जून-जुलै महिन्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर आसाम, बिहारमधली जनता जीव मुठीत धरून बसते. पाऊस कोसळू लागल्यावर आसाममधली ब्रह्मपुत्रा आणि बिहारमधून वाहणारी गंगा नदी रौद्र रुप धारण करते. संपूर्ण आसाममध्ये ब्रह्मपुत्रेचं पाणी शिरतं. हजारो लोक बेघर होतात, सर्वस्व गमावतात. स्थलांतरितांचा आकडा लाखोंच्या घरात जाऊन पोहोचतो. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. माणसंच नाही तर प्रसिद्ध अशा काझीरंगा अभयारण्यातले प्राणीही प्राणास मुकतात. या मुक्या जीवांची अवस्था अगदी बिकट होऊन बसते. उभी पिकं पाण्यात वाहून जातात. आसाममधल्या पुराची दृश्यं आपण दरवर्षी बघतो. तिथल्या माणसांची, प्राण्यांची केविलवाणी अवस्था पाहून उसासे टाकतो. यंदाही आसामच्या 33 जिल्ह्यांमधल्या 57 लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. माणसं आणि प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यंदाच्या मान्सूनमधली ही पुराची पहिलीच लाट असून, अशा अजून दोन लाटा येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. पुराच्या पहिल्याच लाटेने आसामचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आसामच्या भौगोलिक रचनेमुळे हा भाग पूरप्रवण बनला आहे. वर्षानुवर्षे इथे हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. उपाययोजना होतात. पण, त्या थिट्या पडत चालल्या आहेत. दरवर्षी येणार्‍या पुरामागे निसर्गनिर्मित कारणांप्रमाणेच मानवनिर्मिती कारणंही आहेत. मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. पाण्याचा निचरा होण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकले आहेत. इमारती बांधून, भराव टाकून, नदीपात्रातली माती उपसून माणूस आपल्याच विनाशाला निमंत्रण देतो आहे. गेल्या वर्षी पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात मोठा पूर आला होता. मात्र, या सगळ्या घटनांमधून माणूस कोणतेही धडे घेताना दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी पुराची तीव्रता वाढत चालली आहे.

आसाममधल्या परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी या पुरामागची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. मान्सून काळात या राज्यात पाऊस अक्षरश: कोसळत असतो. ब्रह्मपुत्रा नदीची रचनाही इथल्या पुराला कारणीभूत ठरते. ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनववाहिनी असली तरी तिच्या अतिप्रचंड आकारामुळे इथे पूर येतो. ब्रह्मपुत्रेचं 5,80,000 चौरस किलोमीटर पात्र भारतासह चीन, बांगलादेश आणि भूटान या देशांमध्ये पसरलं असून, प्रत्येक देशाची रचना आणि तिथलं वातवरण परस्पर भिन्न आहे. ही नदी मोठ्या प्रमाणावर गाळ घेऊन येते. ब्रह्मपुत्रेचा उगम तिबेटमध्ये होतो. इथूनच नदीत मोठा गाळ निर्माण होतो. तिबेटमधलं अतिथंड वातावरण, झाडाझुडपांची कमतरता, जमिनीची धूप, वितळणारे हिमनग यामुळे ब्रह्मपुत्रेत गाळ साठू लागतो. ब्रह्मपुत्रेचं पाणी आसाममध्ये पोहोचताच राज्याच्या भौगोलिक रचनेमुळे मोठ्या प्रमाणावर गाळ साचायला सुरूवात होते.  यामुळे जमिनीची धूप होऊ लागते. परिणामी, पूरपरिस्थिती उद्भवते. आसाम चारही बाजूंनी  टेकड्यांनी वेढलेलं आहे. ब्रह्मपुत्रा उंचवट्यांवरून सपाट भागाकडे वाहत असल्याने पाण्याची गती अचानक कमी होते आणि पात्रातला सगळा गाळ आसामच्या भूभागावर पसरतो आणि पूर येतो. त्यातच आसाम हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या पात्राला स्थैर्य लाभत नाही. आसाममध्ये 1950 मध्ये मोठा भूकंप आला होता. यानंतर पूर्व आसाममधल्या दिब्रूगढ भागातल्या ब्रह्मपुत्रेच्या पातळी दोन मीटरने वाढल्याची नोंद करण्यात आली होती. ही सगळी नैसर्गिक कारणं पुराला कारणीभूत ठरतातच; शिवाय यात मानवनिर्मित कारणांची भर पडत चालली आहे.

ब्रह्मपुत्रेच्या पात्रालगत निर्माण होणार्‍या वसाहती, बेसुमार जंगलतोड, प्राण्यांचे नष्ट होणारे अधिवास, वाढती लोकसंख्या यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ तयार होऊन  पूरपरिस्थिती निर्माण होते आहे. या गाळामुळे नदीपात्रात तात्पुरती बेटं तयार होतात. या भागात मानवी वसाहती तयार केल्या जातात. यामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होऊ लागतात. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि या सगळ्याची परिणिती पुरात होते. हे एखाद्या वर्षी होतं असं नाही तर दरवर्षीच ही परिस्थिती पाहायला मिळते. आसामवासियांसाठी पूर नवा नाही. इथे दरवर्षी पूर येतो आणि त्याची मानसिक तयारीही झालेली असते. मात्र, एखाद्या वर्षी  पूराचं थैमान पाहायला मिळतं. प्रचंड नुकसान होतं. 1988,1998 आणि 2004 ही तीन वर्षे आसाममध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झालं. 2004 मधला पूर त न भूतो न भविष्यती असाच होता. जवळपास 12.4 दशलक्ष लोकांना या पुराचा तडाखा बसला, तर 251 लोकांनी जीव गमावला. यंदा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पुराचा तडाखा बसणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आत्ता कुठे पुराला सुरूवात झाली आहे. पुढचा काळ खूप कठीण असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पुराने रौद्र रुप धारण केलं तर 2020 ची गणनाही पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या वर्षात केली जाईल.

ही परिस्थिती रोखण्यासाठी, पुराला आळा घालण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नाहीत का, असा प्रश्‍न उपस्थित होणं अगदी स्वाभाविक आहे. ब्रह्मपुत्रेच्या पात्राला रोखण्यासाठी सरकारने बराच पैसा खर्च केला आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये जवळपास 30 हजार कोटी रुपये खर्च करून ब्रह्मपुत्रेच्या आणि तिच्या उपनद्यांच्या किनार्‍यालगत तटबंदी उभारण्यात आली. जवळपास 4500 किलोमीटर परिसरात हे बांधकाम करण्यात आलं. मात्र, यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिकट बनली. मात्र, अशा पद्धतीने तटबंदी उभारल्यामुळे किंवा नदीपात्रात भराव टाकल्यामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात आणि नद्यांची पातळी वाढून प्रवाहाची गतीही वाढते, असा इशारा अमेरिकेतील सिव्हिल इंजिनिअर चार्ल्सल इलेट ज्युनियर यांनी एकोणीसाव्या शतकातच दिला होता. त्यावेळी एलेट यांच्या वक्तव्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. मात्र, आता त्यांच्या या दूरदृष्टीची कल्पना येऊ लागली आहे. इलेट यांच्या मतांचं महत्त्व सर्वांना पटू लागलं आहे. मात्र, आत्तापर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. अर्थात, या भरावांमुळे प्रत्येकवेळी नुकसानच होतं असं नाही तर यामुळे गावाचं संरक्षण झाल्याची उदाहरणंही आहेत. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किनार्‍यावरील दिब्रूगढ गावाचं उदाहरण घेता येईल. किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्यामुळे या गावाचं पुरापासून संरक्षण झालं आहे. दुसरीकडे पात्रा गाव नावाच्या गावामध्ये पुरामुळे मोठं नुकसान होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. हे गाव दिब्रूगडपासून फार लांब नाही. इथे कोणताही भराव टाकण्यात आलेला नाही. पूर आल्यानंतर एकीकडे दिब्रूगडचं संरक्षण होतं तर दुसरीकडे इथल्या भरावामुळे पुराचं सगळं पाणी पात्रा गावाकडे वळतं आणि इथल्या लोकांना प्रचंड नुकसान सोसावं लागतं. आसाममधल्या एका गावचे गावकरी आनंदात असतात, तर अगदी काही अंतरावरील दुसर्‍या गावातले गावकरी मात्र नरकयातना भोगत असतात, असा विरोधाभास आसाममध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतो.

नदी किनार्‍यांलगतच्या भरावांमुळे पूरपरिस्थिती बिकट होत असताना, तटबंदी बांधण्याचा अट्टाहास कशासाठी केला जातो, असा प्रश्‍नही उपस्थित होतो. हे सगळं राजकीय फायद्यासाठी तसंच खासगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी केलं जात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. भराव बांधण्याची कंत्राटं मिळाल्यानंतर कंपन्यांना भरपूर फायदा होतो आणि याच कारणामुळे इथे अशा पद्धतीने भराव बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. नागरिकांच्या जीवितापेक्षाही राजकीय तसंच आर्थिक लाभांना महत्त्व दिलं जात असल्याचं विदारक चित्र अस्वस्थ करून जातं. त्यातच आसाममध्ये वारंवार होणारं भूस्खलन आणि पाणी तसंच कचर्‍याचा निचरा होण्याची चुकीची व्यवस्था यामुळे या तटबंदीचा पाया डळमळीत होत आहे. इथल्या जवळपास 80 टक्के तटबंदीची नीट देखरेखही होत नसल्यामुळे पडझड सुरू असते. अशा परिस्थितीत पुरावर नियंत्रण मिळवणार तरी कसं आणि होणारं नुकसान टळणार तरी कसं? त्यातच आसाममध्ये नदी किनार्‍यांलगत मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आलं आहे. अनिर्बंध वसाहती वसवण्यात आल्या आहेत. या सगळ्यात नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन, योग्य तो अभ्यास करून बांधकामं करण्यात आली असती तर पुरावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं असतं. मात्र इथल्या राज्यकर्त्यांना, प्रशासनाला पिस्थिती बदलण्यात अजिबात स्वारस्य नसल्याचं दिसतंय. पुढच्या काळात पूरपरिस्थिती अधिकाधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे वेळीच हालचाल करणं आवश्यक आहे. पूर पूर्णपणे रोखता आला नाही तरी नुकसानाची तीव्रता कमी करता येऊ शकते. यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवायला हवी. किनार्‍यालगतच्या बांधकामांना परवानगी नाकारायला हवी. तसंच पुराची सगळी माहिती लोकांपयर्र्त वेळेत पोहोचवण्याची सोय करायला हवी. गरज असेल तरच तटबंदी उभारावी. या उपाययोजना केल्यास आसामला पुराच्या तडाख्यापासून नक्कीच वाचवता येईल.

अवश्य वाचा