लग्न म्हणजे धूमधडाका... मजा, मस्ती, धमाल. हळद, मेहंदी, संगीत, मुख्य लग्नसोहळा आणि स्वागत समारंभ अशा कार्यक्रमांची रेलचेल. खरेदीची लगबग, पत्रिका छापण्याची घाई आणि पाहुण्यांची यादी करण्याचं मोठं आव्हान. या सगळ्यावर खर्च होणारा अमाप पैसा. आयुष्यात फक्त एकदाच होणार्‍या लग्नासारख्या सोहळ्यात नवरा-नवरीसह प्रत्येकालाच हौस पुरवायची असते. लग्न ठरल्यापासूनच त्याची तयारी सुरू होते. कोणता पेहराव करायचा, काय थीम ठेवायची याच्या चर्चा रंगू लागतात. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होतो. आमंत्रणांची यादी काही केल्या संपत नाही. घरी पाहुण्यांची वर्दळ असते. अनेकविध पदार्थांचा सुगंध दरवळत असतो. नुसती गडबड सुरू असते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रकोपानंतर हे सगळं थांबलं आहे. लग्न सोहळ्यांमधल्या उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत.

आता फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पाडायचा असल्यामुळे खर्चही कमी झाला आहे. लाखो रुपयांची लग्नं अवघ्या 50 हजार रुपयांमध्ये उरकली जात आहेत. अर्थात, कोरोना असला तरी कार्यालयं, बॅक्वेट्स तसंच हॉटेल्सनी यातूनही व्यवसायाचा अनोखा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी 50 हजार रुपयांची पॅकेजेस आणली आहेत. लग्न कितीही साध्या पद्धतीने करायचं म्हटलं तरी काही लाख रुपये खर्च करावेच लागतात. मात्र, आता लग्न 50 हजारांमध्ये उरकावं लागत असल्यामुळे विशेषत: वधूपित्याला दिलासा मिळाला आहे. खरं तर, 50 हजारांत लग्न करण्याची टूमच निघाली आहे. या कमी खर्चातल्या लग्नात मजा-मस्तीची, करमणुकीची अजिबात कमतरता नाही. 50 हजारांच्या पॅकेजमध्ये हॉलची सजावट, गुरूजी, जेवणासोबतच ढोलताशेही उपलब्ध करून दिले जात आहेत. यामुळे थोडं गाणं-बजावणंही होऊन जातं. या छोट्या पॅकेजमध्ये वेलकम ड्रिंक आणि स्टार्टर्सचाही समावेश आहे. म्हणजे, खर्‍या अर्थाने हे अत्यंत परिपूर्ण असं पॅकेज म्हणता येईल.

कोरोनाकाळातल्या लग्नांमध्ये दोन्ही पक्षांकडून एकूण 50 पाहुणे सहभागी होत आहेत. मुलीकडचे 25 आणि मुलाकडचे 25 अशी विभागणी केली जाते. आता इतर नातेवाईकांचं, पै-पाहुण्यांचं काय... तर त्यावरही उपाय आहे. सध्या मिटिंग्ज, गेट टूगेदर सगळं काही ऑनलाईन किंवा व्हर्च्युअली सुरू आहे. झूम, गूगल मिटसारखी अ‍ॅप्स त्यासाठीच तयार करण्यात आली आहेत. इतर मंडळी झूम किंवा अन्य अ‍ॅप्सच्या माध्यमातून लग्नसोहळा अनुभवतात. आपापल्या घरातूनच वधूवरांना आशीर्वाद देतात. यासाठी हॉटेल किंवा बँक्वेट्सतर्फे कॉम्प्युटर, लॅपटॉप उपलब्ध करून दिले जात आहेत. लग्नाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही तरी व्हर्च्युअली सगळं काही एंजॉय करता येतं. संगीत सोहळ्यासाठी व्हर्च्युअली नृत्य शिकवलं जातं. लग्नादरम्यान स्क्रीनवर हे नृत्य दाखवलं जातं. व्हर्च्युअल स्क्रीनिंगच्या माध्यमातून संगीत सोहळा पडतो. लग्नात वधूवरांसह फोटो काढले जातात. पण, व्हर्च्युअली सोहळा अनुभवणार्‍यांनी काय करायचं? सध्याच्या तांत्रिक युगात काहीच अशक्य नाही. कार्यस्थळी सेल्फी पॉईंट्स तयार केले जातात. झूमसारख्या अ‍ॅपमध्ये फोटो काढण्याची सोय आहे. या सेल्फी पॉईंट्सवर कॉम्प्युटरवरुन सोहळा पाहणार्‍या व्हर्च्युअल पाहुण्यांचे फोटो काढले जातात. हे फोटो त्यांना मेल केले जातात. लग्नामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सजावटीच्या वस्तूंपासून पाहुण्यांचे हात सॅनिटाईज केले जातात. खाद्यपदार्थ बनवतानाही पूर्ण खबरदारी घेतली जाते. पाहुण्यांच्या शरीराचं तापमान तपासूनच त्यांना मंडपात प्रवेश दिला जातो.

