Wednesday, December 02, 2020 | 11:14 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

धास्ती कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची ... प्रा.नंदकुमार गोरे
रायगड
19-Nov-2020 04:22 PM

रायगड

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त व्हायला लागली, तशी पहिली लाट संपली का, असा प्रश्‍न तज्ज्ञांना पडला. त्यावर बरीच चर्चाही झाली. जगभरात कोरोनाचे साडेचार कोटी रुग्ण असताना आणि या विषाणूने लाखो बळी घेतले असताना, आता दुसरी लाट आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍या लाटेचा उल्लेख केला नसला तरी जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही  हा मंत्र आणि इशाराही दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर दुसर्‍या लाटेचा थेट इशाराच दिला. युरोपमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं जग धास्तावलं आहे. सणावारात काळजी घेतली नाही तर कोरोना कसा वाढतो, हे केरळच्या उदाहरणावरून स्पष्ट झालं आहे. कोरोनाचे विषाणू थंडीच्या काळात एका ठिकाणी जास्त काळ जिवंत राहू शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ शकतो आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेतल्या प्रसाराचा वेग जास्त असेल, असं तज्ज्ञ सांगतात. सणावारांचा उत्साह आणि वाढत जाणार्‍या थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण नव्वद टक्क्यांहून अधिक झालं आहे. असं असलं, तरी पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सणांसोबत कोरोना पुन्हा उलटून येण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शिवाय, कोरोना पुन्हा आला तर तो साधासुधा असणार नाही, आधीपेक्षा दुप्पट वेगाने आणि जास्त भयानक स्वरुपात येईल, असं सांगितलं जात आहे. युरोपमधल्या काही देशांमध्ये सध्या हेच होत आहे आणि त्यालाच कोरोना विषाणूची दुसरी लाट म्हटलं जात आहे. आता अमेरिकेत एका दिवशी नव्वद हजारांपर्यंत, तर फ्रान्समध्ये एकाच दिवशी पन्नास हजार रुग्ण आढळले आहेत. पहिल्या टप्प्यात इतकी रुग्णसंख्या आढळली नव्हती. त्यामुळे दुसर्‍या लाटेची तीव्रता लक्षात घ्यायला हवी. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा अनेक युरोपीय देशांनी आणीबाणीची परिस्थिती फार चांगल्या पद्धतीने हाताळली. कोरोनाला अर्थव्यवस्थेचं फारसं नुकसान करू दिलं नाही. रुग्णसंख्या, कोरोनाचा प्रसार मर्यादेत ठेवला. त्यामुळेच या देशांना टाळेबंदी लवकर संपवता आली. अनेक देश नुकतेच पूर्वपदावर यायला लागले होते; परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे तिथली परिस्थिती बिघडू लागली आहे.

वैद्यकीय भाषेत एखाद्या साथरोगाची दुसरी लाट म्हणजे विषाणूचा प्रसार अचानक वाढण्याची घटना असं म्हटलं जातं. एखाद्या साथरोगाचा पहिल्यांदा उद्रेक होतो तेव्हा काही लोकांच्या एका गटाला याची लागण होते. त्यानंतर प्रसार कमी झाला असं आपल्याला वाटतं आणि मग लोकसंख्येच्या दुसर्‍या गटाला याची लागण सुरू होते तेव्हा आपण विषाणूची दुसरी लाट आली, असं म्हणतो. साथरोगाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असते, याचे दाखले आपल्याला इतिहासात सापडतात. मध्ययुगातला प्लेग असो किंवा 100 वर्षांपूर्वी आलेला स्पॅनिश फ्लू; पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेनं जास्त लोकांचे जीव घेतले. दुसर्‍या लाटेत प्रसाराचा वेगही जास्त असतो. त्यामुळे अचानक खाली गेलेला रुग्णांचा आलेख एकदम वर जातो. 31 मार्चपर्यंत फ्रान्समध्ये दररोज साडेसात हजार नव्या रुग्णांची नोंद होत होती. आता तिथे दररोज पन्नास हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. हेच इंग्लंडच्या बाबतीतही दिसून येतं. एप्रिलदरम्यान तिथे एका दिवसात सात हजार 860 कोरोना पेशंट होते. आता तिथे तिपटीहून अधिक रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत तर एकाच दिवसात नव्वद हजार रुग्णांची नोंद झाली. स्पेनमध्ये आठवड्यात 60 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. तिथल्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या माद्रिद शहरात एका दिवसात 20 हजार जण कोरोनाबाधित झाले. झेक रिपब्लिक, पोलंड, जॉर्जिया या देशातही पहिल्या लाटेपेक्षा जास्त बाधित आढळते. ही आकडेवारी चाचणी केलेल्या पेशंटची आहे. लक्षणं न दिसणार्‍या रुग्णांची नोंद सरकार दरबारी नाही.

या पार्श्‍वभूमीवर फ्रान्ससह अन्य देशांनी पुन्हा टाळेबंदी लागू करायला सुरुवात केली. धोका आणखी वाढण्याआधी त्यांनी नागरिकांवर बंधनं घालायला सुरवात केली. फ्रान्समधे रात्रीची संचारबंदी, रोममध्ये संध्याकाळी सहानंतर दुकानं-हॉटेल्स बंद, स्पेनमधल्या माद्रिदमध्ये जायला किंवा तिथून परत यायला परवानगी नाही. जर्मनीमधलं बर्लिन हे शहर तर नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. तिथेही गेल्या 70 वर्षांमध्ये पहिल्यांदा बंद पाळण्यात आला. कोरोनामुक्त आयुष्याची स्वप्नं पाहात असताना तिथल्या नागरिकांना अचानक निर्बंधासकट जगावं लागत आहे. मात्र, नागरिकांच्याच हलगर्जीपणामुळे ही दुसरी लाट आली आहे. टाळेबंदी संपल्यामुळे देशातल्या नागरिकांमध्येही आपलं स्वातंत्र्य परत मिळाल्याची भावना जागृत झाली होती. मुखपट्टी घालणं, शारीरिक अंतर पाळणं याची आता काहीही गरज नसल्याचं लोकांना वाटू लागलं होतं. टाळेबंदीचा कंटाळा आल्यानं लोकांकडून फारच कमी मर्यादा पाळल्या जात असल्याचं लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या एका सर्वेक्षणातून निदर्शनास आलं. या ढिलाईमुळेच तिथे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

साधारण अशीच परिस्थिती भारतात दिसत आहे. दिवाळी, ख्रिसमससारखे सण आता जवळ आले आहेत. अशा सणांमध्ये लोकांच्या भेटीगाठी वाढतात. सुट्टीमुळे लोक इकडून तिकडे प्रवास करतात. त्यातच भारतात पुढचे चार महिने थंडीचे आहेत. कोरोनाचा विषाणू थंडीत जास्त प्रबळ होण्याची शक्यता आहे. भारतातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, या वृत्ताला राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे दुजोरा देतात.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनावरील प्रभावी उपचारपद्धती अद्याप विकसित झालेली नाही. लस बाजारात येण्याचे वेगवेगळे मुहूर्त निघाले; परंतु ती वेळ प्रत्यक्ष आलेली नाही. कोरोना विषाणूचा प्रभाव शरीरावर किती काळ राहतो, याबद्दल अद्याप माहिती नाही. काहीजणांना तर आता तीन महिने काळजी घ्यायला सांगण्यात आलं आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती किती काळ टिकते, हेदेखील समोर आलेलं नाही. बरं झाल्यानंतर पुन्हा संक्रमण होण्याचा किती धोका आहे यावरही संशोधन सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममधले विषाणूतज्ज्ञ प्रा. जॉनथन बॉल म्हणतात, विषाणूंची तीव्रता कमी व्हायला मोठा काळ जावा लागतो. कोरोना विषाणूची जागतिक साथ सुरू होऊन फक्त सहा महिने झाले आहेत. इतक्या कमी काळात हा विषाणू बदललाय किंवा म्युटेट झाला, असं दाखवणारा एकही पुरावा अजून समोर आलेला नाही. दुसर्‍या लाटेबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद असले तरी कोरोनाच्या साथीवर मात करण्यासाठी मुखपट्टी, सामाजिक अंतर भान आणि स्वच्छता या त्रिसूत्रींच्या वापराबाबत मात्र सर्वांचं एकमत आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top