Monday, January 18, 2021 | 04:28 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

जिजाऊचे स्मरण करताना...
रायगड
11-Jan-2021 06:20 PM

रायगड

जिजामाता, वीरमाता, वीर जिजाऊ यांची आज जयंती. जिने शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्य स्थापनेची कृतीशील विचार आचारांची बैठक निर्माण केली. तो काळ म्हणजे निरनिराळ्या शाह्यांचा व एतद्ेशियांच्या मागास मध्ययुगीन मानसिकतेचा आणि सरंजामशाही वृत्तीचा. जिजाऊचे वडील निजामशाही मानसबदार तर पती शहाजी आदिलशाहीतील सरदार. सर्व जहागीरदार, वतनदार, पाटील, देशमुख, कुलकर्णी आपले स्थान व मोठेपणा टिकवण्यासाठी बादशहाला, सुलतानाला देण्यासाठी ठरलेल्या करापेक्षा अधिक कर व शेतसारा वसूल करत. त्यामुळे लोकांना राजा कुणी बदलला तरी त्यांच्या जीवनात फरक पडत नसे. या अशा मध्ययुगीन काळात शिवाजीचा जन्म झाला. लहान वयातच पुणे परगण्याचा कारभार दादोजी कोंडदेवांबरोबर पाहू लागले. लोकांना मदत करणे, मंदिराची डागडुजी करणे त्याचबरोबर दांडपट्टा चालवणे, घोडसवारी शिकत होते. लुटूपुटू खेळातील लढाई खेळण्याचे वय असताना अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्‍वरावर सवंगडी मावळ्यांसोबत बाल शिवाजींनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकला जणू त्यायोगे स्वराज्याचे तोरणच बांधले गेले. हा सर्व जीवनपट सुरु होता तो जिजामातेच्या पाठिंब्याने, आशीर्वादाने व खंबीरसाथीनेच. एक-दोन किल्ले जिंकून फक्त वतनदार न राहता स्वराज्याचे स्वप्न पाहण्याचे, रयतेचे राज्य, त्यासाठी कृतीची भरारी व मनगटात ताकद दिली ती खंबीर जिजाऊंनी. एक एक करत शिवाजी महाराजांकडे 260 किल्ले होते. काही किल्ले नव्याने बांधले, काहींची डागडुजी केली, तटबंद्या अभेद्य केल्या. खरोखरच स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्याची ताकद एवढी प्रचंड होती की, शिवाजी महाराजानंतरही मराठा साम्राज्याचा दरारा दिल्लीपासून तंजावरपर्यत सगळीकडेच दिसत होता. हजारो वर्षे अरब, तुर्क, अफगाण टोळ्यांनी आक्रमणे केली. पोर्तुगीज, डच फ्रेंच, इंग्रज व्यापारांनी साम्राज्य, वसाहती स्थापन केल्या. तर मध्ययुगीन काळात मुस्लिम शासक आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा व मोगल होते. साहजिकच मुस्लिमांप्रती निष्ठा ठेवणारे मुस्लिमांबरोबरअनेक हिंदू होते. म्हणूनच प्रसिद्ध हळदी घाट लढाईत अकबर सैन्याचे नेतृत्व हिंदू राजा मानसिंग याने केले. 

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणार्‍या शिवाजी महाराजांवर तलवार कृष्णा कुलकर्णींनी उपसली. अकबर दरबारातील कृष्ण भट शेष यांनी शूद्रचार शिरोमणी ग्रंथामध्ये म्हटले आहे की, परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करून टाकली आहे, क्षत्रिय उरला नाही. औरंगजेबाचा सरदार हिंदूमिर्झाराजे जयसिंगांने औरंगजेबाच्या विजयाकरीता म्हणजेच शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून शिवाजी महाराजांविरुद्ध कोट चंडी यज्ञ आयोजन केला. यज्ञ महाराष्ट्रातील पुरोहितांनी केला. त्यासाठी तीन महिने ब्राह्मणांना अनुष्ठान घातले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांकडे हिंदूं बरोबर काही मुसलमानही होते. आग्र्याहून सुटकेसाठी मुस्लिम मदारी मेहतर होते, तसेच उत्तरेकडील ब्राह्मण कृष्णाची काशी मदतीला आले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात प्रथम आरमार उभे केले, समुद्रकिनारे सुरक्षित केले. (महाराष्ट्रात सध्या अशा आरमारांचे खाजगीकरण अडाणीकरण व अंबानीकरण होत आहे.) आरमाराचा प्रमुख मुस्लिम होता. तसेच येथील स्थानिक कोळी, आगरी व भंडारी ही होते. घोडखिंड बाजीप्रभू देशपांडेच्या बलिदानाने पावनखिंड ठरली. अत्यंत विश्‍वासू गुप्तहेर रामोशी बहिर्जी नाईक होते. विशालगडावरुन सुटका करून घेताना नाव्ही शिवा सकपाळ होते. अशी जिवाला जीव देणारी अत्यंत विश्‍वासू, पराक्रमी आणि निर्भिड हिंदू असणे हे स्वाभाविकच होते. मुस्लिम दरबारी हिंदू तर हिंदू राजाकडे विश्‍वासू व प्रामाणिक मुस्लिम माणसे होती. ती काळाची मागणी होती, मर्यादा होती व गरजही होती; तसेच तो वर्णवर्चस्वाचा काळही होता. म्हणून ते स्वरुप हिंदू राजा विरुद्ध मुस्लिम राजा असे नव्हते. मध्ययुगात अर्थकारण, राजकारण हे सर्व धर्माच्या आवरणाखाली सुरू असले तरी लढाई मुस्लिम राजा विरुद्ध हिंदू राजा अशी नव्हती. त्यात धर्म दुय्यम होता तर प्रथम स्थानी राज्य, सत्ता व संपत्ती असे. सत्ता संपत्तीसाठीच युद्ध व आक्रमणे होत होती. मुस्लिम बादशहाने हिंदू मंदिरे पाडली, त्याची विटंबना केली ते लोकांची मानसिक खच्चीकरण करण्यासाठी देखील तसेच संपत्तीसाठी देखील. आजही पद्मनाभन मंदिरात किती तरी टन सोने सीलबंद आहे हे दूरदर्शनवर आपण पाहिलेच आहे. काही मुस्लिम शासक सत्तेत स्थिरावल्यावर मंदिरांना भरघोस मदत सुद्धा करीत होते. मराठ्यांकडून युद्धात पाडले गेलेल्या शारदेचं शृंगेशवरी मंदिरचा जीर्णोद्धार टिपू सुलतानाने केला. जिजाऊंनी निर्माण केली नैतिकता शिवाजी महाराजांनी मात्र कधीच सोडली नाही. त्यांनी कधीच प्रार्थना स्थळांची विटंबना केली नाही, उलट सापडलेली कुराणाची प्रत मुस्लिमकडे सन्मानाने सुपूर्द केली. स्वतः व सहकार्‍यांच्या जोरावर स्थापलेल्या स्वराज्यात कधी कोणता शुभ-अशुभ काळ मानला नाही.

आपल्याकडील सैनिकी, शस्त्रसाठा, तोफगोळा, रसद ही संख्या लक्षात घेऊन गनिमी काव्याने अमावस्येला गडद अंधारातही बरीच कठीण कामे फत्ते केली. चढाया, लढाया यशस्वीही केल्या. अंधारालाच आपले मानून डोळ्यात तेल घालून प्रजेचे रक्षण केले. शिवाजी महाराज हिंदू राजा होते. ते नेहमीच साधुसंतांना मदत करुन विनम्रतेने वंदन करीत. रामदास स्वामी सज्जन गडावर आले असताना त्यांना व त्यांच्या अनुयायांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्यास गडावर निरोप धाडले. मुस्लीम संत याकूतबाबा हे शिवाजी महाराजांच्या अनेक गुरुपैकी एक होते. क्रूर जुलमी औरंगजेबाला खलिता पाठवून स्पष्ट सांगितले कि यापूर्वी अकबर, जहांगीर, शहाजहान यांनी कर घेतला नाही तेव्हा गरीब, निराधार जनतेकडून जिझिया कर वसूल करू नये. हे राजसत्तेच्या मूळ सिद्धांताविरुद्ध  आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला औरंगजेबांस महाराजांच्या उच्च कोटीची मूल्ये व नैतिकतेचा प्रत्यय घेतल्यावर महाराजांच्या मृत्यूनंतर तो म्हणतो की, मला शत्रू मिळाला तो ही शिवाजीसारखा नेक राजा. जिजाऊंची आठवण काढणे आजही प्रासंगिक ठरते कारण प्रत्येकाला वाटते की पुन्हापुन्हा असा शिवाजी जन्मावा. एवढे ते जाज्वल्य, नीतिमान व सच्चरित्र जीवन. आजही नुसत्या उच्चाराने चैतन्य येते, अन्यायाविरुध्द लढण्याची ताकद मिळते. अधिकांश आई-वडील आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवतात, ते हे लक्षात घेऊनच. तेव्हा राजांच नाव घेऊन म्हणजे शिवाजी नाव असलेली कोणी व्यक्ती बेइमानी करत असेल, स्त्रियांना अपमानित करत असेल तर त्याने हे नाव बदलून घ्यावे, समाजाने त्यास बदलण्यास भाग पाडावे. कारण हे नाव म्हणजे चारशे वर्षांनंतरही त्यातील चैतन्य व पावित्र्य उच्चारानेच नसानसात जाणवते, वारश्याने नव्हे तर स्वकर्तुत्वाने अस्तित्व निर्माण करण्याची तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देते. म्हणून या नावाच्या निर्मातीस, स्वराज्याची प्रेरणा देणार्‍या जिजाऊस आपण आजही वंदन करतो.

आज आधुनिक काळात जवळजवळ सर्वच क्षेत्रात महिलांनी उत्तुंग झेप घेतली आहे तरीही कटु वास्तव म्हणजे देशात प्रत्येक सेकंदाला महिला विनयभंग, अन्याय, अत्याचारला सामोरे जाते. तासागणिक देशात कुठे ना कुठे तिच्यावर बलात्कार होतो. अशावेळी स्त्री विषयक दृष्टिकोन किती निकोप असावा लागतो हे प्रकर्षाने जाणवते ते महाराजांनी घालून दिलेल्या उदाहरणातून. शत्रु पक्षाच्या सुभेदार सुनेची सन्मानाने पाठवणी करणे, आपल्याच लेकी, सुना, बहिणींवर वाईट नजर ठेवणारे, अत्याचार करणार्‍या आपल्याच माणसाचे हात पाय तोडणे, डोळे काढण्याची शिक्षा, लगेच कैदेत टाकणे अशी प्रत्यक्ष कृती त्यांनी अंमलात आणली. आपल्याच काय शत्रुपक्षातील स्त्रियांवर अन्याय केल्यास जबर किंमत मोजावी लागेल याची सक्त ताकीद सैनिकांना दिली जात असे.

आजही शिवकालाची आठवण ठेवण्याचे दुसरे कारण म्हणजे अखंड लढाया, चढाया, अविश्रांत कष्ट घेत स्वराज्य निर्माण केले, रयतेचे राज्य कृतीत आणले. तरीही त्याकाळची मर्यादा, वर्णाश्रम पद्धती त्यांना राजा म्हणण्यास व मानण्यास तयार नव्हती. महाराजांचा राज्याभिषेक करण्यासही कोणी तयार होईना. अशावेळी प्रचंड दक्षिणा, सोने, संपत्ती देऊन मूळचे पैठणचे पण काशीस वास्तव्यास असलेले गागाभट्ट राज्याभिषेक करण्यास तयार झाले. वयाच्या 44 व्या वर्षी शिवाजी महाराजांची मुंज झाली व याआधी मंत्रविना झालेली लग्ने, काही दशकाचे वैवाहिक जीवन झालेले असतानाही पुन्हा मंत्रविधित लग्न. पुन्हा दुःखाची गोष्ट म्हणजे या राज्याभिषेकानंतर अवघ्या तेरा दिवसातच जिजाऊंचा मृत्यू झाला. गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकात काही चुका झाल्या म्हणून पुन्हा एकदा राज्याभिषेक करण्यास सांगितले. या दुसर्‍यांदा केलेल्या राज्याभिषेकानंतर अवघ्या सहा वर्षांनी शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला.

