अलिबाग

कोरोना विरोधात माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानासाठी महत्वपूर्ण सहभाग असणार्‍या अलिबाग तालुक्यातील बेलकडे येथील आशा सेविकेचाच कोरोनाच्या संसर्गातून मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अलिबाग तालुक्यातच ही घटना घडली असतानाही जिल्हा प्रशासनाला किंवा आरोग्य विभागालाही याची सुतराम कल्पनाही नव्हती याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे जिल्हाभरातील आशा सेविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. जर शासनाने आमच्या तसेच आमच्या कुटूंबियांना वार्‍यावर सोडण्याची भुमीका घेतली तर आम्हाला काम थांबवावे लागेल असे मत आशासेविकांनी व्यक्त केले.

 जिल्हा प्रशासन अनभिज्ञ असताना कृषीवलने ही बाब जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच तत्परता दाखवित आशा सेविका नेहा पाटील यांच्या कुटूंबियांना कोव्हीड योद्धा या विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तातडीने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी स्वतः आशा सेविका नेहा पाटील यांच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन करीत शासन तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

अलिबाग तालुक्यातील बेलकडे येथील नेहा निवास पाटील (वय 48 वर्षे) या रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा सेविका म्हणून काम पहात होत्या. कोरोना विरोधात माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानासाठी त्या सज्ज झाल्या होत्या. मात्र त्यांना 21 सप्टेंबर रोजी ताप आल्याने त्यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करुन घेतली. अँटीजन टेस्ट केल्यानंतर त्या निगेटिव्ह असल्याचेही स्पष्ट झाले. मात्र अंगात ताप असल्याने त्यांनी काही दिवस त्यांनी आरामही केला. त्या नियमित ऑक्सिजन लेव्हल देखील पहात होत्या. सर्व काही नॉर्मल असताना बुधवारी 23 सप्टेंबर रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने घरातल्यांनी जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्याने पहाटे 4.20 वाजता त्यांचा अखेर मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची पुन्हा अँटीजन चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

अलिबाग तालुका जिल्ह्याचे मुख्यालय आहे. असे असतानाही तालुक्यातील एका आशा सेविकेचा मृत्यू होऊन देखील त्याची सुतराम कल्पनाही जिल्हा प्रशासनाला नव्हती. कृषीवलच्या प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना संपर्क साधत यांच्या सदर बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी तत्परता दाखवित नेहा पाटील यांच्या कुटूंबियांना कोव्हीड योध्दा या शासनाच्या विमायोजनेचा लाभ मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवून दिला आहे. त्यानंतर सायंकाळी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी नेहा पाटील यांच्या बेलकडे येथील घरी जाऊन कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी त्यांचे पती निवास पाटील, मुलगी श्रद्धा, मुलगा श्रेयस यांना विश्‍वास दिला की शासन तुमच्या सोबत आहे. यावेळी त्यांनी सर्व माहिती देखील घेतली. त्यांच्या सोबत अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उपस्थित होत्या.

अवश्य वाचा