विनोबांनी वयाच्या 28 व्या वर्षांपर्यंत पत्रव्यवहार सोडल्यास विशेष असे लेखन केले नाही. 1923 साली महाराष्ट्र धर्म नावाच्या मासिकामध्ये त्यांनी उपनिषदांवर लेखमालिका लिहून आपल्या लेखनकार्यास सुरुवात केली. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी अव्याहतपणे प्रचंड अध्ययन व वाचन केले. बडोदा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या बरोबरच्या मुलांचा अभ्यास वर्ग चालवला.वाचनालय सुरू केले व या अंतर्गत ग्रंथांचे वाचन, अध्ययन चर्चासत्रे व्याख्याने असे कार्यक्रम ते आयोजित करीत असत. त्यांना ज्ञानार्जनाची अखंड ओढ लागलेली होती. त्यामुळे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य, मनुस्मृती, पातंजल योगदर्शन, न्यायसूत्रे, याज्ञवल्क्यस्मृती, वैशेषिक सूत्रे, अशा प्राचीन संस्कृत ग्रंथांचे अध्ययन व पठन केले होते. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील संत साहित्य व चिपळूणकर, टिळक, आगरकर, राजवाडे यांनी लिहिलेली वैचारिक ग्रंथसंपदा याचाही अभ्यास व चिंतन विनोबांनी केलेले होते. अशा या प्रगाढ, प्रगल्भ अध्ययनाची सोबत घेऊनच विनोबा लेखन क्षेत्रात आले होते. अशा प्रकारे अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता व प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत मिळविल्यानंतर विनोबा महाराष्ट्र धर्म मासिकात लेख लिहू लागले.

दरम्यान, त्यांनी झेंडा सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आले तेव्हा महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिक झाले होते. त्यानंतर विनोबांनी 1924 ते 1927 अशा तीन वर्षांत महाराष्ट्र धर्म साप्ताहिकात 222 निबंध लिहिले. टिळक, आगरकर आदींच्या भाषेचे संस्कार आणि गांधीजींच्या विचारांचा प्रभाव या दोन्हीतून विनोबांचे लेखन तयार झालेलं आहे. शिवाय, जुन्या शब्दांना नवा अर्थ देण्याची विनोबांची अपूर्व शैलीही आहेच. महाराष्ट्रधर्ममध्ये लिहिलेल्या लेखांतील निवडक लेखांचा संग्रह मधुकर या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध झाला. मधुकर हे विनोबांचं पहिलं व अजरामर झालेलं पुस्तक आहे. विनोबांनी वेगवेगळ्या विषयांवर यात लेखन केलं आहे. विनोबांच्या निबंधांविषयी वि.स. खांडेकरांनी लिहिलं आहे की, विनोबांचे निबंध हे जणू काही विसाव्या शतकातील एखाद्या संताचे गद्य अभंगच आहेत. ज्योतिराव किंवा लोकहितवादी यांच्यासारखी त्यांच्या मनाची बैठक आहे. पण, त्यांच्या पुढचे प्रश्‍न विशाल, त्यांचे तत्त्वज्ञान व्यापक व त्यांची वाणी उपनिषदे आणि ज्ञानदेवी यांच्या संस्कारांनी प्रभावित झालेली आहे. प्रज्ञा व प्रतिभा यांचा संगम विनोबांच्या निबंधात अनेक ठिकाणी आढळता  याच मधुकर विषयी पु.ल. देशपांडे म्हणतात, मधुकर हा विनोबांचा निबंधसंग्रह, मात्र मनाला चिकटून बसला आहे त्यातल्या विचारांनी, त्यांच्या सूतकताई करणार्‍या हाताने काढलेल्या सुतासारख्या पांढर्‍याशुभ्र शैलीने, त्या काळात जसा मी मोहून गेलो, तसा आजही जातो. मधुकर मध्ये अगस्तीऋषी, तानाजी, राजवाडे आदी महापुरुषांवरील अनेक निबंध आहेत. तसेच विनोबांच्या मनातील स्वावलंबी, स्वयंपूर्ण खेड्याचे वर्णन करणारे लेखही आहेत. विनोबांच्या शिक्षण विचारांवर प्रकाश टाकणारे लेख आहेत, तसेच अनेक सामाजिक प्रश्‍नांवरचे लेखही आहेत. खादी, राष्ट्रीय शाळा, अस्पृश्यता, हिंदू-मुस्लीम संबंध, स्वराज्य, ग्रामोद्योग, समाज कार्यकर्त्यांचे प्रश्‍न, असे विविध विषयांवरील लेख आहेत. या सर्वच विषयांच्या संदर्भातले अतिशय मूलभूत विचार विनोबा मोठ्या खुबीने आणि ताकदीने या निबंधातून मांडतात. प्रचलित शब्दांचे नवीन अर्थ सांगण्याची विनोबांची शैली अद्वितीय आहे. त्यांच्या लेखनातील हा गुण बहुसंख्य वाचकांची मने जिंकून घेतो. सहित म्हणजे संगतीने चालणारे यावरून साहित्य शब्द बनला आहे, हिंसेने दुःखी होतो तो हिंदू, आत्म्याचे आयुष्य वाढविणारा तो वर्धमान, मत म्हणजे मनाचे म्हणणे, अशा पद्धतीने विनोबा शब्दांचे अर्थ स्पष्ट करतात. तर, काही ठिकाणी अर्थ स्पष्ट करण्यासाठी गणिती प्रकारची सूत्रेही मांडतात. मधुकर मधील त्यांच्या निबंधांमध्ये तत्कालिन घटना, व्यक्ती, यांचा तपशील व संदर्भ फारसे नसल्याने हे निबंध हे आजच्या काळालाही अनुरूपच वाटतात.

