारले जातात. मात्र 100 हून अधिक रिडींग झाल्यास 8.03 प्रति युनीट आकरले जातात. तर 300 च्यावर युनीट गेल्यास हाच आकडा 11.27 वर जातो. तर 500 च्या वर रिडींग गेल्यास दर चौपट म्हणजे 13.03 रुपये आकारण्यात येतो. त्यामुळे मार्चपासूनचे सरासरी बिल आकरण्यात आलेले असतानाच पुन्हा त्याच महिन्यापासूनची मिटर रिडींगनुसार विज बिल आकरण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे 100 रिडींग होते त्यांची 300 वर पोहचली तर 200 वाल्यांची 600 वर पोहचली त्यामुळे साहजिकच त्या आकारानुसार बिज देखील भरमसाठी आकरण्यात आलेले आहे.

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस