या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजार 42500 अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर कोरोनाचं संकट, त्यामुळे लागू करावी लागलेली टाळेबंदी आणि त्याचा एकूण सामान्यजनांवर झालेला परिणाम लक्षात घेतला, तर सारं जीवनच ठप्प झालं होतं. बाजारानंही मग नकारात्मकता धारण केली. इतकी की, बाजार थेट 26 हजार अंशांपर्यंत खाली आला. आता टाळेबंदी काही अंशी शिथील झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सरकारनं भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकदाराचं नुकसान टाळण्यासाठी दोनदा मिळून एक लाख कोटी रुपये बाजारात ओतले. रिझर्व्ह बँकेनंही मदत केली. त्यामुळे बाजार काहीसा सावरला. अलीकडे बाजारानं 35 हजारांचा टप्पाही पार केला. असं असलं, तरी जानेवारी ते मेअखेर देशातल्या गुंतवणूकदारांचं सुमारे 56 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. आता त्यातून काहीसं सावरलं जात असलं, तरी अजूनही भांडवली बाजारापेक्षा लोकांचा सोन्यातल्या गुंतवणुकीवर जास्त विश्‍वास आहे. त्याचं कारण भांडवली बाजारात गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळत नसताना सोन्याच्या दरात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव तोळ्यामागे 15 हजार रुपयांनी वाढले. सोन्यातून मिळणारा परतावा वर्षाला सुमारे पन्नास टक्के असेल, तर भांडवल बाजारात जोखीम पत्करून कोण गुंतवणूक करेल, असा प्रश्‍न निर्माण होतो.

गेली दोन वर्षे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आहे. भांडवली बाजारावर या ना त्या कारणानं त्याचा परिणाम होत राहिला. आता तर जग अडचणीत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीचे अहवाल अजून बाहेर यायचे आहेत. टाळेबंदीमुळे अहवाल काय असणार आहेत, याची बाजारालाही जाणीव आहे. इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. टाळेबंदीच्या काळात इंधनाचा कमी झालेला खप आणि त्या काळात झालेलं नुकसान भरून काढण्याचा कंपन्यांचा आता असलेला प्रयत्न यामुळे इंधनाच्या दरात वाढ होत असून, रिझर्व्ह बँकेचं महागाई नियंत्रणाचं उद्दिष्ट साध्य होणार का, हा विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे. त्यातही समाधानाची बाब म्हणजे, या वर्षी अर्थव्यवस्थेला शेतीचा चांगला टेकू असणार आहे. पावसाची समाधानकारक सुरुवात आणि उशिरापर्यंत पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज यामुळे रिझर्व्ह बँक आणि सरकारनंही सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. या वर्षी अर्थव्यवस्थेत नकारात्मक वाढ नोंदवली गेली, तरी पुढच्या वर्षी ती झेप घेण्याची शक्यता आहे. त्यातच भारताकडे आता 507 अब्ज डॉलर इतकी परकीय चलनाची गंगाजळी साठली आहे. त्यातून 17 महिने आयातीचा खर्च भागेल, असा विश्‍वास निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताकडे परकीय गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. या सर्व परिस्थितीचा भांडवली बाजारावर सध्या अनुकूल परिणाम होताना दिसतो आहे.  

मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, एक जानेवारीला बीएसई सेन्सेक्स 41 हजार 306 अंकांवर बंद झाला. 18 जून रोजी तो 34 हजार 208 अंकांवर होता. या काळात सेन्सेक्स 7098 अंक किंवा 17.18 टक्क्यांनी घसरला. बीएसई सेन्सेक्सप्रमाणेच बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपनेदेखील याच काळात नकारात्मक परतावा दिला. एक जानेवारी रोजी बीएसई मिडकॅप 14 हजार 998 अंकांवर बंद झाला आणि बीएसई स्मॉलकॅप 13 हजार 786 अंकांवर बंद झाला. 18 जून रोजी बीएसई मिडकॅप 12 हजार 673 आणि बीएसई स्मॉलकॅप 12 हजार 110 वर बंद झाला. म्हणजेच, बीएसई मिडकॅप 15.50 टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप 12.16 टक्क्यांनी घसरला. समभागाच्या बाजाराच्या तुलनेत सोन्यानं या कालावधीत चांगला परतावा दिला. एक जानेवारीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत एक लाख 28 हजार 228 डॉलर प्रतिऔन्स होती. तिने एक जूनला 13.02 टक्क्यांची वाढ नोंदवली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यापार ओन्समध्ये होतो. एक औन्सचं वजन 28.35 ग्रॅम असतं. देशांतर्गत शेअर बाजाराच्या बाबतीत 23 मार्च 2020 हा सर्वात वाईट दिवस होता. या दिवशी शेअर बाजारानं वर्षाच्या सर्वात खालच्या पातळीला स्पर्श केला. 23 मार्च रोजी बीएसई सेन्सेक्स 25 हजार 981 अंकांवर, बीएसई मिडकॅप नऊ हजार 711 वर, तर बीएसईई स्मॉलकॅप आठ हजार 872 अंकांवर बंद झाला. तथापि, त्यानंतर देशांतर्गत बाजार तेजी नोंदवत आहे.

