राजर्र्षी शाहू छत्रपती यांचे खरे नाव यशवंतराव जयसिंगराव घाडगे होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला. अशा या महामानवाची आज जयंती. जयंती म्हणजे विचारज्योतींनी जीवन उजळून टाकण्याचा एक प्रयत्न होय. थोरांच्या महती आणि विचारांच्या ज्योती यांच्या आधाराने घडणारी तेजाची आरती म्हणजे जयंती होय. म्हणून थोर व्यक्तींच्या जयंत्या या पुनर्विचार दिन म्हणून साजर्‍या झाल्या पाहिजेत. गतकाळातील या थोर व्यक्तींच्या कार्याचा प्रताप आठवीत वर्तमानाला दिशा देणे, उजाळा देणे हे कोणत्याही महापुरुषाच्या जयंती साजरी करण्याचे खरे प्रयोजन असले पाहिजे. परंतु, ज्या महापुरुषांच्या आपण जयंत्या साजर्‍या करतो, त्या गांभीर्याने साजर्‍या झाल्या पाहिजेत. केवळ त्या दिवसापुरते नामस्मरण करुन काही साध्य होणार नाही. साध्य करायचेच असेल तर त्यांच्या विचारांमधील नीतीशीलता आम्ही अंगीकारली पाहिजे, त्यांनी दिलेले विचार आम्ही जोपासले पाहिजेत, तरच त्याला अर्थ आहे. परंतु, हा प्रामाणिकपणा आत्मसात करण्याची आमची तयारी नाही, ही वस्तुस्थिती आहे.

छत्रपती शाहू महाराज हे खर्‍या अर्थाने समाजसुधारक असे संस्थानिक होते. समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास करायचा असेल तर प्रथम समाजातील तळागाळातील वंचितांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. या विचारामधून छत्रपती शाहू महाराजांनी रोगट आणि कुजलेल्या कर्मकांडाचे स्तोम माजवलेल्या आणि वर्णवर्चस्वाद्वारे सामाजिक गुलामगिरीची निर्मिती केलेल्या विचारांना लाथाडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या उदात्त विचारांना आणि शाश्‍वत मूल्यांना या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजवण्याचे अत्यंत कठीण काम आपल्या संपूर्ण जीवनात प्रामाणिकपणे केले आणि सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यावेळेच्या व्यवस्थेशी दोन हात केले. महाराज हे आजकालच्या समाजसुधारकासारखे बोलके समाजसुधारक नव्हते, तर ते कर्ते समाजसुधारक होते, म्हणून बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले ही म्हण त्यांच्या कार्याला साजेशीच आहे. डॉ. बाबासाहेबांनी या देशाला लिखित राज्यघटना बहाल केली. या घटनेत दलित-बहुजनांच्या उद्धारासाठी अनेक महत्त्वाचे कलम समाविष्ट केले; परंतु महाराजांनी या वंचितांसाठी 100 वर्षांपूर्वीच अशी अलिखित घटना तयार केली होती की, ज्यामध्ये दलित-बहुजनांच्या उद्धारासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. केवळ निर्णय घेऊन ते थांबले नाहीत, तर त्यांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन तळागाळातील घटकांना वर काढून त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पूर्वीच्या संस्थानिकांचा जर आपण इतिहास पाहिला, तर प्रजेवर राज्य करणे अशा अर्थाने ते प्रजेशी वागत; परंतु राजर्षी शाहू छत्रपती हे स्वत:ला राजा न मानता, मी प्रजेतीलच एक असून, लोक हे राजापेक्षा श्रेष्ठ आहेत. येथे जनतेला महत्त्व असून, जनता केंद्रस्थानी मानून त्याभोवती राज्याचा कारभार चालतो, हा विचार महत्त्वाचा मानून त्यांनी जनता केंद्रस्थानी ठेवून आपला राज्यकारभार केला. त्यांच्या मते, राजा म्हणजे उपभोगशून्य स्वामी ही संकल्पना त्यांनी घोषित केली. त्यांना राजा म्हणून मिळालेले अधिकार, राजसंपदा त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी वापरली. राजर्षींना आम्ही वाचनातून जेवढे समजून घेतो, तेवढ्या प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी आपली राजसत्ता, राजवैभव रयतेच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी उपयोगात आणले, म्हणूनच तमाम जनतेने त्यांचा लोकराजा म्हणून गौरव केला आहे.

