Tuesday, January 26, 2021 | 07:45 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

बर्ड फ्लूचा धोका
रायगड
11-Jan-2021 06:28 PM

रायगड

कोरोनातून आपला देश सावरत असताना आता बर्ड फ्लूचे नवे संकट आपल्यापुढे उभे ठाकले आहे. केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात व उत्तरप्रदेश या सात राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्याने आता अन्य राज्येही सतर्कतेच्या सर्व बाबी पाळून आहेत. महाराष्ट्रात व दिल्लीतील काही भागात कोंबड्या व अन्य पक्षीही मरण पावल्याचे आढळल्याने या राज्यात घबराट निर्माण झाली आहे. राज्यात बर्ड फ्लू झाल्याचे अधिकृत जाहीर झालेले नसले तरीही ज्या झपाट्याने कोंबड्या मरत आहेत ते पाहता या रोगाचा धोका वाढत चालला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे 350 कोंबड्या दगावल्याने भीती व्यक्त होत आहे. मुंबईतील चेंबुर परिसरात नऊ कावळे मृतावस्थेत आढळल्याने शंकेची पाल चुकचुकत आहे. एकूण पाहता बर्ड फ्लूचा धोका वाढत चालला आहे. सात राज्यातील सध्या असलेला हा पक्षांमधील रोग अन्य राज्यात व देशभर पसरण्यास काही फारसा विलंब लागणार नाही. त्यामुळे सर्व राज्य सरकारने व जनतेने यासंबंधी खबरदारीचे उपाय तातडीने योजले पाहिजेत. सध्या तरी कोंबडी खाणे माणसाला धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु ही स्थिती कायम राहू शकत नाही. त्यामुळे जनतेने कोंबडी खाताना सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे. यात सर्वात मोठा धोका पोल्ट्री चालकांपुढे आहे. कोरोनातील संकटातून पोल्ट्री चालक आता कुठे सावरत होते. त्यातच हा बर्ड फ्लू आता दाराशी आला आहे. गेल्या वर्षात पोल्ट्री चालकांना कोरोनाचा जबरदस्त फटका सहन करावा लागला होता. मध्येच कोंबडी खाण्यातून बर्ड फ्लू होतो अशी अफवा पिकविली गेल्याने कोंबड्यांचे दर मोठ्या प्रमाणावर उतरले होते. त्याचा फटका तर मोठा होताच. मात्र पहिल्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये कोंबडी विक्री तर बंदच होती. त्याचा मोठा तोटा पोल्ट्री व्यवसायिकांना झाला. सरकारकडे त्यांनी नुकसान भरपाईसाठी विनंती केली होती. परंतु तिजोरीत खडखडाट झालेले सरकार त्यांना नुकसानभरपाई देणे काही शक्य नव्हते. आता कुठे या सर्व संकटातून हा उद्योग सावरत असतानाच आता बर्ड फ्लू ची साथ येते आहे. 2020 साल संपल्यावर अनेक कृषी उद्योगावरील आधारित व्यावसायिकांनी मोठ्या धिराने आपले काम नवीन वर्षात सुरु केले होते. परंतु आता पुन्हा एकदा नवीन संकट त्यांच्यावर घोंघावत आहे. शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी कुक्कुटपालन हा एक चांगला जोड धंदा असतो व शेती करताना त्यांना एक मोठा आधार या जोडधंद्याचा होतो. परंतु आता शेती एकीकडे संकटात असताना पोल्ट्रीचा जोडधंदाही धोक्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top