विनोबांचा  गीताई  हा भगवद्गीतेचा समश्‍लोकी मराठी अनुवाद. हे त्यांचे आणखी एक अजरामर पुस्तक आहे. गीताई लिहिण्यामागची विनोबांची प्रेरणा त्यांची आई होती. आईला संस्कृत भाषेतील भगवद्गीता कळत नसल्यामुळे तिने विनोबांकडे मराठीतील सोपा अनुवाद करण्याची मागणी केली होती. त्यासाठीच विनोबांनी गीताई लिहिली. गीताईतील भाषा साधी, सोपी व सरळ असेल, हे विनोबांनी कटाक्षाने पाहिले. लिहून झालेले श्‍लोक विनोबा महिलाश्रमातील भगिनी व छोट्या मुलांना म्हणायला सांगत व त्यांना जिथे कठीण जाई, तो भाग सोपा करुन पुन्हा लिहीत. आजपर्यंत गीताईच्या 263 आवृत्त्या व 40 लाख 71 हजार प्रती निघाल्या. दरवर्षी सरासरी 50 हजार प्रती विकल्या जातात. यावरून गीताईची लोकप्रियता आपल्या लक्षात येईल. विनोबा 1932 मध्ये धुळ्याच्या तुरुंगात होते. तुरुंगात असले तरी विनोबांच्या आश्रमीय वेळापत्रकात काही बदल होत नसे. त्यांचे अध्ययन, अध्यापन, सूतकताई व अन्य श्रमकार्ये अव्याहतपणे सुरु असत. विनोबा जिथे असत, तिथे तुरुंगालाच आश्रमाचं रुप प्राप्त व्हायचं. तुरुंगातील इतर मंडळीही हळूहळू विनोबांच्या प्रमाणे राहू लागायची. धुळ्यातील तुरुंगात असताना तुरुंगातील मंडळींच्या आग्रहामुळे 22 फेब्रुवारी 1932 पासून दर रविवारी विनोबांनी गीतेच्या एका अध्यायावर प्रवचन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तुरुंगात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, साने गुरुजी आदी मान्यवरही होते. तुरुंगाधिकार्‍यांनी सर्व कैद्यांना प्रवचन ऐकण्याची परवानगी दिली होतीच; शिवाय ते स्वतः सपत्नीक प्रवचने ऐकण्यासाठी येत असत. संपूर्ण तुरुंगातले वातावरण अध्यात्मिक भावनेने भरून केले होते. या वातावरणाविषयी विनोबांनी म्हटले आहे, की आम्ही स्वातंत्र्यसंग्रामाचे सैनिक आहोत आणि गीता प्रवचने त्यांच्यासमोर सांगितली गेली आहेत. अगदी कुरुक्षेत्राचे रणांगण आहे आणि आम्ही सगळे सैनिक आहोत, अशीच आमची भावना होती... विनोबांनी लिहिलेली गीता प्रवचने साने गुरुजींनी शब्दबद्ध करून ठेवली होती. याचेच पुढे गीता प्रवचने नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. यातील प्रवचने ही खरोखर आपल्या जीवनाचे सारच सांगणारी आहेत. हे पुस्तक वाचताना ते आपण नकळतपणे आपल्या स्वतःच्या जीवनाशी ताडून पाहू लागतो आणि क्षणभर हा अर्जुन-कृष्णातला महाभारतातला संवाद आहे, हे विसरायलाच होते. विनोबा मराठी भाषेत, सोप्या शब्दात, भगवद्गीतेचा अध्यात्मिक अर्थ समजावून सांगत. आणि, भगवद्गीता हा धर्मग्रंथ न राहता, जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा अध्यात्मिक ग्रंथ आहे, असे आपल्याला वाटू लागते. गीता प्रवचने वाचल्यानंतर खर्‍या अर्थाने गीता ही सर्व धर्मीयांची, संपूर्ण मानव जातीची, संपूर्ण विश्‍वाची होऊन जाते.

