खोपोली 

या वर्षी पाऊस चांगला पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यात अचानक आलेल्या निसर्ग चक्री वादळाने 1 जून पासून पावसाचे वातावरण तयार करून दहा तारखे पर्यंत दररोज तुरळक पाऊस पडत होता त्यामुळे शेतात पेरलेल्या भाताची रोपे लागवडीसाठी तयार झाली मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे तयार झालेली रोपे लागवडीच्या प्रतिक्षेत असून लवकर पावसाने सुरुवात केली नाही तर ही रोपे नंतर उपटतांना तुटण्याची जास्त शक्यता असून रोपांचा तुटवडा भासण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत पडला आहे.

पाऊस चांगला पडणार आणि पडायला सुरुवातही झाली त्यामुळे शेतकरी आनंदी होता मात्र 10 जून पासून आज पर्यंत पावसाने अचानक दडी मारल्याने लागवडीसाठी तयार झालेली रोपे शेतात पाणी नसल्याने फिक्कट पांढरी पडू लागली आहेत. शेतकर्‍यांनी आपल्या शेताची नांगरणी करून भात लागवडीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असली तरी पावसाने मारलेल्या दडीमुळे सर्व शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहेत. जर पाऊस आणखीन काही दिवस पडला नाही तर रोपे लावण्याचा कालावधी निघून जाईल व नंतर रोपे उपटतांना तुटण्याची जास्त शक्यता असल्याने लागवडीसाठी रोप कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.