म्हसळा 

दि. तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाला सोमवारी दोन महीने पूर्ण होत असून, या वादळामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप 100 टक्के भरपाई मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.

श्रीवर्धन केंद्रबिंदू असणार्‍या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तीन तालुक्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या वादळात परिसरातील 70 टक्के नागरिकांचे संपूर्ण घर, घरावरील कौले, पत्रे उडून गेली होती. लॉकडाउनच्या काळात हातामध्ये कामधंदा नसतानादेखील, लाखो रुपयांचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तरीही शासनाकडून तुटपुंजी मदत मिळाली असून, काही नुकसानग्रस्त दोन महिन्यांनंतरही मदतीपासून वंचित आहेत. म्हसळा नगरपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळामुळे रस्त्यालगत पडलेली झाडे व कचरा अद्याप उचलला गेला नसून, या कचर्‍यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई देण्याबाबत शासन अद्याप उदासीन असल्याने बागायतदार व नुकसानग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नुकसानग्रस्तांची चेष्टा

म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड येथे संपूर्ण गावाचे नुकसान झाले आहे.मात्र शासनाने या नुकसानाची थट्टा मांडली असून काही ग्रामस्थांना एक हजार,दोन हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

- मनोज गिजे-ग्रामस्थ 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद