पेण 

 हल्लीच्या काळात इंग्रजी शिक्षणाचे वारे जोरात वाहू लागले आहेत.  त्याला कुणीही अपवाद नाही.   आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी चालतील मात्र आपला पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे असा हट्ट आणि आग्रह धरणार्‍या पालकांसाठी थोडी वेगळी कहाणी घडली आहे. खुद्द पालकांनीच पेण शहरातील इंग्रजी शाळेत शिकणार्‍या आपल्या  मुलांना त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन त्यांचा प्रवेश गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत करुन घेतला आहे. असा हा एक वेगळाच निर्णय घेण्यासाठी पालक तयार झाले ते तालुक्यांतील बळवली गावचे सरपंच संजय डंगर व ग्रामस्थांच्या दूरदृष्टीच्या विचारामुळे. हा केवळ कागदावरील निर्णय राहिला नसून तब्बल एक दोन नव्हे 35 विद्यार्थांनी  गावातील मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे.

तालुक्यातील बळवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय डंगर यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत बळवली ग्रामस्थांनी पेण येथे  इंग्रजी व मराठी माध्यमात शिकणार्या 35 विद्यार्थ्यांना आपल्या बळवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत  दाखल केले आहे. त्यामूळे नेहमी पन्नासच्या आसपास असणारी शाळेची पटसंख्या थेट नव्वद पर्यंत पोहचली आहे.

एकीकडे पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना बळवली गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 दरम्यान शाळा वाचवणेच नव्हे तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून बळवलीचे सरपंच संजय डंगर ,शिक्षक वर्ग  तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहा महीने अगोदर गावातील सर्व पालकांमध्ये जनजागृती केली.पालकांची सभा घेवून जिल्हा परिषद शाळेचे महत्व समजावून सांगितले.खाजगी शाळांवर होणारा खर्च निदर्शनास आणून दिला.यावर गावातील शाळेमध्ये आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल का ? अशी शंंका पालकांनी व्यक्त केली असता सरपंच संजय डंगर यांनी विद्यार्थ्यांना व शाळेला लागणार्या सर्व भौतीकसुविधा आपण पुरवणार असून मुलांच्या शैक्षणीक प्रगतीकडे आपले व्यक्तीशः लक्ष असणार आहे त्यामूळे आपण निश्‍चिंत रहा व आपल्या शिक्षकांना एकदा संधी देवू या असा विश्‍वास दिला त्यामूळे सर्व ग्रामस्थांनी होकार दिला.

दरम्यान सर्व ग्रामस्थांनी मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून स्वेच्छेने दोन लाख रुपये तात्काळ शाळेसाठी दिले तसेच ग्रामपंचायतीने देखील एक लाख रुपये दिले,त्याचप्रमाणे गडब येथील जॉन्सन कंपनीने देखील  शाळेला  लागणारी टाईल्स दिली.

अवश्य वाचा