 त्यानंतर दोन शतके शिवाजी महाराजांची समाधी जंगल, झाडाझुडपात हरवून गेली होती. ती प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दृष्टीस पडली. त्यांनी त्याची साफसूफ, डागडुजी केली व शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा ही लिहिला.  सावकाराच्या व वतनदारांच्या कर्जात पिचलेल्या गरीब शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शेती करण्यास प्रोत्साहन दिले. कर्जातून बाहेर निघेपर्यंत कर आकारणी माफ केली. दुष्काळात कर्ज माफ केले. तयार होणार्‍या पिकाच्या तुलनेत शेतसारा आकारला. सैन्यातील घोड्यांना चारा, वैरण वगैरे रोख रक्कम देऊन घेण्यास बजावले. आरमारासाठी लागणारे लाकूड त्याकरिता संबंधितांना विचारुन, त्यांना मोबदला देऊन, त्यांच्या परवानगीनेच झाडे तोडावित कारण हे की त्यांनी झाडे लेकराप्रमाणे वाढविलेली असतात. म्हणूनच लोकशाहीत आपण आजही त्यांची आठवण काढतो कारण या हिंदू राजाने दुसर्‍या धर्माचा अवमान, अप्रतिष्ठा, विटंबना कधी केली नाही. 

स्त्रीविषयी निकोप दृष्टिकोन तसेच आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे गरीब शेतकर्‍यांना व रयतेला महत्त्वाचे मानले. शिवाजी महाराजांनी माणुसकीला किंमत दिली म्हणून एखादा अपवाद वगळता कधीच कोणी फितूर झाले नाही. त्या काळातही शेतात धान्य पिकवणारा शेतकरी व लढणारा सैनिक दोन्ही महत्त्वाचे होते. त्यामुळे लुटीत मिळालेला माल सैनिक राज कोठारात जमा करत. त्यांना पगार पाणी दिले जात. शेतीबरोबर व्यापार उद्दीम वाढवण्याची काळजी घेतली जाई. त्याकरिता आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणार्‍या मालावर जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण होते. परकीय डच मालावर अडीचपट जकात बसवली होती. 

म्हणूनच आजही स्वराज्याचे म्हणजेच जिजाऊचे स्मरण करणे प्रासंगिक ठरते. आज स्वतंत्र भारताच्या लोकशाहीत 45 दिवस शेतकरी थंडी, वारा व भर पावसात रस्त्यावर गैरसोय सहन करत, स्वतःच्या वयाचा आजाराचा विचार न करता कोणतीच तमा न बाळगता झुंज देत आहे. जेव्हा देश आर्थिक मंदीत, प्रचंड बेरोजगारीत, मोठ्या आरोग्य संकटात असताना सर्वांचीच हिम्मत बांधत आहेत. आपल्या हक्कासाठी आंदोलन व्यापक करीत आहे. 90 कोटी लोकसंख्या शेती व शेती आधारित व्यवसायावर जीवन निर्वाह चालतो. म्हणूनच जिजाऊंच्या मृत्यूला चारशे वर्षे उलटली तरी स्मरण होते कारण मृत्यूला मूल्य नसते तर ध्येयाला भूमिकेला मूल्य असते. ओठावर आपसूकच येते.

जय जय, जय जय, जय जिजाऊ!!

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top