अलिबाग 

 कोरोनाची फोफावलेली साथ,लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना घालण्यातआलेली बंदी यामुळे दरवर्षी वाजतगाजत साजरा होणारा नारळी पौर्णिमेचा सणही साध्या पद्धतीने साजरा करुन समिंदराला नारळ अर्पण करण्यात आला.यामुळे  सण आयला गो नारली पुनवेचा या गीतावर बेधुंदपणे नाचणार्‍या समस्त कोळीबांधवाची मात्र मोठी निराशा झाली.मात्र समुद्राचे विधीवत पूजन करण्यात आल्याने आता नवीन हंगामाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे.

   सन आयलायगो नारली पुनवेचा या कोळी गीता मध्ये कोळी बांधवांमधून व मच्छिमार बांधवांमधून या सणाबद्दल किती आनंद निर्माण झालेला असतो हे दिसून येते.  बहुतांश कोळीबांधव किंवा मच्छिमार नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या होड्या मच्छिमारीसाठी समुद्रात ढकलतात.  दोन महिने बंद असलेला मासेमारीचा सीझन नारळी पौर्णिमेपासून सुरू होतो. यावेळी नारळाची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात येतो तसेच आपल्या होडीमध्ये देखील अनेक कोळी बांधव पूजा करतात. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून समुद्र पूर्णपणे शांत झाला होता व पाऊस देखील काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे यावर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मच्छीमारीला सुरुवात होईल असे वाटले होते. परंतु नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हवामानात अचानक बदल झाला. समुद्र देखील खवळला व जोरदार वार्‍यासह पर्जन्यवृष्टी सुरू झाली. आज सकाळी काही वेळ पावसाने उघडीप घेतली होती, परंतु दुपारनंतर पुन्हा पावसाने जोरदार वार्‍यासह दमदार सुरुवात केल्यामुळे कोळी बांधवांच्या व मच्छीमार बांधवांच्या आनंदा वरती विरजण पडल्याचे पहायला मिळाले. सोमवारी   नारळाची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला असला तरी आपल्या होड्या समुद्रात ढकलणे जवळजवळ कठीण असल्याने आता समुद्र शांत होण्याची वाट मच्छीमार बांधव बघतील. ज्या वेळेला समुद्र शांत होईल त्याच वेळेला आता मच्छीमारीला सुरुवात करण्यात येईल

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद