सुतारवाडी 

पावसासाठी आभाळाकडे लक्ष लागलेल्या बळी राजाची प्रतिक्षा संपली असून जोरदारपणे सातत्याने पडणार्‍या पावसामुळे बळीराजाची चिंता आता दूर झाली आहे. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असताना आषाढी एकादशीपासून पावसाने दमदारपणे पडायला सुरुवात केली ती आजतगायत जोरदारपणे पाऊस कोसळत आहे. त्यामुळे उर्वरित भागातील भात लावणीच्या कामांनी आता अंतिम टप्पा गाठला आहे. सातत्याने पडणार्‍या पावसामुळे अनेक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून अनेकांनी पावसामध्ये लावणीची काम उरकली आहेत.

जून महिन्यात कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे बळीराजा चिंतेत होता. तुरळक पणे पडणार्‍या पावसाचा अंदाज घेऊन सुतारवाडी आणि दशक्रोशिमध्ये काही विभागात शेतकर्‍यांनी नांगरणी हाती घेऊन शेताची नांगरणी करून पेरणी केली आणि नंतर काही दिवसांनी उगवलेल्या रोपांची लावणी करून लावणीच्या कामातून मोकळा झाला. नंतर पावसाने कधी ऊन तर कधी पाऊस असा लपंडाव सुरू केला. त्यामुळे काही भागांमध्ये भात लावणीची कामे ठप्प होती. परंतु एकंदरच पडत असलेल्या पावसामुळे आता लावणीची कामे अंतिम टप्प्यात आलेली दिसत आहेत. येत्या आठ दिवसात विविध परिसरातील भात लावणीची कामे उरकून बळीराजा गणपती सणासाठी सज्ज राहणार असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे या परिसरातील लहान-मोठी नदीची पात्र ओसंडून वाहत आहेत. तसेच सुतारवाडी येथील धरण सुद्धा आता पाण्याची पातळी ओलांडून वाहत आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे दशक्रोशितील भात लावणीची काम उरकण्याच्या टप्प्यात आहेत.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....