भारतीय बाजारात ऑनलाईन कंपन्यांची स्पर्धा टोकाला पोहचली आहे. आतापर्यंत अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट अशा मोजक्या कंपन्यांची स्पर्धा होती. आता त्यात रिलायन्स आणि टाटाही उतरत आहेत. नवीन उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असणार्‍यांसाठी फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन मोठी ऑनलाइन विक्री मोहीम आखत आहेत. पुढच्या आठवड्यापासून उत्सवाचा हंगाम सुरू होणार आहे. अ‍ॅमेझॉननं सणाच्या हंगामातल्या खरेदीसाठी नुकतीच अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा केली. हा सेल 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्टचा द बिग बिलियन डेज हा विक्री महोत्सव 16 ते 21 ऑक्टोबरदरम्यान चालणार आहे. दोन दिवसांपूर्वी कंपनीनं बरीच डील्स आणि ऑफर्स उघड केल्या आहेत. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा हा वर्षातला सर्वात मोठा सेल मानला जातो.

या बिग सेलमधून स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, उपभोक्ता उपकरणं आणि फॅशन यासह जवळजवळ सर्व श्रेणींमध्ये सूट आणि सवलतींचा मारा करण्यात आला आहे. विक्रीदरम्यान, प्राइम मेंबर्स काही वस्तू अर्ध्या किंमतीतदेखील मिळवू शकतील. अ‍ॅमेझॉननं विक्रीसाठी एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना एचडीएफसी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि हप्त्यांवर 10 टक्के त्वरित सूट मिळेल. काही वस्तूंवर एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफरदेखील देण्यात येतील. मोबाइल फोन आणि अ‍ॅक्सेसरीज ईएमआय, एक्सचेंज सूट आणि एकूण नुकसान संरक्षणासह सूचीबद्ध केल्या जातील. इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणंही एक्सचेंज सवलतीत प्राप्त होतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीज प्रकारात 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. टीव्ही आणि मोठ्या उपकरण श्रेणींमध्ये विस्तारित वॉरंटी, नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर असतील. बजाज फिनसर्व्ह क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर विना-किंमत ईएमआय पर्याय उपलब्ध असेल. बजाज फिनसर्व्हदेखील या विक्रीमध्ये एक लाख रुपयांपर्यंत क्रेडिट मर्यादा देत आहे. कपड्यांवर तसंच इतर वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असून खाद्यपदार्थात 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. घर आणि किचन उत्पादनांना 60 टक्के सवलत दिली जाईल.

फ्लिपकार्टनं सहा दिवसांच्या कार्यक्रमात विद्यमान आणि नवीन ग्राहकांना अधिकाधिक उत्पादनं देण्याची हमी दिली आहे. या उत्पादनांवर सवलत मिळू शकेल. या व्यतिरिक्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि अन्य विक्रेत्यांनादेखील या बिग सेल दरम्यान विक्री वाढवण्याची संधी मिळेल. विक्रीदरम्यान पोको एम 2 प्रो, इन्फिनिक्स हॉट 9 प्रो, रिअलमी सी 12 या स्मार्टफोन्सवर एक हजार रुपयांची दणदणीत सूट मिळेल. कंपनीनं एलजी जी 8 एक्स ड्युअल स्क्रीन फोन 19,990 रुपयांमध्ये सूचीबद्ध केला आहे, जो इतर वेळी 54,990 रुपयांना विकला जातो. ही संपूर्ण 35,000 रुपयांची सूट आहे. इलेक्ट्रॉनिक्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट असल्याचा दावा या कंपनीनं केला आहे. हेडफोन आणि स्पीकर्सवरदेखील 80 टक्के सूट असल्याचा दावा केला गेला आहे. टीव्हीसह अन्य उपकरणांवर विक्री दरम्यान 75 टक्के सवलत आहे. कंपनी फॅशन, खेळणी, फर्निचर यासह अनेक प्रकारांवर सूट देईल. फ्लिपकार्टनं म्हटलं आहे की सर्वाधिक विक्री होणार्‍या लॅपटॉपवर मोठी सवलत दिली जाईल.

स्नॅपडील ही ई-कॉमर्स कंपनी  ऑक्टोबरच्या मध्यात नवरात्रात जोरदार विक्री मोहीम राबवणार आहे. याशिवाय ऑक्टोबरच्या उत्तरार्धात आणि नोव्हेंबरच्या सुरूवातीला कंपनी आणखी दोन सेल आयोजित करेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक उत्पादनांचे दर कमी असतील, असं कंपनीनं म्हटलं आहे. स्वयंपाकघरातल्या वस्तू, स्वयंपाकघरातली उपकरणं, घरातलं फर्निचर, घरगुती उत्पादनं, साडी, कुर्ती, सूट आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीज यासारख्या वस्तू, मुलांचे कपडे, घड्याळं आणि पाकीट इत्यादी वस्तू सवलतीच्या दरात विकल्या जातील. कंपनीच्या यंदाच्या दिवाळी विक्रीदरम्यान काम में दम  या थीमवर लक्ष केंद्रित केलं जाईल. निवडक बँक कार्डांद्वारे खरेदीवर अतिरिक्त सूटदेखील दिली जाईल. फ्लिपकार्टच्या भागीदार पेटीएमनं एका अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की या वर्षी उत्सवकाळातली विक्री जवळपास दुप्पट होईल. मागील वर्षातल्या याच कालावधीतल्या 8.8 अब्ज डॉलर्सच्या विक्रीच्या तुलनेत एकूण व्यापारमूल्य सात अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल.

दोन वर्षांपूर्वी भारतात ई-रिटेल क्षेत्राचा वाटा तीन टक्के होता, तो आता पाच टक्क्यांवर गेला आहे. भारतात रिटेल क्षेत्रात असंघटित आस्थापनांची संख्या 85 टक्के एवढी असून हे क्षेत्र सुमारे 7 कोटी छोटे व्यापारी तसंच दुकानदारांचा चरितार्थ चालवतं. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा दहा टक्के आहे. रिटेल क्षेत्रात इ-कॉमर्स क्षेत्राचा वाटा पाच टक्के असला, तरी त्यात झपाट्यानं वाढ होत आहे.

नवीन नियमामुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला क्लाउडटेल आणि डब्ल्यूएस रिटेल या आपल्या उपकंपन्यांतून निर्गुंतवणूक करावी लागली. असं असूनही या कंपन्या स्पर्धात्मकतेबाबतच्या कायद्यांचं नियमितपणे उल्लंघन करतात, असा आरोप लघु आणि मध्यम व्यापार्‍यांच्या संघटनांकडून केला जातो. याचाच अर्थ अ‍ॅमेझॉनला किंवा कोणत्याही व्यापार्‍याला एखादी गोष्ट शंभर रुपयांना पडत असेल तर ती गोष्ट एका ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्यापेक्षा कमी किमतीला विकली जाता कामा नये. पण या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या डिस्काउंट, कॅशबॅक किंवा अन्य अप्रत्यक्ष सवलतींच्या माध्यमातून असं करतात. भारतीय ग्राहकांचा डेटा ते कुठे साठवतात, त्याचं काय करतात याबाबतही शंका घेण्यास वाव आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांकडे संपूर्ण देशातल्या ग्राहकांची माहिती असल्यानं चीन आणि आसियान देशांतून घाऊक स्तरावर खरेदी करणंही शक्य होतं. त्यामुळे देशात काही रोजगार तयार होत असले, तरी त्यापेक्षा जास्त रोजगार धोक्यात येतात.

मोदी सरकारनं या वर्षी नवीन ई-कॉमर्स धोरण आणण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या स्पर्धात्मकता पायदळी तुडवत मोठा तोटा सहन करून विक्री करत असल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. हे सुरु असताना जिओच्या प्लॅटफॉर्मचा वापर करत रिलायन्स उद्योगसमूह रिटेल क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यासाठी तो सध्या अस्तित्त्वात असलेल्याच छोट्या दुकानदारांना भागीदार बनवणार असून असंघटित क्षेत्रातील 85 टक्के बाजारपेठेकडे लक्ष देणार आहे. येऊ घातलेलं धोरण आणि स्पर्धा यामुळे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांच्या नाकात वेसण घातली जाईल, जी त्यांना नको आहे. आता तर टाटासारखी कंपनी या क्षेत्रात उतरत आहे. सध्या या क्षेत्रातली उलाढाल 40 अब्ज डॉलरच्या आसपास आहे; परंतु आगामी सहा वर्षांमध्ये ती पाचपटीनं वाढण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त