आजकाल काय दिसते? कोणत्याही शाळेच्या मुलाच्या हातांत अभ्यासक्रमाशिवाय कोणतीही पुस्तके दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना रामायण, महाभारत, हितोपदेश, यातील आदर्श मूल्ये कशी समजणार? दुरदर्शनवरील भडक जहिराती,मनावर विकृत परिणाम होईल अशा मालिका, यामुळे मुलांवर संस्कार होणे अत्यंत अवघड झाले आहे. पूर्वी अनेक कुटुंबांत आई-वडिल,आजी-आजोबा मुलांना अनेक  संस्कारक्षम गोष्टी सांग़ून त्यांचे संवर्धन करीत असत, त्यामुळे मुलांना चांगले वाईट यातील फरक कळत असे. आज परिस्थिती बदललेली आहे. आई-वडिलांना वेळ नाही. आजी-आजोबा नातवांपासून दूर कोठेतरी एकांतवासांत गेले आहेत. ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. एका पुस्तकांवर तीन पुस्तके फ्री अशा जहिराती अनेक प्रकाशन संस्था करीत आहेत.

सध्याच्या संगणकीय युगांत इंटरनेटवर ज्ञानाचा खजिना खुला झाल्यावर ते ज्ञान कशाला मिळवावयाचे? व त्या ज्ञानासाठी पुस्तके कशाला मिळवावयाची? ही विचारसरणी आता जोर धरू लागली आहे व ती समाज जीवनांवर एक  आघात करत आहे. शासन खेडोपाडी वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या अनेक योजनामुळे ग्रंथालयाचा विस्तार होत आहे. खेड्यापाड्यांतील पिण्याच्या पाण्याची जशी व्यवस्था शासन करते तशीच तहानलेल्या वाचकांना पुस्तके मिळावयास नकोत का?बडोदा संस्थानांत कै सयाजीराव गायकवाड यानी फिरती वाचनालये सुरू केली होती. रूग्णालयांतील एखाद्या रूग्णांने जरी पुस्तके मागितली तर लहानशा बंद पेटीतून आठ दहा पुस्तके त्यांच्याकडे जात. ती त्यांन वाचावीत. वाचून झाल्यानंतर परत पाठवावीत अशी व्यवस्था 75 वर्षापूर्वी जे प्रामाणिक प्रयत्न बडोदा सरकारने केले त्याकडे आताच्या सरकारने मुद्दाम लक्ष देणे जरूरीचे आहे. मागील दोन वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यांतील भिलार येथे महाराष्ट्र सरकारने पुस्तक संस्कृती जोपासली आहे. तेथे अनेक प्रकारची पुस्तके वाचावयांस मिळतात. मधून मधून वाचन संस्कृतीला प्रेरणा देण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी सरकार काही उपक्रमही राबवत आहे. ही घटना वाचनसंस्कृती वाढविणारी आहे .

भारताचे माजी उपपंतप्रधान,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण हे वाचनसंस्कृतीचे भोक्ते होते. अनेक उत्तमोत्तम पुस्तके त्यांच्या संग्रही असत. आपल्या अत्यंत धावपळीच्या जीवनांतही ते पुस्तकांचा आस्वाद घेत असत. त्यामुळेच एवढ्या धावपळीच्या राजकारणातील जीवनांतही ते एक मुत्सद्दी व विचारवंत म्हणून प्रसिद्धीला आले. घटना समितीचे शिल्पकार कै बाबासाहेब आंबेडकर यांना तर पुस्तकांची भयंकर आवड होती. त्यांचाही पुस्तकांचा मोठा संग्रह होता. आपला मोकळावेळ ते अनेक पुस्तके वाचनांत घालवित. आजही अनेक संस्था,समाजसेवी संघटना, वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी मदत करत आहेत.  त्यातूनच एक आशेचा किरण डोकावतो आहे. या संस्थानी ही चळवळ वाढविण्यांसाठी प्रयत्न करावयास हवेत. मग साध्य होईल एक संस्कारक्षम व संस्कृतीची संवर्धन करणारी एक पिढी. आणि हीच खरी आजच्या काळाची गरज आहे. या अनेक पुस्तकांमुळे व काव्यामुळे अनेकांच्या जीवनांत फार मोठी क्रांती झाली आहे.ङ्घ वंदे मातरमफ या किंवा ङ्गशामची आईफ तसेच वि. दा.सावरकरांचे ङ्गकाळेपाणीफही पुस्तके अनेकांची प्रेरणास्थान बनली होती. ङ्गसेव्हन हॅबिटसफ हे इंग्रजी पुस्तक तर जगांत गाजले होते. अनेकांनी त्यातून स्फूर्ती घेतली होती. चाफेकर बंधुंनी फासावर जातांना काय मागितले? भारताचे एक महाकाव्य ङ्ग भगवदगीताफ!..

आजच्या स्पर्धात्मक युगांत मुले अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करीत नाहीत. आज काल संगणक युगामुळे वाचनाकडे अनेकांचे  दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे वाचन संस्कृतीचे मह्त्व कमी झाल्याचे जाणविते. पण संस्कार व प्रगल्भता जागविण्यासाठी वाचन संस्कृतीचे जतन करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य ठरते. यातच वाचनसंस्कृतीचे महत्व साकारले आहे. भौतिक सुखे यातून सुख मिळत नाही. हे सत्य आजही अनेक पाश्‍च्यात्य राष्ट्रांना कळून चुकले आहे. प्राचीन काळांपासून संस्कारक्षम असलेली भारतीय संस्कृती विचारावर व संस्कारावर आधारलेली आहे. तिला वर्धिष्णु करण्यासाठी गरज आहे वाचनसंस्कृतीची !...

आज कोरोना साथीमुळेमहाराष्टातील सुमारे  12 हजार वाचनालये बंद आहेत. महाराष्ट्रात अजूनही इतर बर्‍याच गोष्टी सुरू जरी झाल्या असल्या तरीही ग्रंंथालये , वाचनालये मात्र सुरू नाहीत. ही वाचनालये, ग्रंथालये लवकरात लवकर सुरू झाल्यास वाचनप्रेमींची भूक कमी होईल. सरकारने ती लवकर सुरू करून वाचकांना दिलासा द्यावा. ग्रंथालयावर योग्य ते निर्बंध लावूनच ती सुरू करावीत वाचनसंस्कृतीचे हे वैचारिक खाद्य मुलांना पालक व शिक्षकांनी पुरवावयास हवे. या पुढची पिढी जर सुसंस्कारीत व विचारी बनवावयाची असेल तर वाचनाशिवाय पर्यांय नाही. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक पालकांनी व शिक्षकांनी ही वाचक संस्कृती मुलांच्यात रूजविण्याचे मनापासून ठरविल्यास खर्‍या अर्थाने वाचन प्रेरणा दिन साजरा केल्याचे होणार आहे!

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त