नेरळ 

माथेरान येथे आणखी दहा प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभिकरण करण्याबाबत नगर परिषदेकडून एमएमआरडीएकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

माथेरान ही क वर्ग गिरीस्थान नगरपरिषद 1905 मध्ये स्थापन झाली आहे. ब्रिटिशांनी शोधून काढलेले माथेरान पर्यटनस्थळ असून त्या ठिकाणी पर्यटन या एकमेव व्यवसायावर तेथे राहणारे यांची उपजीविका अवलंबून असते. मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले हे पर्यटन स्थळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट आहे. त्यामुळे मागील काही वर्षे सातत्याने माथेरानमध्ये विकास कामांसाठी एमएमआरडीएकडून निधी दिला जातो. मागील दोन वर्षात प्राधिकरणकडून आलेल्या निधीमधून माथेरानचा घाटरस्ता रुंद आणि सुरक्षित बनविण्यात आला आहे. त्याचवेळी शासनाचे मागील अनेक वर्षे दुर्लक्ष राहिल्याने पाच हजार मिलिमीटर पाऊस कोसळत असलेल्या माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांची दुरावस्था झाली आहे.

येथील अनेक पॉईंट जाण्यायोग्य राहिले नसल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने एमएमआरडीएकडे प्रेक्षणीय स्थळांची दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्याची मागणी केली होती. येथील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी माथेरान नगरपरिषदेकडून पाठपुरावा सुरु आहे. त्यातून एमएमआरडीएकडून दस्तुरी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा साडेचार किलोमीटरचा रस्ता धुळविराहित केला जात आहे. त्याचवेळी माथेरानच्या जंगलातील पॅनोरमा, हार्ट, मायरा आणि एको या चार प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण एमएमआरडीएकडून केले जात आहे.

मात्र केवळ मालमत्ता कर, प्रवासी स्वच्छता कर आणि वाहन कर यांच्यावर अवलंबून असलेल्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेची असलेली आर्थिक कमकुवत बाजू लक्षात घेऊन राज्य सरकारने माथेरानमधील आणखी 10 प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण करावे, असा ठराव नगरपरिषदेने 21 जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे. त्यानुसार आज माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी मुंबईतील एमएमआरडीएच्या मुख्यालयात जाऊन प्राधिकरणचे आयुक्त आर. ए. राजीव यांची भेट घेऊन माथेरान पर्यटन स्थळावरील सिलिया पॉईंट, मंकी पॉईंट, सनसेट पॉईंट, लुईजा पॉईंट, गारबेट पॉईंट, मिनी चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, रामबाग पॉईंट यांचे सुशोभीकरण करावे तसेच डेंजर पथ पॉईंटचा रस्ता दुरुस्ती आणि सुशोभीकरण करावे, अशी मागणी करणारे पत्र सादर केले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद