वाकण 

नागोठणे ग्रामपंचायतीने आपली कचराभूमी (डम्पिंग ग्राऊंड) नागोठण्यातील प्रसिद्ध अशा मिरा मोहिद्दिन शाहबाबा चौकाच्या लगतच गावात येण्या-जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगतच केेेलेले आहे.  त्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक तसेच सकाळी मॉर्निंग वॅाकला जाणारे जेष्ठ नागरिक यांना दुर्गंधीयुक्त वास सहन करावा लागत आहे.  तसेच या कोरोना महामारीच्या काळात यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून या बाबत ग्रामपंचायतीला वेळोवेळी सूचना करून सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे नागोठण्यातील तरुण व होतकरू सामाजिक कार्यकर्ते व वकिली व्यावसायिक अ‍ॅड. श्रीकांत रावकर यांनी सांगितले. तसेच यावर ग्रामपंचायतीने तातडीची उपाययोजना करावी अशी मागणीही अ‍ॅड. रावकर यांनी केली आहे.

अ‍ॅड.श्रीकांत रावकर म्हणतात की,  गावामधील घरातून, भाजी व माच्छी मार्केट, दवाखाने, हॉस्पिटल, बाजारपेठ इत्यादी ठिकाणाहून एकत्रित गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. तसेच मृत  झालेले प्राणी,  हॉस्पिटल, दवाखाने मधील इंजेक्शन, सलाइन्स, वेस्ट मटेरियल, सॅनेटरी पॅड, डायपर्स इत्यादी मटेरियल उघड्यावर फेकले जातात. पावसाळ्यात कचरा कुजतो. दुर्गंधी पसरते. कचरा वाहने काचराभूमीवर (डम्पिंग ग्राऊंड) नेली जातात. त्या वाहनांची चाके चिखलात रुततात म्हणून रस्त्यावरच कचरा टाकला जातो. टाकलेल्या कचराचा चिखल तयार होतो. वाहनांच्या वर्दळीमुळे चाकांना कचरा लागून तो सर्वत्र पसरतो. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचते त्यामुळे डास, मच्छर, कीटक वाढू लागतात त्याचा नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे नागरिकांना खोकला, श्‍वसनाचा आजार, सर्दी, जुलाब होतात. तसेच जवळच शाळा असल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी असलेले लहान मुले व जेष्ठ नागरिकांना  सर्वाधिक त्रास होतो.  यामुळे त्वचारोग, मलेरिया, डेंगू सारखे आजार वाढतात. तसेच गावातील काही पाळीव गाई, म्हशी तेथे चरण्यासाठी येतात. त्याच गाई म्हशींचा दुधाचा वापर  काही ग्रामस्थ करत असतात. ते दुध किती हायजेनिक असेल, त्या दुधाचा मानवी जीवनावर काय परिणाम होत असेल असा सवाल अ‍ॅड. श्रीकांत रावकर यांनी  उपस्थित केला आहे.

दरम्यान यासंदर्भात नागोठण्याचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,  नागोठणे ग्रामपंचायतीचा मालकी हक्क असलेल्या वसगाव रस्त्यालगतच्या गोळीबार मैदानावर (गावठाण) काही नागरिकांनी अतिक्रमण केले असल्याचे नागोठण्यातील दोन जागरुक पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रामार्फत माझ्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ग्रामपंचायतीने न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ते अतिक्रमण हटविण्यास मी यशस्वी झालो व गावाची जागा गावाला मिळूवून दिली आणि गावाबाहेर असलेल्या त्या जागेत आम्ही डम्पिंग ग्राऊंड सुरु  केलेले असून गावातील सर्व केरकचरा त्या ठिकाणी टाकला जातो. परंतु आता पावसाळा असल्यामुळे त्या जागेवर कचरा वाहून नेणारे वाहन जाऊ शकत नाही म्हणून आम्ही गावाबाहेर असलेले मिरा उद्दीन शहा बाबा चौक परिसारत एका बाजूला कचरा  टाकत आहोत आणि महत्वाचे म्हणजे केरकचरा टाकत असलेल्या जागेवर आम्ही सतत जंतुनाशक पावडरची फवारणी करत असतो. गेले 20 ते 25 वर्ष डम्पिंग ग्राऊंड गावातच होते परंतु मी ते डम्पिंग ग्राऊंड गावाबाहेर नेले हे तक्रार करणार्‍या संबंधित व्यक्तींनी हे लक्षात घ्यावे असेही सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद