Monday, March 08, 2021 | 09:18 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लस आणि आपण
रायगड
14-Jan-2021 06:57 PM

रायगड

 कोरोनावरील लसीचे वितरण आता देशभर सुरु झाले असून प्रत्यक्षात उद्यापासून लस टोचण्याच्या कामाला प्रारंभ होईल. यातील पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, डॉक्टरांना ही लस दिली जाईल. त्यानंतर पन्नाशीच्या पुढील वयोगटातील लोकांना लस टोचण्याचे काम हाती घेतले जाईल. सध्या सिरमचीच लस वितरीत केली जात आहे, मात्र त्याच जोडीने देशी बनावटीची भारत बायोटेकची लस देखील वितरीत केली जाणार आहे. परंतु याच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचे अहवाल अद्याप प्रसिद्ध व्हायचे आहेत. मात्र असे असले तरीही त्यांच्या लसीला केंद्राने मान्यता दिली आहे. जर त्यांच्या लसीचे परिणाम योग्य आले नाहीत तर ही मान्यता मागे घेतली जाणार आहे का, त्याविषयी मात्र सरकारने मौन पाळले आहे. असो, कोरोनाची लढाई आता त्यामुळे अंतिम टप्प्यात दृष्टीपथात दिसते आहे. एकीकडे लस आली असताना दुसरीकडे कोरोनाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे व मृत्यू पावणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. ही सर्वात समाधानाची बाब आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर ठप्प झालेले जनजीवन आता पुन्हा एकदा मार्गी लागल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. हे सर्व खरे असले तरी लसीचे वितरण समान प्रमाणात सर्व देशभरात करणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. महाराष्ट्राने आपल्याला कमी प्रमाणात लस मिळाल्याची तक्रार केली आहे. अर्थात लसीचे समान वाटप न्यायबुद्दीने करणे हे एक मोठे आव्हान केंद्रापुढे असणार आहे. तेथे राजकारण बाजुला ठेवून काम करावे लागणार आहे. कोरोना होऊ नये यासाठी कितीही खबरदारीच्या उपाययोजना केल्या तरी यावर केवळ लस हेच उत्तर होते. अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया, ब्रिटन, भारत या देशात प्रमुख्याने लशींच्या निर्मीतीवर संशोधन सुरु होते. गेल्या दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर संशोधकांनी कोरोनावरील लस शोधून त्याच्या यशस्वी चाचण्या करुन दाखविल्या आहेत. खरे तर जगात अशा प्रकारे लस ही एवढ्या कमी काळात तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण आजवर कोणत्याही रोगावरील लस तयार करण्यासाठी किमान पाच ते आठ वर्षाचा कालावधी लागतो. मात्र सध्याची कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती पाहता ही लस वर्षाच्या आत बाजारात येत आहे. यातील रशियाची स्पुटनीक ही लस दोन महिन्यांपूर्वी म्हणजे सर्वात प्रथम बाजारात आली होती. मात्र त्याच्या चाचण्याचे नेमके अहवाल त्यांनी जगापुढे मांडले नाहीत. त्यामुळे या लशीच्या यशापयशाबद्दल सर्वांनाच शंका होती. रशियाच्या बाहेरही तिचे काही वितरण झाले नाही. अमेरिकन कंपनी फायझर व जर्मन कंपनी बायोटेक यांनी संशोधीत केलेल्या लशीला ब्रिटनच्या सरकारने सर्वात प्रथम मान्यता दिली. या लशीच्या केलेल्या चाचण्यांच्या अहवालात तिचे यश 95 टक्के असल्याचे आढळले आहे. मात्र ही लस उणे 70 डिग्री तापमानाला ठेवावी लागत असल्याने तिच्या वाहतुकीवर तसेच वितरणावर अनेक मर्यादा आहेत. मात्र याचा एकच डोस दिला जातो. अन्य काही लशींना दोन डोस काही अंतराने द्यावे लागतात. ब्रिटन तसेच संपूर्ण युरोपात आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना लस पहिल्या टप्प्यात देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व भारतातील सिरम या संस्थेच्या सहकार्याने एक लस विकसीत केली गेली आहे. त्याच्या चाचण्या देखील चांगल्याच यशस्वी झाल्या आहेत. मात्र त्याचे दोन डोस द्यावे लागतात. याची एक जमेची बाजू म्हणजे यासाठी नॉर्मल तापमानात ही ठेवता येते. आजपर्यंत या लशीचे प्रयोग 24 हजार लोकांवर करण्यात आले त्यातील फक्त चार जणांना काही रिअ‍ॅक्शन आल्या. त्यामुळे ही लस देखील प्रभावी ठरत आहे. आपल्याकडे पुणे, हैद्राबाद व अहमदाबाद येथील तीन कंपन्यांमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे. यातील भारत बायोटेकची लस ही पूर्णत: देशी आहे. अन्य लशी या विदेशी संशोधकांच्या सहकार्याने तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे उत्पादन भारतात होणार आहे. या शिवाय फायझरने देखील भारतात लस वितरीत करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मोदी सरकारने यापूर्वीच आरोग्य सेवा कर्मचारी व सुरक्षा सेवेतील कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्याचे जाहीर केले आहे. ते योग्यच आहे. मात्र ही लस सरकार सर्व जनतेला मोफत देणार की केवळ गरीबांना मोफत देणार हे स्पष्ट झालेले नाही. बिहार निवडणुकीत तर भाजपाने लस मोफत देण्याचे आश्‍वासन निवडणूक जाहिरनाम्यातच दिले आहे. आता तेखील निवडणूक भाजपाने जिंकल्याने तेथील गरीब असो किंवा श्रीमंत त्यांना मोफत लस या आश्‍वासनानुसार द्यावीच लागेल. आता  प्रश्‍न उपस्थित होतो तो म्हणजे, देशातील सर्वांना लस मोफत देणार की फक्त बिहारमधील नागरिकांना देणार? मग बिहारमधील जनतेला मोफत लस दिल्यास देशातील अन्य जनतेवर अन्याय होणार का? सरकारचे यासंदर्भातील धोरण व दिशा लकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील लसींचा खर्च केंद्र सरकार उचलणार असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्यापुढील लसीचे वितरण व त्याचा खर्च कोण उचलणार हे स्पष्ट झाले पाहिजे. विज्ञानाने आपल्याला लस दिली आहे आता त्याचे वाटप समानतेने सर्वांना करणे हे केंद्र सरकारच्या हाती आहे. तसेच लस घेतली तरी सध्या बाळगल्या जाणार्‍या सुरक्षितता अजून काही काळ पाळाव्या लागणार आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top