अलिबाग 

लॉकडाऊन दरम्यान चिकन, मटन, मच्छि तसेच मद्यविक्री करण्यासाठी होम डिलीव्हरीचा पर्याय उपलब्ध असल्याने आषाढी तथा गटारी अमावस्या साजरी करण्यातील अडथळा दूर होणार आहे. मात्र होम डिलिव्हरी सोयीस्कर नसल्याने त्यासाठी खाटीक संघटना नाराज असून पूर्वीच नुकसानीत असलेल्या खाटीक समाजाला या लॉकडाऊनमुळे ऐन हंगामात मोठा फटका बसणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे मत खाटीक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र घरत यांनी व्यक्त केले आहे.

कोकणासह इतर परिसरात आषाढ महिन्यातील दीप अमावस्या महत्वाचा उत्सव असतो. सोमवार दि. 20 जुलै रोजी दीप अमावस्या असल्याने शुक्रवार किंवा रविवारी बकरा, कोंबडीच्या जेवणावर ताव मारुन साजरा करण्याच्या तयारीत खवय्ये होते. मात्र ऐनवेळी लॉकडाऊन करण्यात आल्याने या उत्साहावर पाणी पडण्याच्या बेतात होते. अनेकजणांनी बुधवारीच आपली गटारी साजरीदेखील केली असली, तरी खरा आनंद येत्या शुक्रवार तसेच रविवारी असल्याने अनेकजण नाराज झाले होते. मात्र मंगळवारी उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन दरम्यान चिकन, मटन, अंडी, मच्छी तसेच अगदी मद्याचीदेखील विक्री होमडिलीव्हरीद्वारे करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी चिकन, मटन, आणि दारु उपलब्ध होऊ शकते. परंतु, चिकन - मटन होमडिलीव्हरी करणे फार त्रासदायक असल्याचे अलिबाग तालुका खाटीक संघटनेचे उपाध्यक्ष घरत यांनी सांगितले. यासाठी मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध नाही. आधीच्या लॉकडाऊनमुळे पुर्णपणे नुकसानीत असलेल्या खाटीकांना या सणामध्ये आशा होती. मात्र या निर्णयामुळे तीदेखील धुळीस मिळण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. खाटीक व्यावसायिकांची अडचण पाहता गटारीला खवय्यांना चिकन, मटनावर ताव मारणे अवघडच होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मद्यविक्रेते वाढीव दराने मद्यविक्री करण्यास काही प्रमाणात अनुकूल आहेत. पण पोलिसांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सांगण्यात आले.