नेरळ

कर्जत शहरात कोरोनाची छाया आणखी गडद होताना दिसत आहे.शहराच्या सर्व भागात कोरोनाचे रुग्ण दररोज आढळत असताना शहराच्या प्रथम नागरिक यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे.तर कोरोना पोलीस कर्मचारी यांचा पाठलाग सोडताना काही दिसत नसून ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

रविवारी कर्जत तालुक्यात नवीन 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यात नेहमीप्रमाणे कर्जत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आजही जास्त आहे.शहराची आरोग्य व्यवस्था न डगमगता महिला असून देखील सर्व ठिकाणी पोहचणार्या कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

त्याचवेळी शहरातील मुद्रे भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढ आजही कायम आहे.मुद्रे भागातील नेमिनाथ अपार्टमेंट मध्ये एकाच घरातील तब्बल पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे नेमिनाथ अपार्टमेंट परिसरात कोरोनाच्या भीतीचे वातावरण आहे.शहरातील व्यपार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कायम असून कर्जत मुख्य शहरातील दोन व्यापार्‍यांना कोरोना ची लागण झाली असून त्यापैकी एक पदाधिकारी आहे. मात्र कर्जत तालुक्याचे तहसीलदार यांचे चालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता त्या चालकाच्या कुटुंबातील सर्व पाच जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.त्याचवेळी कर्जत तालुक्यातील पोलिसांच्या मागे लागलेला कोरोना काही पाठ सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.आतापर्यंत अनेक पोलिसांनी कोरोना वर मात केली असून तालुक्यातील पाच पोलीस अधिकारी यांना कोरोना झाला आहे तर आज आणखी तीन तरुण पोलीस कर्मचारी यांना कोरोनाने बाधित केले आहे.त्याचवेळी शहरातील गुंडगे, नानामास्तर नगर,संजयनगर, दहिवली नीड भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद