रायगड
बॉलिवूडमधले नामवंत अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांचे धाकटे सुपुत्र आणि बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांची प्राणज्योत मालवली अन् बॉलिवूडमधील आणखी एक तारा निखळला. राजीव हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे लहान भाऊ. आपल्या भावांप्रमाणेच ते देखील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या वाट्याला फारसे सिनेमे आले नाहीत. मात्र त्यांच्या राम तेरी गंगा मैली चित्रपटाने यशाचे शिखर गाठले आणि राजीव कपूर सुपरस्टार झाले. राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त नीतू कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे दिले. आणि बॉलिवूडकरांसह चाहत्यांनाही धक्का बसला. त्यांच्या जाण्याने कपूर कुटुंबातील आणखी एक तारा आज बॉलिवूडने गमावला. त्यांची पोकळी न भरुन निघणारी आहे. राजीव कपूर यांच्या अकाली एक्झिटमुळे बॉलिवूडकरांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. एक चांगला अभिनेता, निर्माता अन् दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला. कपुर कुटूंबियांना काही महिन्यातच लागलेला हा दुसरा धक्का. ॠषी कपूर यांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा एकदा कपूर कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 1983 साली एक जान है हम या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर नाग नागीन, जलजला, जबरदस्त, मेरे साथी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटात जीव ओतून काम केले. मात्र म्हणावे तसे यश आले नाही. अपयश येत असतानाही नैराश्येत न जाता ते जोमाने काम करीत होते. प्रत्येकक्षणी नशीब आजमावत होते. ॠषी कपूर रणधीर कपूर यांच्या तुलनेत राजीव कपूर मागेच राहिले. यासाठी राजीव त्यांचे वडील राज कपूर यांना जबाबदार मानत. राज कपूर यांनी राजीव कपूरना लाँच करण्यासाठी मोठ्या दिमाखात राम तेरी गंगा मैलीची घोषणा केली. या सिनेमाने रातोरात स्टार झालेल्या राजीव कपूर यांच्या वाट्यशला नंतर मात्र फार मोठी लोकप्रियता आली नाही. पहिल्या सिनेमातसुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक चर्चा झाली त्यांच्या हिरोइनचीच आणि तेही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त सीन्समुळे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळं ते खर्या अर्थाने प्रकाशझोतात आले. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट होता. रातोरात ते सुपरस्टार झाले. चाहत्यांनीही त्यांना डोक्यावर उचलून धरले. मात्र हे यश काही कालावधीपुरतेच होते. या चित्रपटात त्यांनी नरेंद्र ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री मंदाकिनी त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या कथेने चाहत्यांना खिळवून ठेवले. अनेक चित्रपट समीक्षकांच्या मते राम तेरी गंगा मैली हा चित्रपट तत्कालीन बॉलिवूडपटांची चौकट मोडणारा चित्रपट ठरला. त्यानंतर असे अनेक चित्रपट आले. शिवाय मंदाकिनीची काही दृश्य त्या काळात खूपच वादग्रस्त ठरली. तिने दिलेल्या काही दृश्यांवर त्यावेळी जोरदार टीका देखील करण्यात आली होती. राम तेरी गंगा मैली हा 80 च्या दशकातील हा एक वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला. धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील सीन चांगलाच चर्चेत राहिला. त्यामुळे चित्रपट गाजण्याचं श्रेय मंदाकिनीला जाऊ लागलं आणि हेच राजीव कपूर यांना पचेनासं झालं. यामुळे ते राज कपूर यांच्यावर नाराज झाले होते. या चित्रपटानंतर राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एखादा मोठा प्रोजेक्ट हाती घ्यावा, अशी राजीव कपूर यांची इच्छा होती. पण तसं काही झालं नाही. यामुळे वडिलांबद्दलची नाराजी त्यांच्या मनात दिवसेंदिवस वाढत चालली होती. या नाराजीमुळे राजीव कपूर यांनी ङ्गराम तेरी गंगा मैलीफ या चित्रपटानंतर वडिलांसोबत कधीच काम केलं नाही. त्यांनी आपला मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवला. त्यावेळी असलेल्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची गरज होती. अशातच रणधीर कपुर व ॠषी कपूर यांच्याकडे अनेक चित्रपट होते. आपल्या अभिनयाच्या कौशल्यामुळे त्यांची चाहत्यांवर पक्कड होती. चाहतेदेखील त्यांच्या सिनेमांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरत होते. याउलट राजीव कपूर यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत गेलं. चित्रपटात अपयशच येत होतं. चित्रपटात अभिनेता म्हणून यश मिळत नसल्याने पुढे त्यांनी भाऊ रणधीर कपूर यांच्या मदतीने हिना, तसेच आ अब लौट चले या चित्रपटांची निर्मिती केली. अभिनय व चित्रपटांची निर्मिती करत असतानाच त्यांनी दिग्दर्शनातही आपले नशीब आजमावले. प्रेमग्रंथ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. यामध्ये भाऊ ॠषी कपूर यांनी काम केलं. मात्र सिनेसृष्टीत त्यांना फारसे यश मिळाले नाही. गतवर्षी सुशांत सिंह राजपूत, इरफान खान, ॠषी कपूर, सरोज खान, साजिद नाडियादवाला यासारख्या बड्या कलाकारांनी निरोप घेतला. या सर्वांच्याच जाण्याने बॉलीवूड हळहळले. या कलाकारांच्या जाण्याने पडद्यामागील सृष्टीलाही चटका लावला. बॉलीवूड या सार्या धक्यातून सावरत असतानाच राजीव कपूर यांनी अकाली एक्झिट घेतली. त्यामुळे कपूर कुटूंबियांसह संपुर्ण बॉलीवूड सृष्टीला या धक्क्यातून बाहेर येण्यास बळ येवो, हीच प्रार्थना.