अलिबाग :

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र कार्यालयात मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, बँकेचे उपसरव्यवस्थापक मंदार वर्तक, मुख्य व्यवस्थापक भारत नांदगावकर , व्ही.एस.पाटील हे उपस्थित होते.

कोरोना विषाणूजन्य परिस्थितीमध्ये आर्थिक व्यवस्थेची घडी पूर्णपणे बिघडत असताना बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटप आणि कर्जवसुली यावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. यामुळे बँकेने पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन बँकिंग व्यवसायामध्ये विविधता आणणे ही काळाची गरज आहे. तसेच आधुनिक व्यवसायाकडे देखील सकारात्मक नजरेने पाहणे आणि  त्या दृष्टीकोनातून तयारी करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले. तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकत्रित व्यवसाय हा 3500 कोटींपेक्षा अधिक असून बँक आजमितीला 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करते, ह्या गुंतवणुकीच्या नफ्यातून बँक सहकारामधील इतर संस्था तसेच बँकेच्या ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देऊ शकते, त्यामुळे ट्रेझरी विभागाची व्यापकता मोठ्या प्रमाणावर असून रायगड जिल्हा सहकारी बँकेसमवेत त्याचा फायदा सहकार क्षेत्रातील संस्थाना होणार आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ट्रेझरी विभागामुळे व्यवहारामध्ये अधिक नफाक्षमता तसेच पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी देखील उपस्थितांना संबोधित करताना आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कणखर नेतृत्वामुळे संचालक मंडळ यांना एकत्रित निर्णय घेताना आत्मविश्‍वास अधिक मिळतो असे मत व्यक्त केले, तसेच बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अधिक गतिमान तसेच आधुनिक पर्याय निर्माण करण्यासाठी अभिनव संकल्पना संचालक मंडळास सादर कराव्यात यासाठी आवाहन देखील केले.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....