वाकण

   माजी केंद्रीय गृह सचिव, अरुणाचलचे माजी राज्यपाल नागोठणे व परिसराच्या  सर्वांगीण विकासाचे शिल्पकार तसेच आय.पी.सि.एल. (आताची रिलायन्स) कंपनीची मुहूर्तमेढ रोवणारे नागोठण्याचे सुपुत्र राम प्रधान यांचे शुक्रवार दि. 31 जुलै रोजी वृद्धपकाळाने निधन झाल्याचे वृत्त नागोठण्यात येऊन धडकताच नागोठण्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यानंतर नागोठण्याच्या या सुपुत्राला नागोठणेकरांकडून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 स्वर्गीय राम प्रधान यांचं जाणं म्हणजे नक्कीच महाराष्ट्र राज्याचे नुकसान होण्या सारखे आहे. स्व. राम प्रधान, स्व. बापूसाहेब देशपांडे, माजी मुख्यमंत्री  पै . बॅरिस्टर ए. आर. अंतुले माजी मुख्यमंत्री या तिघांनी आय.पी.सी.ल कारखाना येण्यासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. आय.पी.सी.ल कारखाना गुजरात येथे होणार होता.  परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असलेले राम प्रधान यांच्या प्रयत्नाने तो कारखाना नागोठणे येथे उभा राहिला. नागोठण्याच्या जडण घडणा मध्ये स्व. राम प्रधान यांचा मोलाचा वाटा आहे.

 1982 साली केंद्र शासनाने आयपीसील कारखाना  नागोठणे येथे उभारण्याचा निर्णय घेतला तेव्हा कारखाना परिसरातील सहा गावातील शेतकर्‍यांनी लोकांनी कडाडून विरोध केला होता. विशेष म्हणजे तेव्हा सहा गावात शिक्षण घेतलेले फार कमी व्यक्ती होत्या.  इतकेच काय त्यावेळी सहा गावात एकही पदवीधर नव्हता.  मात्र स्व.  बापूसाहेब देशपांडे,  स्व. राम प्रधान यांनी याविषयावर विचार विनिमय करून प्रथम नागोठण्यात शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) सुरू केले. त्यानंतर प्रकल्पग्रस्त सहा गावातील 120 तरुणांना आय. टी. आय. मध्ये प्रवेश मिळवून दिला.  नंतर दोन वर्षांनी शिक्षण पूर्ण झालेल्या आय.टी.आय प्रमाणपत्र प्राप्त तरुणांना 1988 साली आयपीसील कारखान्यात  मध्ये नोकरी मध्ये सामावून घेतले. त्यांनतर राम प्रधान यांनी नागोठण्यात आपल्या मातोश्री आनंदीबाई प्रधान यांच्या नावे विज्ञान महाविद्यालय सुरु केले. या महाविद्यालयात सध्या एम.एससी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. या महाविद्यालयात आजमितीस 35 गावातील विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत.

 सनदी सेवेत असतांना अनेक महत्वाच्या खात्यांची हाताळणी करणारे राम प्रधान हे दिल्लीत उच्च पदावर असलेले मराठी व्यक्तिमत्त्व होते. दिवंगत राजीव गांधी यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी असणारे राम प्रधान सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल झाले. राजीव गांधी यांची तरुण पंतप्रधान म्हणून कारकीर्द गाजत असतांनाच आसाम करार त्यांचा लौकिक वाढविणारा ठरला. या कराराचे शिल्पकार म्हणून राम प्रधान यांना ओळखले जाते. राज्यपाल पदाची कारकीर्द संपल्यानंतर तसेच राजीव गांधी यांच्या हत्येनंतर प्रधान यांनी सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही पडद्यामागून अनेक जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या.   4 अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले.  त्यामुळेच राम प्रधान यांच्या निधनाने नागोठणे आपल्या एका चाणाक्ष व बुध्दिमान सुपुत्रास मुकल्याची भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.   

 

 

 

अवश्य वाचा