Friday, March 05, 2021 | 06:49 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

प्रतिष्ठा पणाला
रायगड
21-Feb-2021 08:42 PM

रायगड

   मेट्रोमॅन म्हणून प्रख्यात असलेले ई. श्रीधरन दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भडकले आहेत. केंद्र सरकारने काहीही केले तरी त्याला विरोध करण्याची आजकाल एक फॅशन झाली आहे; एक तर शेतकर्‍यांनी कृषी कायदे समजून घेतलेले नाहीत; सरकार काहीही करायला जाते तेव्हा त्याला दुर्देवाने विरोध होतो, अशा शब्दांत त्यांनी आपला सात्विक संताप व्यक्त केला आहे. पूर्ण आयुष्य रेल्वे आणि त्या विषयक प्रकल्पात घालवलेल्या श्रीधरन यांनी स्वत: कृषी कायद्यांचा काय अभ्यास केला आणि देशातील शेतीविषयक कोणते ज्ञान प्राप्त केले हे माहीत नाही. परंतु, आपल्या राजकीय वाटचालीला ते आता प्रारंभ करत असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या न्याय्य लढ्याला नावे ठेवून प्रवेश परीक्षा मात्र पार केली असे म्हणता येईल. शिवाय, परदेशात राहून सरकारची बदनामी करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर ते सत्तेविरुद्ध केलेले युद्धच आहे. तसेच, जर संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देशाच्या विरोधातच दुरुपयोग होत असेल तर हे थांबले पाहिजे,फ असे भाजपाच्या आवडीचे बोल आवळून मर्जी संपादनाचे कसबही त्यांनी प्राप्त केले आहे, असे म्हणता येईल. केरळ राज्याचे कल्याण करण्यासाठी येत्या एप्रिल आणि मे महिन्यात होणार्‍या तेथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या श्रीधरन यांनी आपल्या पक्षाला सत्तेत आणून त्याद्वारे राज्याच्या भल्यासाठी झटण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोलकाता मेट्रो आणि खास करून राज्याच्या प्रगतीत महत्त्वाची भर घालणारी, महाराष्ट्राला गोवा आणि केरळशी जोडणारी कोकण रेल्वे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मोठे नाव झाले. दिल्ली मेट्रोेही त्यांनी उभारुन दिली. म्हणून त्यांना मेट्रोमॅन असे नाव पडले. आव्हानात्मक प्रकल्प राजकीय अथवा परिस्थितीजन्य दबावाला न जुमानता टीम बांधून ते जिद्दीने पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा होता. तो त्यांनी त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळेच साध्य केलेला होता. अनेक वर्षे रखडलेली, अशक्यच्या यादीत टाकली गेलेली कोकण रेल्वे पूर्ण करण्यात खरोखरच त्यांचे योगदान होते. त्यातून त्यांच्या कार्यनिष्ठा, स्वच्छ प्रतिमेचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यांनी आयुष्यात ही कमावलेली प्रतिष्ठा ते राजकीय क्षेत्रात गुंतवण्यास सिद्ध झाले आहेत. मात्र त्यांच्यासाठी हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरण्याची अधिक शक्यता आहे. कारण प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी आपल्या प्रतिष्ठेची बरीचशी मिळकत खर्ची घातलेली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास, राज्याला कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढून तेथे पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देणार असल्याचे आश्‍वासन ते देत आहेत. ज्या पक्षातर्फे ते हे आश्‍वासन देत आहेत, त्याची राज्यातील करूण स्थिती पाहता आणि अन्य ठिकाणी दिलेल्या आश्‍वासनांना त्यांनी दिलेली तिलांजली पाहता ते काहीही म्हणाले तरी काही फरक पडत नाही हे स्पष्ट आहे. रुढार्थाने बदनाम असलेल्या रेल्वे प्रशासन सेवेला तत्त्वनिष्ठ, नीतिमूल्य जपणार्‍या, कोणत्याही भ्रष्ट दबावाला बळी न पडता आपले काम नियमाने करणार्‍या, कार्यनिष्ठेमुळे आपसूकच आदर्श ठरणार्‍या अधिकार्‍यांचा परंपरेत त्यांचा समावेश होतो. त्या आयुष्यभराच्या कमाईचा वापर ते देशात फूट पाडून सत्तेत येऊन पदाचा आणि घटनात्मक शपथ घेऊन जो विध्वंस घडवत आहेत त्यांच्यासाठी करू पाहात आहेत. कोणी कधी कोणत्या गोष्टीत सहभागी व्हावे, कोणत्या आकांक्षा दाखवाव्यात, कोणती स्वप्ने पूर्ण करावीत हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. त्यात अन्य कोणी मत व्यक्त करण्याचे कारण नाही. तथापि ते भाजपात जात आहेत म्हणून नव्हे तर त्यासाठी ते आपल्या अज्ञानाला उघड्यावर आणून जे काही साक्षात्कारी बोल जाहीर करत आहेत, ते पाहता आश्‍चर्याने बोटे तोंडात घालावी लागतात. मुख्य म्हणजे ङ्गखोटे बोला, रेटून बोलाफ या धोरणानुसार त्यांनी भाजपाची री ओढली आहे. मी तुमच्यातलाच आहे असे सांगण्यासाठी शेतकरी विरोधात टीका, त्याचबरोबर लव जिहाद सारखे तद्दन केवळ विद्वेष वाढवण्यासाठी निर्माण केलेल्या कल्पनांना वास्तव संबोधणे, आवश्यक नव्हते. त्याचबरोबर भाजपा हा जातीय पक्ष नाही तर तो देशप्रेमी पक्ष आहे असे त्यांनी म्हणणे हा सर्वात मोठा विनोद आहे. त्यातून त्यांनी आपण भाजपमध्ये जाण्यासाठी किती पात्र आहोत याचे निकष जाहीर केले आहेत, असेच म्हणायला पाहिजे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवले आहे. तेथे डाव्या पक्षांचे सरकार जोरकसपणे काम करत आहे आणि त्यांनी भाजपला यशस्वीरित्या लांब ठेवले आहे. म्हणून तेथे भाजपचा केवळ एक आमदार आहे. तथापि अचानक देशसेवेची जाणीव झालेल्या श्रीधरन यांना निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही उर्मी दाबत न आल्याने ते राजकारणात शिरत आहेत आणि थेट मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. निवडणुकीनंतर ते त्यांचे दिवास्वप्नच कसे होते हे कळेलच. मात्र हे पक्षात पुढेही राहिले तर ते आणखी कोणकोणत्या गोष्टी खाजगी उद्योजकांना विकता येतील याचे सल्ले देऊ शकतील. या व्यवहारात भाजपला राज्यात शिरण्यासाठी श्रीधरन यांच्यापेक्षा अधिक गरज आहे. कारण त्यांना शिरकावासाठी कोणताही चेहरा नाही. स्वतःचे कोणतेही नेतृत्व नाही. मात्र त्यात श्रीधरन आपली आतापर्यंत कमावलेली प्रतिष्ठा पणाला लावण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपली पत सांभाळण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, एवढेच याप्रसंगी सांगावेसे वाटते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top