महाड 

नैसर्गिक संकटांना सामोरे जात असताना कोरोना आणि चक्रीवादळाने धास्तावलेला महाड तालुक्यातील शेतकर्‍याला आता पावसाची चिंता लागली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. गेल्या आठ दिवसांमध्ये शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे रखडली आहेत. भाताची रोपे पावसाअभावी सुकून जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, लावणीची कामे ठप्प झाली आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ जपून वाढविलेली झाडे एका क्षणात कोसळली आणि स्थानिक शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यात आलेली भाताची रोपे तयार झाली आणि अचानक गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला. शेतामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये साचलेल्या पाण्यात लावणीची कामे सुरु करण्यात आली. परंतु, जसजसे पावसाअभावी दिवस जात होते, त्या प्रमाणात शेतकर्‍यांची चिंता वाढत आहे.

मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागली होती. अशाच प्रकारे या वर्षीदेखील पेरणी करावी लागते की काय, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. शेतातील भाताच्या रोपांना पाणी नसल्याने शेतामध्ये पेरण्यात आलेले बियाणे उगविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पेरण्या पावसाअभावी संकटामध्ये सापडल्या असून, पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

झाला आहे.