पाली/बेणसे  

कोरोना संकटात अनेकजण कोविड योद्धे म्हणून जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. पालीतील ज्ञानेश्‍वर जगताप या रुग्णवाहिका चालकाने समयसूचकता राखत एका महिलेला ऑक्सिजन लावून तिचे प्राण वाचविले.

अमृता मिलिंद मेकडे या महिलेसाठी ज्ञानेश्‍वर जगताप देवदूत बनला असल्याचे सांगत कुटुंबीयांनी ज्ञानेश्‍वरचे आभार मानले. कोरोनाचा धोका असतानाही ज्ञानेश्‍वर जगताप मागील कित्येक महिने रुग्णसेवा करीत आहे. रुग्णाला वेळेत ऑक्सिजन मिळाला नाही तर त्याच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे त्याने ऑक्सिजन किट हाताळणीचे प्रशिक्षण घेतले आहे. याचा उपयोग अनेकदा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी होताना दिसतोय.

पाली ग्रामपंचायत सदस्य अजय मुळे  यांची बहीण अमृता मिलिंद मेकडे यांना अपेंडिक्सचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी पनवेल येथील वीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. शस्त्रक्रिया करण्यापुर्वी  डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी केली, ही चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना इतर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण इतर दवाखान्यात  उपचारासाठी दाखल करताना बेड मिळणे कठीण झाले होते. अखेर तीन तासानंतर बेड मिळाला. यामध्ये बराच कालावधी गेल्याने अमृता यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी पालीतील रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्‍वर जगताप हे रुग्णाला सोडण्यासाठी  मुंबईला गेले होते. यावेळी अमृता मेकडे यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहून ज्ञानेश्‍वरने पीपीई किट घालण्यात वेळ न दवडता ऑक्सिजन लावला. ज्ञानेश्‍वर जगताप यावेळी देवदूत बनून आला. आज ज्ञानेश्‍वर जगताप यांच्यामुळे माझी बहिण सुखरूप डी. वाय. पाटील  दवाखान्यात पोहचली. तिच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत, या शब्दात अजय मुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान प्रतिक्रिया देताना ज्ञानेश्‍वर जगताप यांनी सांगितले की, सध्या कोरोनाच्या संकटात एकमेकांना  सहकार्य व मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. संकट कोणतेही असो माणुसकी विसरू नये. रुग्णवाहिका चालक असल्याने रुग्णांबाबत अनेकदा वेगवेगळे प्रसंग समोर येतात. यावेळी प्रत्येक रुग्ण हा आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याच्या भावनेने मला जेवढ जमेल तितके सहकार्य मी करतो. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे ज्ञानेश्‍वर जगताप म्हणाले.

 

अवश्य वाचा