Friday, March 05, 2021 | 06:31 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

तळकोकणातील धुमशान
रायगड
09-Feb-2021 07:26 PM

रायगड

माजी मुख्यमंत्री व गेले दोन दशक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले सध्या भाजपावासीय असलेले तळकोकणातील नेते नारायणराव राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करावयास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कणकवलीजवळ असलेल्या पाडावे येथे आले होते. एवढे मोठे भाजपाचे नेते येणार म्हणजे भाजपाचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते शेजारचे राज्य असलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री अशी भाजपा नेत्यांची मोठी फलटण उपस्थित असणे स्वाभाविक होते. नारायण राणेंनी स्थापन केलेले हे अत्याधुनिक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे तळकोकणाची शान ठरले आहे यात काही शंका नाही. येथील नागरिकांना त्यामुळे मोठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याबद्दल येथील जनता राणेंना धन्यवाद देईलच. त्यापेक्षा या निमित्ताने अमित शहा जे बोलले त्याचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे. सद्या गृहमंत्री दिल्लीत असणे आवश्यक आहे, कारण शेतकर्‍यांनी सत्ताधार्‍यांना घेरले आहे आणि त्याची दखल केंद्र सरकार घेत नाही, मात्र जग घेत आहे, अशी स्थिती आहे. असे असले तरीही राणेंच्या या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहिले. त्यालाही काही पैलू आहेत. महत्त्वाचे म्हणजे तळकोकणात शून्य असलेल्या भाजपाला राणेंमुळे शिरकाव मिळाला आहे. राणेंचे साम्राज्य आता आक्रसत चालले आहे तरी अगदीच नाकारता येत नाही. अगदी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत शिवसेनेने ताब्यात घेतली असली तरीही कुडाळ, कणकवली, मालवण येथे राणेंचा वरचश्मा नाकारता येत नाही. या समारंभामुळे राणे सुखावले असले तरी त्यांची अशी भोळी (कोकणी माणूस तसा भोळा आहे) समजूत होईल की, आपण आता भाजपाचे आगामी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरु. परंतु राणे जर या स्वप्नरंजनात असतील तर ते मुर्खपणा करीत आहेत असेच म्हणावे लागेल. देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या आजूबाजूलाही फिरकू देणार नाहीत, याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. फडणवीसांची याबाबत खासीयत आहे, त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदातील सर्व स्पर्धक चुटकीसरशी गेल्या सहा वर्षात संपवले होते. त्यांना नुसती कुणकुण जरी राणेंच्या स्वप्नाबाबत लागली तरी ते राणेंना मालवणच्या समुद्रात कधी फेकतील ते समजणार नाही. नाही तरी राणेंना भाजपा प्रवेशासाठी आमंत्रण देऊनही त्यांनी तब्बल आठ महिने ताटकळत ठेवले होते व शेवटी प्रवेश दिलाच नाही आणि स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा सल्ला दिला होता. कॉँग्रेसमध्ये राणे एकवेळ जर टिकले असले तर त्यांना कॉँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची बक्षीसी जरुर दिली असती परंतु भाजपा त्यांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही हे लक्षात ठेवावे. खरे तर कॉँग्रेसने त्यांना सन्मानच पक्षात केला होता. आता त्यांना हवे असलेले मुख्यमंत्रीपद काही दिले नाही, हे वास्तव मान्य करावे लागेल, परंतु राणेंना तब्बल नऊ वर्षे मंत्रिमंडळात महत्त्वाचे त्यांना पाहिजे ते खाते दिले, दुसर्‍या क्रमांकाचे स्थान दिले. पक्षश्रेष्ठीं विरोधात बंड करण्याचा त्यांचा हा अक्षम्य अपराध पोटात घातला व त्यांना पुन्हा मंत्रीपद दिले. कॉँग्रेसने एका मुलाला खासदार केले तर दुसर्‍याला आमदार केले. असे असूनही त्यांना भाजपाने धमकाविल्यावर जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपाच्या सत्तेच्या वर्तुळात जाणे पसंत केले. आज अमित शहा राणेंचे कौतुक करीत आहेत. त्यांचा योग्य सन्मान करु असे आश्‍वासन देत आहेत. मागच्या मंत्रिमंडळात राणेंना साधे मंत्रीही केले नाही. एवढेच कशाला त्यांना खासदार करुन त्यांची वळकटी दिल्लीला बांधून पाठवली. हे सर्व करण्यात फडणवीसच पुढाकार घेत होते. बरे राणेंची जर एवढीच कदर करावयाची होती तर त्यांना केंद्रातही मंत्री करता आले असते. परंतु तसेही काही केले नाही. सध्या राणेंचा पुळका एवढ्यासाठीच भाजपाला आहे तो म्हणजे, राणेंचा शत्रू असलेल्या शिवसेनेच्या विरोधात त्यांना तोफगोळ्यासारखे वापरता येणार आहे. राणे देखील शिवसेनेच्या विरोधापोटी भाजपाच्या वतीने काही बडबडत करीत चालले आहेत. गेल्या वर्षात त्यांनी राज्य सरकार पाडण्यासाठी अनेकदा तारखा दिल्या. आता ते अमित शहांच्या पायगुणांचा विचार मांडत आहेत. शिवसेना व भाजपातील संबंध गेल्या निवडणुकीत एवढे ताणले गेले होते, परंतु लोकसभेला गरज होती त्यावेळी हेच अमित शहा मातोश्रीच्या दारी गेले. घरात गुफ्तगू केले, मात्र त्याचे ते आता खंडण करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना एवढी हट्टाला पेटली याचे कारणच स्पष्ट होते की, भाजपाने त्यांना बंद दरवाज्या आड दिलेले आश्‍वासन पाळलेले नाही. ज्या भाजपाने शिवसेनेचा हात पकडून आपली संघटना वाढविली त्याच शिवसेनेला हद्दपार करण्याची निती भाजपाने आखली. त्यामुळे भाजपाच्या या रणनितीला शिवसेना कशी भीक घालील, असा सवाल आहे. आज राणेंचे कौतुक चालले आहे त्यामागचा डाव राणेंनी ओळखण्याची हीच वेळ आहे. कारण गेल्या चार दशकात राणेंचा शिवसेना-कॉँग्रेस- अपक्ष व भाजपा असा प्रवास झाला आहे. अशा प्रकारे प्रत्येक पक्षाच्या दारी फिरल्यास जनता राणेंना एक दिवस हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्यातून राणेंचे सध्या असलेले राज्य जनताच खालसा करील. तळकोकणातील धुमशान दिसते तेवढे सोपे नसते याची दखल राणे व भाजपा या दोघांनीही घ्यावी.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top