राजर्षी शाहू छत्रपतींनी 2 एप्रिल 1894 मध्ये राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला आणि 6 मे 1922 रोजी म्हणजे वयाच्या 49 वर्षी अल्पकाळात त्यांचे निधन झाले. म्हणजे, जेमतेम त्यांनी 28 वर्षे राज्याचा कारभार केला; परंतु या अल्पकालावधीतदेखील त्यांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक, शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. मग त्या मागासवर्गीयांना वकिलीच्या सनदा देणे असतील, संस्थानात वेगवेगळ्या मोठ्या पदांवर नेमणूक असेल, भटक्या विमुक्तांची हजेरी पद्धत बंद करणे असेल, दलितांसाठी शैक्षणिक आरक्षण असेल, प्रत्येक जातीनिहाय वसतिगृहाची निर्मिती असेल, संस्थानाचा औद्योगिक विकास व्हावा म्हणून कारखान्यांची स्थापना असेल, शेती उत्पादनात वाढ व्हावी म्हणून जलसंवर्धनच्या सुविधा असतील, राधानगरीसारख्या अत्यंत मोठ्या धरणाची निर्मिती असेल, तसेच शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून सहकारी संस्थांची निर्मिती त्यांनी केली, तयार मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून नवीन बाजारपेठांची निर्मिती केली, दळण-वळणाच्या सुविधा निर्माण केल्या, सांस्कृतिक, क्रीडा, कला या क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन दिले. सामाजिक समता निर्माण व्हावी म्हणून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. नोंदणी पद्धतीने विवाह व्हावेत म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. या सर्व घडामोडींचा विचार करता, ते खर्‍या अर्थाने आधुनिक विचारसरणीचे होते, हे स्पष्ट होते. शाहू महाराज म्हणजे अंधारात असलेल्या नव्या जगाला लाभलेला प्रकाश होय. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी सामाजिक समतेला सर्वोच्च स्थान दिले. समाजातील एकही व्यक्ती केवळ ती शूद्र आहे या कारणास्तव सामाजिक लाभापासून वंचित राहू नये, हा उद्देश मनात बाळगून आपले संपूर्ण जीवन त्यासाठी खर्च केले. महाराजांनी एवढे मोठे काम करुनही आजच्या स्थितीचा विचार केला तर आजही सामाजिक दास्य, आर्थिक दास्य, राजकीय दास्य हे गुलामगिरीचे तीन प्रकार दलित व बहुजनांच्या संदर्भात या देशात अस्तित्वात आहेत, तर मग या देशातील हा घटक खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य आहे का? हा प्रश्‍न प्रत्येक सुज्ञ नागरिकाने स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरुन विचारला, तर त्याचे उत्तर निश्‍चितपणे समाधानकारक नसेल. कारण, परिस्थिती बदलली असेल, पण स्थिती बदलेली नाही, व्यक्ती बदलेली असेल, पण त्याची प्रवृती बदलेली नाही. म्हणून स्थिती आणि प्रवृत्तीत बदल झाल्याशिवाय सामाजिक समतेचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार नाही.

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य हे त्यांनी केलेल्या संघर्षातून उदयास आले. म्हणून त्यांचे जीवन आणि कार्य यांचा मागोवा घेत असताना म. ज्योतिबा फुलेंच्या बहुजन उद्धाराची कार्यपरंपरा त्यांनी समर्थपणे पुढे नेली, हे मान्य करावे लागेल. म. ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याच्या प्रेरणेने निर्माण झालेले नवचैतन्य व नवजागृती याची जोपासना करणे, हे आजच्या नवीन पिढीचे कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाण आजच्या पिढीने ठेवली पाहिजे. कारण, त्याच विचारातून एक सुसंस्कृत समाज घडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कृतज्ञतेतूनच सामाजिक उत्कर्ष होत असतो, म्हणून शाहू महाराजांविषयी कृतज्ञता बाळगून, त्यांनी केलेल्या कार्याचा आपल्या समोर आदर्श ठेवून तसे विचार आमच्या मनात रुजवले, फुलवले तर फार मोठी सामाजिक बदलाची साखळी तयार होईल. याच विचारांचे सामर्थ्य आपल्या सर्वांना मिळो, हीच अपेक्षा आज त्यांच्या जयंतीदिनानिमित्ताने व्यक्त करतो.