99,499,999 रुपयांना वस्तू मिळतात. त्याचप्रमाणे आता 49,999 रुपयांमध्ये लग्नाचं पॅकेज तयार करण्यात आलं आहे. लग्नासाठी 15 ते 20 लाख रुपयाचं बजेट असणार्‍यांनी या स्मॉल बजेटमधल्या लग्नाला प्राधान्य दिलं आहे. खरं तर, लग्नांमधला डामडौल काही काळाचा आनंद देतो. मात्र, त्यानंतर नवविवाहित दांपत्याला संसार सुरू करायचा असतो. लग्नसोहळ्यांवर  पाण्यासारखा पैसा खर्च करण्यापेक्षा याच पैशांमध्ये वधुवरांचं भविष्य सुरक्षित करता येऊ शकतं. लग्न कमी खर्चात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करणं ही संकल्पना आजच्या काळात कालबाह्य झाली आहे. लग्न म्हटलं की भरपूर खर्च हेच समीकरण दृढ झालं आहे. मात्र, कोरोनामुळे का होईना, लग्न कमी खर्चात उरकता येतं हे आपल्याला कळून चुकलं आहे. त्यामुळे लग्नासाठी भारंभार कर्ज घेण्यापेक्षा आपल्या ऐपतीनुसार या पद्धतीनेही लग्न आयोजित करता येऊ शकतं. कोरोना काळानंतर 50 हजारांच्या लग्नांचा ट्रेंड रूजला तर आश्‍चर्य वाटायला नको. कोरोनामुळे आज प्रत्येकजण स्वत:ला जपत आहे. वारंवार हात धुणं, मास्क घालणं, गर्दी टाळणं, लोकांपासून लांब राहणं हे सगळं आता आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलं आहे. या गोष्टी अंगवळणी पडत आहेत. स्वत:सोबतच आप्तांचीही काळजी घेतली जात आहे.

कोरोनावर औषध किंवा लस नाही. म्हणूनच रोगप्रतिकारशक्तीच्या बळावरच या विषाणूवर मात करायची आहे. कोरोनाने जीवनशैलीत मोठा बदल घडवून आणला आहे. व्यायामाचे व्हर्च्युअल क्लास सुरू आहेत. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी योगासनं तसंच श्‍वसनप्रकार शिकवणार्‍या क्लासचं ऑनलाईन आयोजन केलं जात आहे. येत्या काळात जीम किंवा वॉकला जाण्याऐवजी ङ्गघरच्या घरी व्यायामफ ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. घरातच आपल्या सोयीच्या वेळेनुसार व्यायाम करणं सुखावह वाटू लागलं आहे. यानिमित्ताने अनेकांना अर्थार्जनाचा मार्गही गवसला आहे. विविध कंपन्याही प्रतिकारक्षमता वाढवणारी उत्पादनं बाजारात आणत आहेत. लोकांचा जंक फूडकडे असणारा ओढा कमी होत आहे. शरीराला हानिकारक पदार्थ खाण्यापेक्षा आरोग्यदायी पदार्थ खाण्यावर लोकांचा भर आहे. हीच बाब लक्षात घेऊन हळद, तुळस, आलंयुक्त दूध बाजारात आलं आहे. सीसीडी, स्टारबक्स, चायोस अशा कॉफी शॉप्सनीही आरोग्यदायी पदार्थ सादर केले आहेत. रेस्टॉरंट्सचं मेनू कार्ड बदलत आहे. हळदीचा, ओवा घातलेला, गवती चहा, काश्मिरी कहावा, अँटी कोरोना चहा, हर्ब्ज अँड सीड ब्रेड, नाचणीचे टॅकोज, च्यवनप्राश आईस्क्रीम अशी उत्पादनं, खाद्यपदार्थ, पेयं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

रेस्टॉरंट्समध्ये आता कोल्डल्ड्रिंक्सऐवजी आयुर्वेदिक काढे मिळू लागले आहेत. अगदी पंचतारांकित हॉटेल्सही मेनूमध्ये बदल करत आहेत. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आरोग्यदायी खिचडी त्यांच्या मेनूचा भाग झाली आहे. काही हॉटेल्स ग्राहकांना अँटी कोरोना ज्यूस देत आहेत. मिठायांमध्येही वैविध्य बघायला मिळत आहे. रोगप्र्रतिकारक क्षमता वाढवणार्‍या मिठाया सादर होत आहेत. त्यात इम्युनिटी संदेश हा प्रकार लोकप्रिय झाला आहे.  हा संदेश बनवण्यासाठी 15 औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाने आपल्या प्रत्येकाला एक धडा दिला आहे. निरोगी राहणं आणि रोगप्रतिकारक  क्षमता वाढवणं किती गरजेचं आहे हे आता लोकांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारणं योग्य ठरणार आहे.