ही गोष्ट आहे तीस वर्षांपूर्वीची! खंडप्राय असलेल्या भारत देशात सर्वदूर तेव्हा आणि आजही असलेल्या काँग्रेसशी मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची एकजूट असलेली राष्ट्रीय मोर्चा (national front)) या नावाची एक पहिली सर्वसमावेशक छत्री उघडण्यात आली.त्यापाठोपाठ सर्व डावे कम्युनिस्ट पक्ष लेफ्ट फ्रंट किंवा वामपंथी मोर्चा या नावाने ओळखले जाऊ लागले. भाजपने आपणही तथाकथित सर्वसमावेशक आहोत हे दाखविण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी National Democratic Alliance) नावाची छत्री उघडली गेली. या छत्रीत येणारे अगदी पाहिले पक्ष होते शिवसेना, अकाली दल आणि जनता दलफ (युनायटेड). 2004 ला भारतीय राजकारणाची दिशा बदलली आणि काँग्रेसला स्वतःची सर्वसमावेशकता दाखविण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive alliance)नावाची  चौथी छत्री उघडावी लागली. अर्थात, राष्ट्रीय मोर्चा नावाच्या छत्रीचे मोजता येणार नाहीत इतके तुकडे झाले होते, तर लेफ्ट फ्रंट आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे बंगाल आणि केरळमध्ये कमजोर होत होती. आणि भारतीय राजकारणातील हे दोन्ही राजकीय घटक संपुआला मदत करत राहिले आणि त्यामुळेच काँग्रेस दहा वर्षे सत्तेवर राहिली.

पण, 2014  साली ही परिस्थिती बदलली. बाबरी विध्वंस या घटनेच्या भरवशावर लोकसभेत 183 ही सर्वोच्च संख्या गाठणार्‍या भाजपला जोड मिळाली ती गोध्रा दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू मसीहा ही इमेज प्राप्त झालेले नरेंद्र मोदी 2014 पासून बहुमताने दोन वेळा सत्तेत आले आणि भाजपला हळूहळू रालोआ नावाच्या छत्रीपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साह्याने उघडलेली हिंदुत्वाची छत्री जास्त मोठी वाटू लागली आणि इथेच रालोआतील एकेक सहकारी गळून पडू लागले. त्याची सुरुवात प्रथम शिवसेनेनी 2014 ला केली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची साथ सोडून त्यावेळीही आज 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलेलं नवं राजकीय समीकरण मांडण्याची तयारी झाली होती. पण, शिवसेनेने कच खाल्ली आणि पाच वर्षे ते भाजपबरोबर राहिले. पण, 2019ला विधानसभा एकत्र लढूनही मुख्यमंत्रीपदासाठी नवीन राजकीय समीकरण तयार झालं आणि भाजपने रालोआतील आपला खंदा हिंदुत्ववादी सहकारी गमावला. काहीसा तोच प्रकार बिहारमध्ये 2015 पासून होत असून, या निवडणुकीनंतर तिथेही पुन्हा महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती होऊ शकते.

नितीशकुमार मूळचे समाजवादी! राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांचे शिष्य! त्यांनी 2015 ला लालू प्रसाद आणि काँग्रेसच्या साह्याने बिहारमध्ये महागठबंधन या नावाखाली निवडणूक लढवून विजयी झाले. कुर्मी समाजाचे असलेले नितीशकुमार यांचा स्वतःचा असा एक मतदारसंघ असून, त्याच्या भरवशावर त्यांनी 71 जागा जिंकल्या, तर राष्ट्रीय जनता दलाने 80 आणि काँग्रेसने चक्क 27. तरीही लालूप्रसाद यादवांनी नितीशकुमारना मुख्यमंत्रीपद दिलं. भाजपची मजल 53 पर्यंत होती. दोन वर्षे हा संसार चालला. पण, 2017 ला पुन्हा नितीशकुमार यांनी भाजपबरोबर घरोबा केला आणि गेली तीन वर्षे ते भाजपबरोबरच आहेत. आताही त्यांचा भाजपबरोबरच निवडणूकपूर्व समझोता झाला असून, नितीशकुमार 123 आणि भाजप 121 जागा लढणार आहेत, तर तिकडे राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यातही समझोता झाला आहे. अर्थात, वरकरणी दिसत असलं तरी आत भाजप आणि जद (यु) मध्ये सगळं आलबेल आहे असं नाही. आणि ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपकडे हट्ट धरला आणि तो पूर्ण न झाल्याने नवा घरोबा केला. काहीसा तसाच प्रकार बिहारमध्ये घडण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार मोदी यांना कायम ठेवले आहे. बिहारमधील दलितांमध्ये काही प्रमाणात प्रभाव असलेल्या आणि प्रत्येक केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री राहिलेल्या स्व. रामविलास पासवान यांच्या दुसर्‍या पत्नीच्या चिराग नावाच्या एका चित्रपटापुरता अभिनेता असलेल्या मुलाने मात्र भाजपपासून फारकत घेतली आहे. लोकजनशक्ती पक्ष 143 जागांवर लढत असून, त्यांचे मुख्य ध्येय नितीशकुमार यांच्या जागा कमी करणे, हे असल्याचे सकृतदर्शनी दिसते. आणि, त्यामुळेच त्यांच्या आणि भाजपच्या हेतूबद्दल शंका उत्पन्न होते.

मोदी नेहमीप्रमाणे चिरागचा फायदा आपल्या राजकीय स्वार्थासाठी करुन नंतर त्याला फेकून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पासवान यांचं नितीशकुमार आणि लालूप्रसाद या दोघांशीही सख्य नव्हतं. आज त्यांच्या जागेवर अजूनही  लोकजनशक्ती या पक्षाच्या एकही मंत्र्याची वर्णी लागलेली नाही अथवा लागण्याची शक्यताही नाही. पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला भाजप नितीशकुमार यांच्या जागा कमी करून  आपल्या वाढवून त्याद्वारे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 सध्या 53 जागांवर असलेल्या भाजपने आकड्यांच्या खेळात  जद (यु) मागे टाकल्यास उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपचे सुशीलकुमार मोदी मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात. आणि, त्यावेळी पुन्हा राजद, काँग्रेस आणि जद (यु) एकत्र येऊन भाजपला एकटे पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शिवसेना, अकाली दल यापाठोपाठ नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास ती राष्ट्रीय लोकशाही आघाडीची अखेर असेल!

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त