बीएसई मिडकॅप 23 मार्च रोजी नऊ हजार 711 अंकांवर बंद झाला. 18 जूनपर्यंत तो 12 हजार 673 अंकांपर्यंत पोहोचला. त्यात 30.50 टक्क्यांनी वाढ झाली. बीएसई स्मॉलकॅपमध्येदेखील 23 मार्च रोजीच्या आठ हजार 872 अंकांवरून आता 12 हजार 110 अंकांपर्यंत वाढ झाली. ही वाढ 36.50 टक्के आहे. एव्हाना कोरोनाशी सामना करण्यासाठी विविध देशांच्या सरकार आणि केंद्रीय बँकांनी घेतलेल्या उपायांमुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिस्थिती प्रतिकूल असली, तरी बाजार गटांगळ्या खाताना दिसत नाही.

रिलायन्स समूहानं गेल्या दोन महिन्यात जिओ प्लॅटफॉर्मची हिस्सेदारी विक्री करून एक लाख 15 हजार कोटींचा निधी उभारला. त्यामुळे रिलायन्स समूह कर्जमुक्त झाला आहे. या वृत्तानंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढला. 150 अब्ज डॉलरचा पल्ला गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली कंपनी ठरली आहे. दरम्यान, फ्रँकलिन टेंपल्टन प्रकरण न्यायालयात गेलं आहे. काही गुंतवणूकदारांचा नियामकावर विश्‍वास नाही. त्याचा परिणाम असा होईल की, न्यायालयाबाहेर आणि कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय हे प्रकरण निकाली काढणं आता शक्य होणार नाही. टाळेबंदीमुळे जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था साफ कोलमडून पडल्या आहेत. जागतिक व्यापार पूर्ण ठप्प आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर उणे पातळीला जाऊ शकतो. कंपन्या बंद आहेत किंवा फक्त 25 टक्के कारभार चालू आहे. या परिस्थितीत कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल अतिशय खराब येतील. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात निकाल यायला सुरुवात झाल्यावर बाजार खाली जाण्यास नवीन कारण मिळेल.

शेअर बाजार भीती आणि हव्यास या भावनांवर खाली-वर होत असतो. बाजार वर-खाली हिंदोळे खात टप्प्याटप्प्यानं खाली जातो. हे खाली जाणं पटकन लक्षात येत नाही. पूर्वीच्या तेजीच्या सर्व उच्चांकांपासून साधारण एका वर्षात मंदीचा नीचांक आला आहे. शेअर बाजार खाली-वर (झिगझॅग) होत खाली जातो. त्यामुळे कदाचित भारतीय शेअर बाजार पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत खाली गेलेला असेल. देशाची आर्थिक घडी सुधारण्यास आणखी दोन-तीन वर्षे लागतील. पुढील एका वर्षाची बाजाराची स्थिती विचारल्यास कुणीही सांगू शकणार नाही. आणखी पाच वर्षांनी बाजार किती वर असेल, हे मात्र आवर्जून सांगितलं जाईल! 2008 मधल्या मंदीपूर्वी भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा वेग नऊ टक्के होता. त्या वेळेस अमेरिकेत बँकिंग घोटाळ्यामध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात शेअर्सची विक्री केली. त्यावेळी भारतीय कंपन्यांची कामगिरी आणि उत्पादनावर परिणाम झाला नव्हता. कामगारांच्या नोकर्‍या शाबूत होत्या. आज कोरोना टाळेबंदीत कंपन्या बंद, कामगारांचे पगार बंद, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याला ओहोटी असं चित्र आहे. या स्थितीचा विचार करता आताची तेजी किती काळ टिकेल आणि बाजरात स्थैर्य राहील का, याबाबत छातीठोकपणे कोणीच काही सांगू शकत नाही.

 

अवश्य वाचा