हिंदी-चिनी भाई भाई म्हणत चीननं विश्‍वासघात करून भारताविरुद्ध युद्ध केलं. त्यानंतर 1975 मध्येही या दोन राष्ट्रांदरम्यान लढाई झाली. त्यातही भारतीय सैन्य मारलं गेलं. या घटनेला 45 वर्षे होत असताना दोन्ही देशांच्या सैनिकांचं रक्त तिथं सांडलं. इतके दिवस चीन आणि भारतात केवळ शाब्दिक वार चालायचे. पण, आता रणभूमी सैनिकांच्या रक्तानं भिजली. त्याची कारणं काय आणि संभाव्य परिणाम काय, याचा विचार यानिमित्तानं करायला हवा. सद्यःस्थितीत चीनमध्ये कोरोनाची साथ पुन्हा सुरू झाली आहे. भारतात तर लाखो लोक कोरोनानं बाधित आहेत. भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. चीनलाही हाँगकाँग, तिबेट, तैपई, तैवाननं हैराण केलं आहे. एकीकडे चीनच्या युद्धनौका हिंदी महासागरात दाखल झाल्या आहेत. ग्वादर बंदरासारखं बंदर त्यांना आयतं मिळालं आहे. बांगलादेश, श्रीलंकेची बंदरंही चीन वापरण्याच्या स्थितीत आहे. चीननं मालदीवमध्येही पाय रोवले आहेत. पाकिस्तान, नेपाळ चीनच्या कह्यातच गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतानं अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, इस्त्राईलशी मैत्री करणं चीनला आवडलेलं नाही. चीननं त्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचं मूळ चीनमध्ये असून, जगभरात चीनविरोधात वातावरण तयार झालं असताना भारतानं चीनच्या विरोधात घेतलेली भूमिका चीनच्या नाराजीचं कारण ठरली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून भारतानं सीमाभागात पायाभूत विकासाची कामं सुरू केली आहेत. त्याचा उपयोग सैन्याच्या जलद हालचालीसाठी होऊ शकतो, याची चीनला जाणीव आहे. चीननं या भागात अगोदरच उंचावरची विमानतळं, रेल्वे, रस्ते आदी पायाभूत सुविधा निर्माण करून ठेवल्या आहेत. यामुळे चीन भारताकडे संभाव्य कट्टर स्पर्धक म्हणून पाहात आहे.

गेल्या वर्षी पाच ऑगस्टला लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. तेव्हा अक्साई चीन हा भारताचा भाग असून, तो परत मिळवणार असल्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वापरली. तेव्हापासूनच चीन बिथरला आहे. त्यातच प्रशांत महासागरात अमेरिकेच्या काही युद्धनौका भारताच्या मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. फिलिपिन्स, व्हिएतनाम, मंगोलिया, जपान, तैवान, दक्षिण कोरिया या चीनविरोधातल्या देशांशी भारतानं मैत्रीसंबंध वाढवले आहे. दक्षिण चिनी समुद्रातल्या चीनच्या वावरालाही भारतानं अप्रत्यक्ष विरोध केला आहे. त्यामुळे चीनला भारत हा आपला सर्वात मोठा शत्रू वाटतो. असं असलं, तरी दोन्ही देशांमधला व्यापार आणि नेत्यांची वैयक्तिक मैत्री यामुळे चीन भारताविरोधात फार आक्रमक भूमिका घेणार नाही, असा समज होता. आज तो मोडीत निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झुल्यावर झुलत असताना भारतालाही झुलवत ठेवण्याचं काम चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलं. गेल्या पाच मेपासून चीनचं सैन्य भारताच्या सीमेवर आहे. भारतानंही सैन्य तैनात केलं आहे. दोन्ही सैन्यात झटापट झाली असतानाही सीमांसंदर्भातल्या दाव्यांवर वाटाघाटीच्या माध्यमातून तोडगा निघावा, ही भूमिका भारतानं घेतली. मात्र, चीननं भारताला बेसावध ठेवून अखेर आपली मूळ वृत्ती दाखवलीच. त्यामुळे भारत-चीन सीमेवर गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे किमान 20 जवान हुतात्मा झाले. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले. चीनचेही 47 सैनिक मारले गेल्याचं सांगितलं जातं; परंतु, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

