नागोठणे  

नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, नागोठणे काँग्रेसचे आधारस्तंभ आणि  रायगड जिल्हा काँग्रेसचे नेते फरमानशेठ दफेदार यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने पुणे येथील के. ई. एम. रूग्णालयात सोमवारी (दि.10) पहाटे तीन  वाजता निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने नागोठणे काँग्रेस पोरकी झाल्याची भावना  काँग्रेसच्या नागोठण्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. पै. फरमानशेठ दफेदार यांच्या निधनामुळे जिल्ह्यासह नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पै. फरमानशेठ दफेदार हे प्रेमळ व दानशूर स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात फरमानशेठ यांनी मोहल्ल्यातील अनेक गरीब व गरजवंतांना त्यांच्याकडून अन्नधान्याचा पुरवठा केला होता.  फरमानशेठ हे व्यवसायाने जंगल ठेकेदार होते. नागोठण्यातील प्रियदर्शनी वाहतूक संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रियदर्शनी संस्थेचे ते माजी अध्यक्ष तसेच सल्लगार होते. नागोठणे मुस्लिम समाजाचे ते ट्रस्टी, नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कुलचेही ते  संचालक होते. तसेच त्यांनी हज कमिटी सदस्य म्हणूनही चांगले काम पहिले होते. पै. फरमानशेठ दफेदार यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पै. बॅ. ए. आर. अंतूले यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले होती. खासदार सुनिल तटकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते निकटवर्ती होते. दफेदार हे आमदार रविशेठ पाटील यांच्या कुटुंबातील एक सदस्यच होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, तीन मुले, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद