रायगड
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यात कोविड संकटाचा वाढत प्रादुर्भाव पाहता तोंडावर मास्कचा वापर न करता विनामास्क बिनधास्तपणे राहणार्या मिनीडोर रिक्षाचालकाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी कारवाई करीत मिनीडोर रिक्षाचालक आरोपीवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शामसुंदर हनुमंतराव शिंदे(वय-32) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदर गुन्ह्याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, या गुन्ह्यातील फिर्यादी हे मास्क न घातलेल्या इसमावर कारवाई करण्याकरिता सोबत पोलीस उपनिरीक्षक ए.एम.करे, पोलीस शिपाई डोईफोडे, पोलीस शिपाई म्हात्रे, पोलीस शिपाई खिरीट असे माणगाव बाजारपेठेत पेट्रोलिंग करीत असताना निजामपूर रोड मार्गावरील अमित कॉम्प्लेक्सच्या समोर यांतील आरोपी मिनीडोर रिक्षाचालक रा.निजामपूर ता.माणगाव हे तोंडाला मास्क न लावता मिळून आले. त्याने रायगड जिल्ह्यात कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्याकडील (गृह शाखा) क्र.गृह./ एमएजी-1/प्रति.उपा.कोविड 19 सीआरपीसी 144/2021 दि.27/03/2021 अन्वये शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करून व कोरोना विषाणू या जीवघेण्या रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता शासनाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा केली. या गुन्ह्याप्रकरणी आरोपी मिनीडोर रिक्षाचालकावर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.90/2021 भादवि संहिता कलाम 188,269,270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.एम करे हे करीत आहे.