मधुकर, गीताई आणि गीता प्रवचने ही तीन अजरामर पुस्तके विनोबांनी लिहिली. ती त्यांच्या 28 ते 35 वयामध्ये लिहिली.

विनोबांचे बरेच साहित्य हे त्यांनी केलेल्या प्रवचनांचे शब्दांकन अशा स्वरुपात आहे. त्यांची वाणी ओघवती आणि विद्वत्ताप्रचुर होती. ऐकणार्‍याला मंत्रमुग्ध करुन टाकणारी होती. तेरा वर्षे भूदान पदयात्रेच्या दरम्यान त्यांनी विविध विषयांवर दिलेल्या प्रवचनांची अनेक पुस्तके झालेली आहेत. विनोबांनी आयुष्यभर वेगवेगळ्या धर्मांची व पंथांची उपासना केली आणि ती उपासना करत असताना त्या त्या धर्मांचे ग्रंथ मूळ भाषेत वाचून, त्यांचे अध्ययन करून केली. हे धर्मग्रंथ साररुपात मराठी किंवा हिंदी भाषेत अनुवादित केले. ख्रिस्त सार, कुराण सार, जपुजी, 18 उपनिषदांचे सार-अष्टादशी, गुरु बोध सार, ही त्याचीच काही उदाहरणे. विनोबांचं संपूर्ण जीवनच ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांनी व्यापलेलं आहे. या तिन्हींच्या संबंधात जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी केलेले चिंतनही पुस्तकरुपात प्रसिद्ध आहे. साम्य सूत्रेमध्ये साम्ययोगाची त्यांची कल्पना त्यांनी सूत्र रूपात मांडली आहे, ज्यामध्ये गीता प्रवचनांची 108 विषयांत विभागणी करून, जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सार मांडलेले आहे. ङ्गईशावास्य वृत्तीफ हे पुस्तक सुरुवातीला गांधीजींच्या सांगण्यावरुन विनोबांनी ईशावास्योपनिषदावर काढलेले टिपण होतं. तेच नंतर संपादित करून ईशावास्य -वृत्ती या नावाने प्रसिद्ध झालं. त्याचप्रमाणे शिक्षण- तत्त्व आणि विचार, आत्मज्ञान +विज्ञान = सर्वोदया, सत्याग्रह विचार, स्त्री शक्ती ही पुस्तके त्यांनी विविध प्रसंगी मांडलेले विचार व केलेले चिंतन एकत्र करून संपादित केलेली आहेत. ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास अशा संतांच्या साहित्याचा अभ्यास करून त्यावरील चिंतनसुद्धा विनोबांनी सार रूपात मांडलेलं आहे. अशा पद्धतीने विनोबांचे समग्र साहित्य एकत्रित करून विषयवार 21 खंड, ज्यातील प्रत्येक खंड सरासरी 500 पानांचा असेल, प्रसिद्ध झाले आहेत. विनोबांचे हे सारे साहित्य यासाठी महत्त्वाचे आहे, की ते त्यांच्या मूलभूत चिंतनातून निर्माण झालेले आहे.

धार्मिक ग्रंथांवर त्यांनी केलेले भाष्यदेखील मूळ ग्रंथ अभ्यासून केलेले असल्यामुळे ते सत्याच्या कसोटीवर करणारे आहे. शिवाय, त्यांनी मांडलेले सामाजिक किंवा अध्यात्मिक विचार व चिंतन हे त्यांनी स्वतःच्या कृतीने व स्वतःवर अनेक प्रयोग करून तावून सुलाखून सिद्ध केलेले आहेत, त्यामुळे ते सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे. त्यामुळे विनोबांचे संपूर्ण साहित्य हे सत्य-सुंदर-मंगलाच्या आरशात ज्ञान- कर्म-भक्तीचे पडलेले प्रतिबिंबच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

अवश्य वाचा