अंबिका प्रिंटर्स अँड पब्लिकेशनचे मालक संस्थापक आणि दैनिक पुण्यनगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, कर्नाटक मल्या, यशोभूमी अशा वृत्तपत्रांचे संस्थापक संपादक मला पितृतुल्य असणारे शिंगोटे बाबा यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि प्रचंड धक्का बसला.  शून्यातून वृत्तपत्रसृष्टी उभी करणारा वृत्तपत्र जगतातला महामेरू असाच उल्लेख शिंगोटे बाबांचा करावा लागेल. त्यांची आणि माझी जन्मभूमी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका. छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी माझे पिंपळगाव (नारायणगाव) आणि बाबांचे उंब्रज गाव. बाबांना शिवनेरी भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तो समस्त पुणे जिल्हा रहिवाशांसाठी परम आनंदाचा क्षण होता. माझी सासूरवाडी उंब्रजची हांडे यांची. बाबा उंब्रजचे असल्यामुळे ते मला जावईबापू म्हणत. माझ्या पत्रकारितेच्या कळत्या वयापासून मी वृत्तपत्र सृष्टीतली बाबांची किमया पाहात आलो आहे. माझे आधी वास्तव्य असलेल्या घोडपदेव डी.पी. वाडी भागात बाबांचे मुंबई चौफेरचे कार्यालय होते. या कार्यालयात मी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासमवेत बाबांना अनेक वेळा भेटलो. वाचकांची अचूक नाडी माहीत असलेल्या आचार्य अत्रे यांच्यानंतर संस्थापक संपादक असलेले शिवनेरकार विश्‍वनाथराव वाबळे आणि मुंबई चौफेरकार मुरलीधर तथा बाबा शिंगोटे यांची जातकुळी एकच. दोघेही पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातले आणि या दोघांबद्दल नवा काळकार निळू भाऊ खाडिलकर यांना प्रचंड आदर होता. बाबांना केवळ वाचकांची अचूक नाडी माहीत होती असे नाही, तर बातमीमागची बातमी आणि बातमीचे बलस्थान त्यांच्याइतके खचितच कोणाला माहीत असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील एखादी बातमी ऐकली की, ती बाबांच्या डोक्यात फिट बसे आणि त्या एका वाक्याच्या बातमीवर इंट्रोसह पूर्ण बातमी बाबा डिक्टेक करीत असत. हे मी प्रत्यक्ष त्यांच्या भेटीत अनेकदा पाहिले आहे. राजकरण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, चित्रपट क्षेत्र.. बाबांना बातमीसाठी कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसे. कारण, त्यांच्या डोळ्यासमोर सर्वसामान्य वाचक असे. रस्त्यावरच्या भाजीवालीलाही आपला पेपर वाचता आला पाहिजे आणि त्यातल्या बातम्या समजल्या पाहिजेत, असा बाबांचा कटाक्ष असे.  स्टॉलवरचा पेपर केवळ बातम्यांनीच उचलला जातो असे नाही, तो आकर्षक लेआऊट असला की जरूर उचलला जातो, असा बाबांचा ठाम विश्‍वास असायचा.  या विश्‍वासातून त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत साम्राज्य उभे केले. खपाचे नवे नवे विक्रम मोडले. त्या दृष्टीने बाबा म्हणजे वृत्तपत्र सृष्टीतील विक्रमादित्यच होते.

पुण्याच्या कार्यालयात, मुंबईच्या लालबागच्या कार्यालयात अनेकवेळा बाबांची भेट होत असे.  प्रत्येक वेळी ते सर्क्युलेशनचे गणित समजावून सांगत. इतकेच काय, सकाळच्या कुठल्याही वेळेत किती पेपर संपतात याचा हिशेब बाबांच्या तोंडावर असे. बाबा जाहिरातीबद्दल खूप कमी बोलत. त्यांचा एकच ध्यास, कॉपी वाढली पाहिजे. कॉपी वाढवणारे निवासी संपादक त्यांच्या गळ्यातले ताईत होत.  मी पुण्यनगरीत सातत्याने लिहावे, असा त्यांचा आग्रह असे. तुम्ही नवशक्ती, लोकसत्ता, लोकमतसारख्या पेपरांमधून वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. तुमचा अनुभव आपल्या पेपरला झाला पाहिजे. तुम्ही कला क्षेत्रात काम करता, त्या क्षेत्रातल्या बातम्या आणि लेख लिहीत चला असे बाबांनी मला सांगितले आणि मी पुण्यनगरीत नाट्य परीक्षण सुरु केले. पंढरपूरच्या आषाढी वारीवर लेखमाला सुरु केली. मला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार गेल्यावर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला, त्याची बातमी बाबांनी पुण्यनगरीत पहिल्या पानावर सर्व आवृत्त्यांना घ्यायला सांगितली. वर्तमानपत्र हा बाबांचा श्‍वास आणि ध्यास होता. ते अक्षरश: निशाचर होते. रात्रभर बातम्यांसाठी जगायचे. पहाटे पेपर बाहेर पडला की सर्क्युलेशनसाठी डोळ्यात तेल घालून उभे असायचे. तीन महिन्यांपूर्वी माझे त्यांचे बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले, जावईबापू, आता झेपत नाही. थकल्यासारखे वाटते. गावाकडेच असतो.

केवळ मराठी वृत्तपत्र सृष्टी नव्हे तर, कर्नाटक मल्या आणि यशोभूमीच्या रूपाने त्यांनी अन्य भाषांनाही गवसणी घातली होती. वृत्तपत्र सृष्टीत संपादक किंवा संस्थापक संपादक हस्तिदंती मनोर्‍यात राहून चालत नाही. त्याची नाळ सतत सर्वसामान्य वाचकांशी जोडली गेलेली हवी, असा अत्रे, खाडिलकर यांचा विचार बाबा शिंगोटे यांनी आपल्या जीवनात राबविला आणि वृत्तपत्र सृष्टीतले उचांक मोडले. आयका आकाशा घेव ठावे। तरी आकाशाहुनि थोरु व्हावे ही संत ज्ञानेश्‍वरांची उक्ती बाबांनी सार्थकी लावली. बाबा, तुम्ही वृत्तपत्र सृष्टीचे आकाश आपल्या कवेत घेतले आणि नवनवे विक्रम केले. तुम्हाला विनम्र श्रद्धांजली...

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन