पनवेल 

दहा दिवसांसाठी नव्याने टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याने पनवेल पालिका हद्दीतील नागरिकांनी आवश्यक शिधा साठवणूक करण्याची सूचना परिपत्रकात केल्याने गुरुवारी काही ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचा नियम डावलून किराणा मालाच्या दुकानांसमोर गर्दी केली. मात्र, गुरुवारी पालिका प्रशासनाने पुन्हा दुरुस्ती करीत टाळेबंदीच्या काळात किराणा मालाची दुकाने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकातील सूचनेचा अर्थ किराणा मालाची दुकाने टाळेबंदीच्या काळात बंद राहतील, असा घेतल्याने  धान्याच्या साठेबाजीसाठी गर्दी झाल्याचे स्पष्ट झाले.

टाळेबंदीच्या काळात किराणा मालाची दुकाने सुरू राहण्याबाबतची ध्वनिचित्रफीत पालिकेने गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता प्रसारित केली. अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

पालिकेच्या दोन शब्दांनी नागरिकांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचा टाळेबंदीपूर्वीच फज्जा उडाला. जे नागरिक घरात बसून होते त्यांनी किराणा मालाच्या दूकानांसमोर गर्दी केली होती.

मागील दोन दिवसांपासून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये पोलीस अधिकार्‍यांची बैठक झाली. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पनवेल पालिकेसोबत समन्वय साधून पनवेलमध्ये कठोर टाळेबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस व पालिका यांच्यात ठरले आहेत. वाहनांवर लक्ष ठेवणे सोयीचे होण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी सुचविलेल्या शहर आणि वसाहतींच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त असेल.

 

अवश्य वाचा