पेण : 

 कोरोना साथीचे निमित्त करुन पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करु लागल्याने पेणकरांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.आता तर मुख्याधिकार्‍यांनी पेण बाजार समितीत स्थानिकांना भाजी विक्रिसाठी बंदी घालताना परप्रांतीयांना सुट देण्यात आल्याने पेणकर संतापले आहेत. मुख्याधिकार्‍यांचा अजब न्यायाने शेतकर्‍याला उपाशी मारायचे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 पेण शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना शहराचे प्रशासन मात्र ज्या दक्षता घ्यायला हव्या त्या घेताना दिसत नाहीत, उलट गरीब गरजू शेतकर्‍यांनाच वेठीस धरताना दिसत आहेत.   पेण तालुक्यातील वरसई खोर्‍यात मोठया प्रमाणात आदिवासी बांधवांनी भाजीचे मळे केलेले आहेत. तशाच प्रकारे खरोशी, दुरशेत, आंबिवली, बळवली, वलक, दर्गावाडी, बेलवडयाचा खोरा, आंबेगाव, बोरगाव, सापोली, महलमिरा खोरा, पाबळ खोरा या सर्व भागात शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात कारली, शिराली, पडवळ, दुधी, दोडका, वांगी, भेंडी यांचे मळे केले असून आता उत्पन्न निघायला सुरूवात झाली आहे. मात्र पेण शहराच्या मुख्यधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या आर्थिक बाबीचा थोडाही विचार न करता कृषी उत्पन्न बाजार समितीला कृषी उत्पन्न बाजार बंद ठेवण्याची नोटीस दिली आहे.

     आज पेण शहरामध्ये पुणा, मुंबईवरून भाजी आणली जात आहे व तिची विक्री होत आहे. मग कृषी उत्पन्न बाजार पेठेत येणार्‍या शेतकर्‍यांच्या मालावरच बंदी का? याच्या खोलात गेल्यावर एक बाब प्रकर्शनाने समोर आली ती म्हणजे पेण शहरात आज अनेक परप्रांतीय मका, केळी व भाज्यांच्या हातगाडया लावलेले आहेत. या सर्व परप्रांतीयांना भाज्या पुरवण्याचे काम पेण येथील एका बडया नेत्याच्या मुलाच्या आर्शिवादाने होत आहे. जर स्थानिक शेतकर्‍यांचा माल मार्केट मध्ये आला नाही तर दामदुप्पटीने पैसे कमवण्यासाठी मुंबई, पुणे येथून भाजी आणून देणे सोपे होईल यासाठी हा खटाटोप असल्याचे पुढे येत आहे.    कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन रुग्ण सापडल्यानंतर 24 जून ते 1 जुलै या दरम्यान बाजार बंद ठेवला होता. मग आज पेणच्या आजूबाजूच्या कंपन्यांमधून मोठया प्रमाणात कोरोना संसर्ग रूग्ण सापडत आहेत, मग मुख्याधिकारी त्यांना बंदीचा आदेश देतील का?  फक्त आणि फक्त मुख्याधिकार्‍यांच्या आदेशामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला आणखी संकटात टाकण्याचा हेतू तर नाही ना? याविषयी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....