कर्जत तालुक्यातील मानिवली या गावाचे नाव देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून महत्त्व असलेले. या गावातील क्रांतिकारक गोमाजी पाटील यांनी 1942ला स्वातंत्र्य चळवळीत स्वतः झोकून दिले. मात्र, ब्रिटिश सत्तेला हादरा देत भूमीगत राहून देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कोतवाल दस्त्याच्या माध्यमातून कामे केली. गोमाजी पाटील सापडत नसल्याने ब्रिटिश पोलीस हिराजी पाटील यांना पकडून नेत असताना ते तेथून पळून गेले आणि कोतवाल दस्त्यात सहभागी झाले. त्या हिराजी गोमाजी पाटील यांना ब्रिटिशांनी गोळ्या घालून ठार केले. त्या हुतात्म्यांच्या कुटुंबातील प्रवीण पाटील यांनी मानिवली गावात शासनाने उभारलेल्या हुतात्मा हिराजी पाटील स्मारकाला नवीन रुपडे आणले. मानिवली येथील हुतात्मा स्मारक हे आपल्या सरपंचपदाच्या काळात सुशोभित केले असून, राज्यातील क्रमांक एकचे हुतात्मा स्मारक बनविले आहे. केवळ हुतात्म्यांच्या कुटुंबातील आहोत म्हणून वारसा लाभलेल्या प्रवीण पाटील यांनी त्या स्वातंत्र्य चळवळीवर चित्रपटदेखील तयार केला आणि याचवर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे मिळालेला वारसा केवळ मिरवण्याचा नाहीतर त्या क्रांतिकारक, हुतात्मे यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी अनेक उपक्रम ते राबवत होते. त्यात मानिवली येथील हुतात्मा स्मारकात पूर्वी केवळ दोन तासांचा शासकीय कार्यक्रम होता, मात्र कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना एकत्र आणून स्वातंत्र्याचा जागर हा कार्यक्रम सुरू केला आहे. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी रात्रभर प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असतात.ही परंपरा सुरू करीत असतानाच मानिवलीच्या हुतात्मा स्मारक येथील क्रांतिज्योत दरवर्षी 1 जानेवारी रोजी रात्री मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे नेण्याची परंपरा प्रवीण पाटील यांनी सुरू केली आहे.

मानिवली गावात जन्म झाल्यानंतर कल्याण येथे मामाकडे राहून शिक्षण घेणारे प्रवीण पाटील यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक क्षेत्रात काम केले. त्यातून आपली राजकीय कारकीर्द स्वतःच्या कुटुंबात राजकीय वारसा असूनदेखील त्या राजकीय पक्षाचे काम न करता प्रवीण पाटील यांनी वेगळा पक्ष निवडला. काँग्रेस विचारांच्या गावात सुदाम पेमारे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षात काम करण्यास सुरुवात केल्यावर पेमारे हे तालुक्याचे, तर पाटील यांनी विभागीय चिटणीसपदावर पक्षबांधणीचे काम सुरू केले. आपल्या विभागातील ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे प्रवीण पाटील यांना या भागाचे जिल्हा परिषद सदस्य यांच्या जाण्याने तालुका चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य असलेले सुदाम पेमारे यांची प्रकृती साथ देत नसल्याने शेकाप तालुका चिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रवीण पाटील यांना शेकाप नेतृत्वाने तालुका चिटणीसपदाची जबाबदारी दिली. या पदावर काम करताना मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढविताना पक्षाच्या वाटेला आलेल्या दोन्ही जागांवर विजय मिळवून देण्यात प्रवीण पाटील यशस्वी ठरले होते. मात्र, सुदाम पेमारे यांचे अकाली निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत ती जागा बिनविरोध व्हावी यासाठी प्रवीण पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांना केलेले आवाहन कामी आले होते आणि निवडणूक बिनविरोध झाली होती.

कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने स्वतःला चांगले शिक्षण घेता आले नाही, याची खंत मनात ठेवून प्रवीण पाटील यांनी आपल्या व्यवसाय भागीदार असलेले मित्र आणि शिक्षणप्रेमी यांना सोबत घेऊन नेरळमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. त्या शाळेत कर्जत तालुक्याच्या अर्ध्या भागातील विद्यार्थी येत आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना सांस्कृतिक चळवळदेखील त्यांनी सुरू केली आहे.हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती करीत असताना, चित्रपटात जे कलाकार घेतले, त्यात शहीद भाई कोतवाल चित्रपटातील एकूण 2200 कलाकारांपैकी 70 टक्के कलाकार हे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील होते. तर, स्वातंत्र्य चळवळीचा जागर कार्यक्रम सुरू करुन त्यांनी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. मात्र, आपले जीवन हे समाजासाठी आहे, हे सतत पाळत आलेले प्रवीण पाटील यांनी आपल्या मागील वर्षीच्या वाढदिवस कार्यक्रमात शहीद भाई कोतवाल चित्रपटाची घोषणा केली होती आणि यावर्षीच्या वाढदिवस कोरोना काळात आल्याने त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आपले राजकारण हे ग्रामपंचायतपासून सुरू झाले पाहिजे, असे मानणारे प्रवीण पाटील यांनी विरोधकांचे मोठे आव्हान पेलण्यासाठी मी सरपंचही चळवळ सुरू केली. थेट सरपंच म्हणून मोठे मताधिक्य मिळविणारे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि अल्पावधीत ग्रामपंचायतीमधील तालुक्याचे प्रेरणास्थान असलेल्या हुतात्मा स्मारकाचा कायापालट केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय नव्याने उभे राहात आहे, तर तेथील जिल्हा परिषद शाळेत राज्यातील स्मार्ट शिक्षण देणारी यंत्रणा मंजूर करून आणली आहे. तर, सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांशी संबंधित असलेले प्रवीण पाटील हे आगरी समाज संघटनेच्या नेरळ हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहाचे रुप पालटण्याचा प्रयत्न करीत होते. त्या संघटनेचे तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सामाजिक सभागृहाच्या पहिल्या मजल्याचे काम करण्यासाठी आणि संपूर्ण इमारत सुशोभित करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून 40 लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ते काम सुरूच झाले नाही.अशा या सतत सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेणार्‍या कार्यकर्त्याला अखेरचा लाल सलाम!

 

अवश्य वाचा