रायगड
। रोहा । वार्ताहर ।
ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या अपहाराची चार दिवसांत चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ऐनघर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव मोहिते,परशुराम तेलंगे,दिनेश कातकरी यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार देऊन देखील चौकशी अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याने दोषी व्यक्ती असे गुन्हे बिनदिक्कत पणे करत असल्याचे मत उपोषण कर्त्यांनी व्यक्त केले आहे.स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनासाठी आर्थिक अपहार प्रकरणात विहित कालमर्यादेत चौकशी पूर्ण करून दोषीं विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी महादेव मोहिते यांनी केली आहे.