लडाखमधल्या गलवान खोर्‍यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमकीचं प्रमाण वाढलं आहे. अर्थात, गलवान खोर्‍यात हे प्रथमच घडत आहे, असेही नाही. 15 जूनला गलवान व्हॅलीमध्ये तीन तास चाललेल्या या चकमकीत जगातल्या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमधल्या सैन्यात चकमक झाली. दगड, काठ्या आणि धारदार वस्तूंनी हल्ला करण्यात आला. याच गलवान खोर्‍यात 1962 च्या युद्धामध्ये 33 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेनं चीनच्या 35 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. गलवानमधल्या चकमकीनंतर बर्‍याच चिनी रुग्णवाहिका गलवान खोर्‍यात आल्या. चिनी हेलिकॉप्टरच्या हालचालीही वाढल्या. त्यावरून चीनच्या सैनिकांमध्येही जखमी आणि ठार झालेल्यांचं प्रमाण जास्त असावं, अशी शंका आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये एक प्रसिद्ध सेनापती होऊन गेले. त्यांनी द ऑर्ट ऑफ वॉर  हे पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की लढाई न करता शत्रूला हरवणं हीच युद्धाची सर्वोत्कृष्ट कला आहे. शेकडो वर्षांनंतर आजही चीनमध्ये या पुस्तकातील सिद्धांत आदर्श मानले जातात. परंतु, या पुस्तकातील शिकवणुकीचा आता चीनला विसर पडला असावा. चीनने युद्धाचं वातावरण तयार केलं आणि विश्‍वासघातकी हल्लाही केला.

दरम्यान, एकीकडे वाटाघाटी सुरू असताना, दुसरीकडे चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्स मधून मात्र युद्धाला खतपाणी घातलं जात होतं. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याच्या तुकड्या आणि मोठ्या संख्येने ट्रक दिसत होते. लडाखची सीमा निश्‍चित करणार्‍या नदीजवळही चिनी सैन्य गस्त घालत होतं. काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सीमा भागाचा दौरा केला. त्यावरूनच या घडामोडी किती गंभीर आहेत, याचा अंदाज येतो. असं असलं, तरी जनरल नरवणे आणि राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये शांतता आहे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल, असं सांगितलं होतं. एकीकडे वाटाघाटी सुरू असताना, दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोणत्याही देशाचं नाव न घेता लष्कराला तयार राहण्याचे निर्देश दिले. तरीही आपण बेसावध राहिलो, हे इथे लक्षात घ्यायला हवं. भारत आणि चीनच्या या वादाचा इतिहास बराच जुना आहे; पण, सध्या सुरू असलेल्या तणावामागे काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण सामरिक म्हणजे युद्धविषयक आहे. चीन आणि भारत हे दोन असे देश आहेत ज्यांच्या सैन्याची संख्या जगभरात पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकांची आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सीमाभागांमध्ये सुरू असलेलं बांधकाम हे तणावाचं एक मोठं कारण असू शकतं. वाहतुकीची सोय व्हावी म्हणून सरकार इथे रस्ते बांधत आहे. त्यावरून धास्तावलेल्या चीनने सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण केलं.

सरंक्षणतज्ज्ञ अजय शुक्ला सांगतात, एरवी शांत असलेलं गलवान खोरं अलीकडे एक वादग्रस्त क्षेत्र बनलं. कारण, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा इथेच आहे. भारतानं श्योक नदी ते दौलत बेग ओल्डी (डिबीओ)पर्यंत एका रस्त्याचं बांधकाम केलं आहे. लडाखच्या एलएसीजवळचा हा भाग सर्वात दुर्गम आहे. जवळपास सर्वच जाणकारांच्या मते, चीनच्या सीमाभागात विकासाची मोठी आणि चांगली कामं झाली आहेत. तिथे मूलभूत सुविधा पोहोचवण्यात चीन भारतापेक्षा कायम पुढे राहिला आहे. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांच्या मते चीन अस्वस्थ असण्यामागे आणखी एक कारण आहे. चीनच्या सैनिकांची क्रिपिंगची रणनीती आहे. (रांगत पुढं सरकणं). अशा हालचाली चालू करून ते वादग्रस्त भाग हळूहळू आपल्या अधिकारक्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात; पण, ही शक्यता आता कमी होत चालली आहे. कारण, भारतीय सीमा भागांमध्ये विकास होत असून, संपर्कक्षमताही वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सीमा अधिक सुरक्षित बनवण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं आहे. याआधीही भारतीय सीमेवर दोन्ही देशांकडून छोट्या-मोठ्या कारवाया होत होत्या. 2013 आणि 2014मध्ये चुमार या ठिकाणी अशा घडामोडी घडल्या होत्या. भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेजवळ पूल आणि एअर स्ट्रिप बनवण्याचं काम हाती घेतल्यामुळे चिनी सैन्याच्या कथित हालचाली वाढल्या असाव्यात. परिणामी, भरतीय सैन्याला गस्त वाढवावी लागली.

यातून उभ्या राहिलेल्या वर्चस्वाच्या लढाईत ताजा संघर्ष झडला आहे. एव्हाना मोदींनी गर्भीत इशारा देत चीनला समजणार्‍या भाषेत उत्तर देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मात्र, हा इशारा देण्याची वेळ सीमारेषांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आली काय, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. आपण आपल्या सीमा राखण्यात अपयशी ठरल्याचा या अनुषंगाने होणारा आरोप सत्ताधार्‍यांना धुवून काढावा लागणार आहे, हेही खरंच.

प्रा.डॉ.विजयकुमार पोटे

 

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस