Wednesday, December 02, 2020 | 12:27 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

रस्ता राजमार्ग; हमरस्ता नाकारताना !
रायगड
18-Nov-2020 07:37 PM

रायगड

जीवनाचा, जगण्याचा प्रत्येकाने आपला मार्ग शोधायचा असतो. बरेच जण मळक्या वाटेने जातात तर काहीजण तोच  परंपरागत सरधोपट हमरस्त्यावरून न जाता मुद्दामहून आपली वेगळी वाट शोधतात. ती वाट वळणावळणाची, खाचखळग्यांची, दगड गोट्यांची अनंत अडचणीची असणार हे माहित  असतं. तरी तो मार्ग, तो रस्ता आव्हानात्मक वाटतो त्यात वेगळेपण शोधण्याचा, नवीन काही शोधण्याचा आनंद देतो. हा नवीन रस्ता खडतर असला तरी तो कुठेतरी मुक्कामी पोहोचवणारच. वाटेतील मुक्कामात, मार्गक्रमणात बरंच काही जोडले जाते. पुढे कुठे व काय वाढून ठेवलं आहे? कशाचा सामना करावा लागेल? सोबत कोणी मिळेल का? अनाहूतपणे आपल्या जीवनावर, जगण्यावर कोणी  घाला  घालेल का?  असं बरंच काही जीवनाच्या वाटेवर मांडून ठेवलेले असतं. कितीही चोखंदळपणे निवडायचं म्हटलं तरी काहीवेळा आपल्या हातात नसतं. मग अस्वस्थतेचा, अपमानाचा असाह्य दाह शमवण्यासाठी मार्ग शोधावाच लागतो. सन्मानाने जगण्यासाठी  व्यक्त होणे, भावनेला-विचाराला वाट करुन द्यावीच लागते. अशा भल्याबुर्‍या गोष्टीने वाटेत थकायला होतं. काही वेळा रस्ताच थिजून जातो परंतु या अनुभवानेच जीवन समृद्धही होते.नदी नाही का आपल्या प्रवाहाला वाट स्वतःच करत पुढे जाते. वाटेतील बरच सोबत घेऊन जाते. काहीचं तर नामोनिशाणही शिल्लक ठेवत नाही. बरंच काही गडप करते; तर कुठे हळूवारपणे-संथपणे कितीतरी जणांना जिवंत करते. हिरवीगार करत आपल्याच नादात डौलदारपणे मार्गक्रमण करत तीचं विशालपण विसरून जात विशाल सागरात मिसळून जाते. सागरही तिला सामावून घेतो.

हे झाले ऐहीक जीवनाबाबत पण जिथे ठरवून नागरिकांच्या पैशातून लोककल्याणकारी प्रोजेक्ट उभे केले जातात  आज त्या आधुनिक जगाचा विचार करता हे रस्ते-मार्ग-वाटा मग तो जलमार्ग असेल हवाईमार्ग असेल लोहमार्ग असेल वा डांबरी मार्ग असेल तो वाटेतील गावांना-लोकांना जोडून घेतो नव्हे त्यांच्याशी जोडण्यासाठीच आपण हा मार्ग बनवतो.

मग हे नॅशनल हायवे, एक्स्प्रेसवे तयार करताना कोणते उद्दिष्ट या तज्ज्ञांनी ठेवले आहे समजत नाही. पनवेल रस्त्याचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. त्यात बेसुमार जंगलतोड, घरांना अर्ध्यातच कापणे, धूळ खड्डे साम्राज्यातून लोक आपले जीवन व्यवहार करत आहे. दोन दिवसापूर्वीच पक्षीमित्र डॉ.सलीम अली यांचा जन्मदिन होता. तो आम्ही वृक्ष कत्तल पहात साजरा करतोय की आपल्याला सजा देतोय कळत नाही. अगदी वडखळ, पेण, कर्नाळा, खोपोली रस्त्यासाठी म्हणून शंभर किंवा त्याहून अधिक वर्षाची, स्वतःच्या अंगाखांद्यावर विविध पक्षी-प्राणी मिरवत, पांथस्थांना गारवा देत उभे असलेले वृक्ष हा अजस्त्र बाहू असलेला मानव क्षणार्धात वृक्षांना कापतो का? तर आधुनिकता मिरवणाणारे राष्ट्रीय महामार्ग बनवणे, द्रुतगतीमार्ग बनविणे व त्या योगे रोजगारांच्या संधी, कृषी मालाला चांगली बाजारपेठ, ठिकठिकाणाहून उपलब्ध गोष्टी बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे अशा विविध वस्तूंना वाहून नेण्यासाठी म्हणून हा राजमार्ग. पुुणे, मुंबई, नाशिक अशा मोठ्या शहरात महानगरात पोहोचण्यासाठी लोकांचा वेळ वाचणार. ही वेळेचे गणितं त्याची उपयोगिता ठरवते.या राष्ट्रीय महामार्गावरील जाणार्‍यांचे राष्ट्रीयीकरण करते. मग बाकीच्यांचे काय? आज पेण, पनवेल, खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील आदिवासी वाड्या पाडे,गावं, हजारो लोकसंख्येचे तालुके इत्यादींना हा राष्ट्रीय महामार्ग जोडून घेत नाही. येथील ग्रामस्थ नागरिक त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करत आहेत. अगदी मोठाल्या हॉटेलनाही रस्त्यांना जोडायची संधी मिळते पण इथला रहिवासी त्याला मात्र ही संधी नाही. मागील महिन्यात पालीला कामासाठी गेले होते. वाटले जिवंत माणसाचे नाही पण अष्टविनायक बल्लाळेश्‍वरचा भक्तिभाव किंवा भक्तीधाक असेल या राष्ट्रीय महामार्ग निर्मात्यांना, पण तोही नाही. कारण हा रस्ता अखंड खड्ड्यांनी भरलेला आहे. जणू काही देवाचा धावा करावा याचसाठी. पेणहून वडखळला जातानाही तोच प्रकार एवढे खड्डे, खाचखळग्यांनी रस्ता भरलेला आहे. खड्ड्यांचे साम्राज्य एवढे की या खड्डे खाच-खड्ड्यांनी अगदी पाठीत कमरेत उसण ही भरणारच. कार तर होडी प्रमाणे डोलू लागते.

पेण रेल्वे स्टेशन समोरील पुलाने पेणला विभक्त केले आहेच जणू पलीकडचे दिसूच नाही  असा हा पूल बनविला आहे. त्यात गाडली गेलेली लाखो टन माती किंवा अख्खा डोंगरच म्हणा ना ही माती केव्हाही बाहेर येईल ही भीती अनाठायी ठरणार नाही असे त्याकडे पाहून कोणाच्याही लक्षात येईल. याशिवाय मुंबई-गोवा मार्गावरील पेणचे खास महत्त्व आहे येथील मिरगुंड, पापड, पोहा पापड, गणेश मुर्तीचे शहर, विविध मूर्ती बनवणार्‍या कलाकारांचं गाव, रानमेवा विकणार्‍या आदिवासींचे गाव हे आहेच. तसेच रायगड जिल्ह्यातील पेण मध्यवर्ती ठिकाण आणि पुणे मुंबईलाही जोडणार मध्यवर्ती हाकेच्या अंतरावरील ठिकाण देखील आहे.

 त्याचबरोबर जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील महत्त्वाचे रासायनिक, औद्योगिक उद्योगधंदे कारखाने-कंपन्यांचं शहर आहे. याठिकाणी कॉलम आधारित पूल  केला असता तर याखाली पार्किंगची सोय झाली असती. तसेच वर्षभर येथील स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, कलाकाराला अधिक वाव मिळून त्यायोगे स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिपाऊस, हेटवणे, शहापाडा धरण, काही तलाव येथे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे तसेच या धरणांचे काही दरवाजे पाणि विसर्गा करता उघडावे लागणार आणि त्यामध्ये पेणला जलसमाधी मिळणार हे सहज लक्षात येत आहे.  जांभूळपाडा प्रलय अनुभव व पावसाळ्यातील होणारा विक्रमी पाऊस कशाचाच विचार केला नाही.

 निर्माणाधीन असलेला नॅशनल हायवे खोपोली ते पेण याला लागून असलेले गाव त्यांना स्वतःची अशी खास ओळख आहे. गागोदे गाव म्हणजे महात्मा गांधीजींचे पहिले सत्याग्रही, देशभरातील भूदान चळवळीचे प्रणेते-उद्गाते, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव आहे. आजही याठिकाणी विनोबा आश्रमचा दिनक्रम स्वावलंबन तसेच गावात उपलब्ध उत्पादनातून चालविला जातो. परराज्यातील अगदी हरियाणा, गुजरात विविध ठिकाणाहून लोक मुद्दाम हून विनोबा आश्रमाला भेट देण्यासाठी येतात.

पूर्ण रायगड भर कशी निसर्गाने समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या तसेच सामाजिक स्थित्यंतराची सुरुवात करून देशावर जगावर ठसा उमटवणारे चवदार तळ्याचे महाड, महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगड असे सगळ्यांचेच महत्त्व तुम्ही नाकारता येथील नागरिकांना काही भूमिका आहे. निसर्गासक्त मन आहे आधुनिक वर्तन विचारसरणी आहे कशाला तुमच्या लेखी किंमत नाही.      

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top