Wednesday, December 02, 2020 | 10:57 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

रस्ता राजमार्ग; हमरस्ता नाकारताना! ... विशेष- मोहिनी गोरे
रायगड
19-Nov-2020 04:20 PM

रायगड

खोपोली-पेण रस्ता काही ठिकाणी दोन लेन, तर पुढे काही ठिकाणी चार लेन असा होणार आहे. नॅशनल हायवे प्राधिकरण विभागानेन रस्त्याकरिता जमीन संपादित केली आहे. या महामार्गावरील काही गावात तसेच गागोदे खिंडीत तर नेहमीच छोटे-मोठे अपघात सत्र सुरू असते. अगदी परवा तीन नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर सलग तीन दिवस तीन अपघातांत तिघांचा मृत्यू, यात ग्रामस्थांचाही मृत्यू झाला आहे. त्याआधी काही दिवस एका महिला ग्रामस्थाला कोणत्या वाहनाने उडवले समजले नाही. प्रवासासाठी यातायात करावी लागत आहे. समोर आपल्याच लोकांचे ग्रामस्थांचे मृत्यू झालेले दिसत आहेत. त्यामुळे सहज तातडीने दर्शनी फलक, गतिरोधक या गोष्टी कराव्यात, यासाठी निवेदन पत्र दिली आहेत. ग्रामस्थांच्या मृत्यूमुळे गावात दिवाळी नाही, गावाला सुतक आहे. पण, याचे प्रशासनाला काही सोयरसुतक नाही, हेच दिसून आले. कारण, या गोष्टीही दिवाळीचा सण सुरू झाला तरी होत नाहीत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग अजून पूर्ण व्हायचा आहे. त्या त्या गोष्टी होतीलच, असेही सांगितले जाते. पण, इथे तर मृत्यू सत्र सुरू झाले आहे. तुमच्या तज्ज्ञांना आम्हा सामान्य नागरिकांच्या जीवन-मरणाच्या गोष्टी नाही लक्षात आल्या तर त्या लक्षात घ्याव्यात त्याला प्राधान्य देऊन येथील लोकांना जोडत हा रस्ता बनवावा म्हणून हा आंदोलनाचा पवित्रा. इथे गतिरोधक तयार करणे, रमब्लिंग स्ट्रिप्स मारणे, पुढे वळण आहे, पुढे अपघात प्रवण क्षेत्र आहे, पुढे शाळा आहे, असे दर्शनी फलक लावणे. सीसीटीव्ही, रिफ्लेक्टर्स लावणे. एस.टी थांबण्यासाठी काही जागा आत्ताच ठेवावी. कारण, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील गावाला एक्स्प्रेस-वेवरून जाताना काही ठिकाणी बस थांबते, पण तिला अधिकृत बस थांबा नाही. मग जसं काही घनदाट जंगलात रात्रीच्या अंधारात सर्जिकल स्ट्राइकमध्ये एर्ड्रोप करतात, त्याप्रमाणे जिवंत प्रवाशांना त्यांच्या सामानासहित रस्त्यात उतरवून क्षणार्धात बस पुढे निघून जाते. याचसाठी पुढील आठवड्यात कोरोना महामारी काळातदेखील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावरील गावकरी, ग्रामस्थ, नागरिक व मूलभूत अधिकार संघर्ष समितीने दोन तासांचा लक्षवेधी रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.

एकंदरीत, सर्व प्रकारच्या रस्त्यांचे हाल, रस्त्यांवर वावरणार्‍यांचे, प्रवास करणार्‍यांचे हाल सुरू आहेत.प्रत्येक पावसाळ्यात, गणपती उत्सवापूर्वी तात्पुरती डागडुजी ते करण्यासाठीही खड्डे बुजवा आंदोलन, तर कुठे खड्ड्यात बसून, तर कुठे खड्ड्यांवरून लांब उडीची स्पर्धा ठेवत, तर कुठे खड्ड्यात झाडे लावत नाना प्रकारे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे नेहमीची येतो पावसाळाप्रमाणे ही आंदोलने होतात. तर, सर्वसामान्य कष्टकरी जनतेची जगण्याच्या हक्काची लढाई ही याच रस्त्यावर याच खड्ड्यांतील रस्त्यावर उतरून आंदोलनं ही नेहमीचीच सवयीचीच झाली आहेत. पत सखोल व संवेदनशीलपणे विचार काही होताना दिसत नाही.

पेण, पाली, खोपोली, मुंबई-गोवा, पनवेल मार्गावर अद्यापपर्यंत शेकडो बळी गेले आहेत. हा रोजचाच जगण्याचा व्यवहाराचा, अर्थार्जनाचा, शिक्षण-नोकरी व्यवसायाचा मार्ग हाच असल्याने हजारो नागरिकांची हाडे खिळखिळी, डोळ्यात -तोंडात-नाकातून धूळ जाऊन दृष्टीवर परिणाम, श्‍वसनाचे आजार, वाढलेला वैद्यकीय खर्च अव्याहतपणे रस्त्याप्रमाणे न संपणाारे सुरूच आहेत.

बस झालं, खूप झालं आहे, अति झाले आहे, थांबवा! आता हे रस्त्यांचे जाळे. प्रत्येक अपघातागणिक, प्रत्येक जखमीगणिक, मृत्यूगणिक लोकांचे उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत विचारणे, आंदोलन, रास्ता रोको आणि त्यावर त्वरित ठरलेले उत्तर येते, हा नॅशनल हायवे निर्माणाधीन आहे, तो नॅशनल हायवे मुंबई विभागाचा आहे. तो ठाणे विभागाचा आहे, तर काही प्रश्‍न आरटीओचे तर काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, तर काही भाग खासगी मालकीचा, तर काही सामूहिक मालकीचा तर काही गावकीचा, शेवटी ठेकेदार अशी विविध कारणे, तीच टोलवाटोलवीची उत्तरे. रस्ता पूर्ण व्हायचा आहे. त्यात या गोष्टीचा विचार केला आहे. पण, तोपर्यंत काय, वर्षानुवर्षे जीव मुठीत धरून प्रवास करणे, सक्तीने टोल नाक्यावर वरील वसुली देणे, मुदत संपल्यावर बंद केलेले टोल नाके त्यांची लोखंडी सांगाडे, तसेच झाडे झुडपे वाढलेली, कठड्याचा काही भाग तसाच ठेवला जातो. काय समजता तुम्ही या सार्वजनिक मालमत्तेला. कोण याचे उत्तर देणार, शासन-प्रशासन कॉन्ट्रॅक्टर?

वास्तविक पाहता, हे लांबच लांब काळेभोर प्रशस्त रस्ते खूप संधी देतात पुढे जाण्याची. एकमेकांना जवळ येण्याची, गावाने तालुक्याला; तालुक्याने शहराला; शहराने महानगराला जोडून राष्ट्रीय होण्याची, जीवनाला गती देण्याची मोठं काम करतात या वाटा, हे रस्ते. सर्वांनाच प्रवाहात सामील व्हायचं आहे, पण ते अगतिकतेने नव्हे, तर येथील मातीची, मातीत पिकणार्‍या गोष्टींची, निसर्गाची, इतिहास भूगोलाची ओळख सोबत घेत सामील व्हायचं आहे. सर्व गोष्टीचा विचार करूनच असे रस्त्याचे, महामार्गाचे प्रोजेक्ट हाती घेताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या जागरूकता निर्माण करत त्यांच्यासाठीच हे आहे दाखवून दिलं तर कामही लवकर चांगले आणि सर्वांनाच आपलेपणाची वाटते. ही प्रगती हा विकास शेवटी माणसाने माणसासाठीच करायचा आहे ना?

भारताने आजवर अनेक समृद्ध साम्राज्ये पाहिली. ब्रिटिशांचे परकीय वसाहतीचे साम्राज्यानेही येथील निसर्ग संसाधन घेऊन स्वतःला समृद्ध केलं.नकळत या रस्त्याचे, लोहमार्गाचे दळणवळण प्रवासी प्रक्रियेचे महत्त्व फक्त अधोरेखित केले नव्हे, तर साक्षात विकासाचं उदाहरणच समोर ठेवले.म्हणून जोडलं जाणं, पुढे जाणे, गती देणे या रस्त्याच्या स्वाभाविक गुणधर्मानुसार सर्वांना जोडून घ्यावे, ही रास्त अपेक्षा आहे.(उत्तराधर्र्)           

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top