अलिबाग 

वेळेत हजेरी लावलेल्या पावसामुळे राब पेरणी झाली असली तरी अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात शेतात पाणी आहे तिथे भात लावणीला प्रारंभ झाला आहे. तर अनेक ठिकाणी पाणीच नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जर वेळीच पावसाने साथ दिली नाही तर मात्र राब करपण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्यातून मोठया प्रमाणावर आलेल्या चाकरमान्यांमुळे सहज मजुरांची उपलब्धता होऊन शेतीची कामे वेग घेण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे चाकरमानी गावीच असल्याने पिक क्षेत्र वाढण्याची शक्यता गृहीत धरुन कृषीविभागाने तयारी ठेवली होती. मात्र रायगड जिल्ह्यात पिक क्षेत्र वाढले नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली. दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून लवरच लावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी यावेळी त्यांनी दिली.

या वर्षी जून महिन्या तीन तारखेला निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला चांगलाचा तडाखा दिला. याच दिवेशी मान्सुनपूर्व पावसाने देखील जिल्ह्याला झोडपले. चक्रीवादळाने फळपिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असले तरी शेतीची कामे सुरुच झाली नसल्याने भातपिकं तसेच इतर शेतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नव्हती. पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर काही शेतकर्‍यांनी राब पेरणी केली. ज्या परिसरात पाणी उपलब्ध आहे तेथे रोपे तयार झाली आहेत. मात्र अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍याच्या नशिबात अजूनही पावसाची प्रतिक्षाच दिसत आहे. 21 दिवसानंतरची रोपं लावणी योग्य असतात. शिवाय बागायती शेतकर्‍यांकडून धूळपेरणी केली जात असल्याने दरवर्षी पहिल्या टप्यातील लावणीचा प्रारंभ हे शेतकरी करतात.  महाड-पोलादपूर परिसरात पेरण्यांतून भात रोपांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे. काही ठिकाणी भात लावण्यांना देखील प्रारंभ झाला आहे. सोमवारपासून सर्वत्र वेगाने लावण्या सुरू होतील, असा विश्‍वास काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लॉकडाऊनमुळे मोठया प्रमाणावर चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत. रोजगाराविना घरीच असणार्‍या या मुंबईकरांची शेतीच्या कामात चांगलीच मदत होण्याची अपेक्षा यावेळी आहे. त्यामुळे दरवर्षी मजुरांची टंचाई जाणवते ती यावेळी जाणवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पाऊस चांगल्या प्रकारे लाभल्यास शेतीच्या इतर कामांना चांगलाच वेग येईल असे बोलले जाते. दरम्यान चाकरमानी गावी असल्याने पिक क्षेत्र वाढण्याची शक्यता गृहीत धरुन कृषी विभागाने बियाणे, खत आदींची तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही क्षेत्र वाढण्याची शक्यता दिसत नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिल्याने अनेकांची घरे उध्वस्त झाली. त्यामुळे ते सर्व सावरण्यात या चाकरमान्यांचा मोठा कालावधी त्यात गेला तसेच जातो आहे. याचा परिणाम यावर झाला असावा असाही कयास त्यांनी यामागे लावला आहे.