अलिबाग 

गणेशोत्सव सणावर यावर्षी कोरोनाचे संकट आहे. शासनाने पर्यावरण पूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यास भाविकांना सूचना केल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील सागाव गावातील पेशाने शिक्षक असलेले संतोष थळे हे गेली 17 वर्षांपासून पर्यावरण पूरक अशा कागदाच्या बोळ्यापासून गणेशाच्या आकर्षक मूर्ती बनवत आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मुंबई पुणे येथून मिळालेल्या ऑर्डर रद्द झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. कागदाच्या बोळ्या पासून बनविलेल्या मूर्त्याना ग्राहकांनाही मागणी केल्यास आगामी काळात पर्यावरण पूरक गणेशोत्सव खर्‍या अर्थाने साजरा केला जाऊ शकतो.

गणेशाच्या मूर्ती ह्या पूर्वी शाडूच्या बनविल्या जात होत्या. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या गणेश मूर्त्याना मागणी वाढू लागली. मात्र केंद्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी आणली असल्याने शाडू सोबत इतर पर्यावरण पूरक वस्तूपासून गणेश मूर्ती बनविण्यास प्राधान्य वाढण्यास सुरुवात होणार आहे. अलिबाग तालुक्यातील सागाव येथील संतोष थळे याना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा छंद आहे. 2003 साली कागद्याच्या बोळ्यापासून शोपीस, पपेट बनवू लागले. त्यानंतर कागड्याच्या बोळ्यापासून गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना सुचली. गणपतीच्या साच्यामध्ये कागदाला खळ लावून बोळा बनवून गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या. या मूर्त्याना पर्यावरण पूरक असे जलरंग देऊन रंगरंगोटी केली जाते.

पर्यावरण पूरक अशा या मुर्त्या सुबक आणि आकर्षक असून हजार रुपये फुटानुसार त्याची विक्री थळे हे करतात. यावर्षी मुंबई पुणे येथूनही शेकडो गणपतीच्या मूर्तींची ऑर्डर थळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गणपतीच्या मूर्त्याही बनविल्या होत्या. मात्र कोरोना संकट असल्यामुळे थळे यांना मिळालेल्या ऑर्डर ह्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे बनविलेल्या गणेश मूर्ती विकायच्या कसा हा एक प्रश्‍न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापना करण्याचे आवाहन प्रशासनाने जनतेला केले आहे. त्यातच घरगुती 2 फूट तर सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फुटाची स्थापना करण्याचे आदेश शासनाचे आहेत.

जिल्ह्यात अनेक गावांत कोरोनामुळे आजही गणपती मूर्त्या पोहचलेल्या नाहीत. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या ह्या पाण्यात विरघळण्यास विलंब लागत असतो. त्यातच यावर्षी कृत्रिम बनविलेल्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जन करायच्या आहेत. त्यामुळे संतोष थळे यांनी कागदापासून बनविलेल्या या गणेश मूर्ती ह्या पर्यावरण पूरक असल्याने आणि त्वरित पाण्यात विघटन होणार्‍या असल्याने भाविकांनी या मूर्त्यांची स्थापना करण्याचा हा एक पर्याय उपलब्ध आहे.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन